पंढरपूर5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
पंढरपूर दुधात भेसळ करण्यासाठी आणलेले ८४० लिटर पांढरे द्रावण आणि दोन वाहने पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. यामुळे पंढरपूर तालुक्यातील भेसळयुक्त दुधाची विक्री करणारे रॅकेट समोर आले आहे. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे. या संदर्भात दाखल फिर्यादीनुसार, सोमवारी रात्री एकच्या सुमारास पोलिस कॉन्स्टेबल नवनाथ सावंत हे रात्र गस्तीवर असताना वाखरी-गुरसाळे बायपास मार्गालगत उड्डाण पुलाजवल दोन टेम्पो उभे होते. अधिक चौकशी केली असता त्यापैकी टाटा इंट्रा टेम्पोमध्ये दूध भरण्याचे रिकामे १९ कॅन तर अशोक लेलँड टेम्पोत पांढऱ्या रंगाचे सोडियम लॉरेल इथर सल्फेटचे एक लाखाचे द्रावण भरलेले १४ कॅन आढळून आले. वाहनांसोबत नीलेश भोईटे (रा. वृंदावनम सोसायटी, टाकळी), परमेश्वर काळे (रा.फुलचिंचोली) आणि गणेश गाडेकर (रा. पंढरपूर) हे तिघे होते. दुधाचे कॅन व लिक्विड कॅनबाबत चौकशी केली असता, ते लिक्विड सुमित मेहता (रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती) यांच्याकडून मागवण्यात आल्याचे सांगण्यात आले. ते दुधात भेसळ करण्याकरता आणलेले आहे, असेही त्या तिघांनी सांगितले. वाहनांसह लिक्विड ताब्यात घेऊन पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले. अन्न व औषधी प्रशासन विभागाने नमुने घेतले आहेत. या प्रकरणी अन्न व औषध विभागाने पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.