- Marathi News
- Sports
- Maharashtra Kesari Final Match Live Update; Maharashtra Kesari 2023 | Shivraj Rakshe | Mahendra Gaikwad
पुणे7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
गत 4 दिवसांपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील भल्या भल्या पैलवानांना पराभवाचे पाणी पाजत महेंद्र गायकवाड व शिवराज राक्षे किताबी लढतीसाठी एकमेकांपुढे उभे ठाकले होते. अंतिम किताबी लढत कशी होणार? दोन्ही तुल्यबळ प्रतिस्पर्धी मल्ल एकमेकांना कसे झुंज देणार? आणि कोण होणार नवा महाराष्ट्र केसरी? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. अखेर शनिवारी सायंकाळी लाखो कुस्ती शौकिनांना या प्रश्नांची उत्तरे मिळाली.
शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम सामना झाला. त्यात शिवराज राक्षेने अवघ्या काही सेकंदात महेंद्र गायकवाडला चितपट करत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला व मानाची गदा जिंकली.
तत्पूर्वी, माती विभागात झालेल्या लढतीत महेंद्र गायकवाडने सोलापूरच्या सिकंदर शेखला धूळ चारली. तर शिवराजने अहमदनगरच्या हर्षवर्धन सदगीर याला अस्मान दाखवले.
कुस्तीपटूंच्या मानधनात वाढ
राज्यातील कुस्तीपटूंना देण्यात येणाऱ्या मानधनात तिपटीहून अधिक वाढ करण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना होण्यापूर्वी देवेंद्र फडणीसांनी ही महत्त्वाची घोषणा केली. फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील जे खेळाडू ऑलिम्पिक किंवा जागतिक कुस्ती स्पर्धेत खेळले आहेत, त्यांना आतापर्यंत केवळ 6 हजार रुपये मासिक मानधन दिले जात होते. आता यात वाढ करुन 20 हजार रुपये दिले जातील. याशिवाय हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तुमे हिंद स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूंचे मानधन 4 हजार रुपयांवरुन 15 हजार रुपये करण्यात आले आहे. तसेच, अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडूंचे मानधन 6 हजार रुपयांवरुन 20 हजार रुपये करण्यात आले आहे.
गादीत शिवराज राक्षे
गादी विभागात शिवराज राक्षेने हर्षवर्धन सदगीरला अस्मान दाखवले. हे दोघेही काकासाहेब पवार आंतराष्ट्रीय कुस्ती संकुल या एकाच तालमीतील पैलवान आहेत. हर्षवर्धन सदगीरवर शिवराज राक्षेनं 8-1 असा एकतर्फी विजय मिळवला.
मातीत महेंद्रची बाजी
माती विभागात महेंद्र गायकवाड व सिकंदर शेख यांच्यात सामना झाला. त्यात 3 मिनिटांच्या पहिल्या फेरीत दोन्ही पैलवानांनी आक्रमक खेळी केली. यावेळी पंचांनी त्यांना कुस्ती करून गुण मिळवण्याची वॉर्निंग दिली. त्यानंतर महेंद्र गायकवाडला 1, तर सिकंदर शेखला पहिल्या फेरीत 2 गुण मिळाले. त्यानंतर महेंद्रने चमकदार कामगिरी करत सिकंदरवर 5 विरुद्ध 4 अशा मतफरकाने विजय मिळवला.
एकाच गुरुचे चेले
शिवराज राक्षे हा राजगुरूनगरच्या राक्षेवाडी (जि. पुणे) येथील आहे. तो वस्तात काका पवार आणि गोविंद पवार यांच्याकडे कात्रजच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात करतो. महेंद्र गायकवाड हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातल्या शिरसीचा (जि. सोलापूर) आहे. हा पठ्ठ्याही वस्ताद काका पवार आणि गोविंद पवारांचा शिष्य आहे. तो सुद्धा कात्रजच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सराव करतो.
थार जीपचे बक्षीस
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्याला महिंद्रा थार जीप आणि पाच लाखांचे रोख बक्षीस मिळणार आहे. तर उपविजेत्याला ट्रॅक्टर आणि रोख अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम स्पर्धेत माती विभागातून विजयी झालेला महेंद्र गायकवाड विरुद्ध गादी विभागातून जिंकलेला शिवराज राक्षे यांच्यात लढत होणार आहे.
वडील, आजोबा पैलवान
सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड म्हणाला, माझे वडील, आजोबा हे सुध्दा पैलवान होते. त्यांच्याकडूनच माझ्यात कुस्ची आवड निर्माण झाली. सुरुवातीला कुस्तीची तयारी घराजवळील आखाडयात केली. त्यानंतर पुण्यातील कात्रज परिसरातील काका पवार यांच्या तालमीत येऊन तयारी सुरू केली.
अशी केली तयारी
महेंद्र गायकवाड पुढे म्हणाला की, कुस्ती शास्त्रोक्त पद्धतीने कशाप्रकारे करायची, प्रतिस्पर्धावर डावपेच टाकणे, कमी वेळात समोरच्यास चितपट करणे, स्वत:ची शारीरिक क्षमता विकसित करणे याची माहिती मला सरावादरम्यान मिळाली. त्याचप्रमाणे संकुलातील अनुभवी खेळाडूंचे मार्गदर्शन ही वेळोवेळी मिळाल्याने त्याचा खेळात फायदा झाल्याचे तो म्हणाला.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची आजपर्यंतची ठिकाणे व विजेते
- 1961- औरंगाबाद- दिनकर दह्यारी
- 1962- धुळे- भगवान मोरे
- 1963- सातारा- स्पर्धा रद्द
- 1964- अमरावती- गणपत खेडकर
- 1965- नाशिक- गणपत खेडकर
- 1966- जळगाव- दिनानाथ सिंह
- 1967- खामगाव, बुलढाणा- चंबा मुतनाळ
- 1968- अहमदनगर- चंबा मुतनाळ
- 1969- लातूर- हरिश्चंद्र बिराजदार
- 1970- पुणे- दादू चौगुले
- 1971- अलिबाग, रायगड- दादू चौगुले
- 1972- कोल्हापूर- लक्ष्मण वडार
- 1973- अकोला- लक्ष्मण वडार
- 1974- ठाणे- युवराज पाटील
- 1975- चंद्रपूर- रघुनाथ पवार
- 1976- अकलूज, सोलापूर- हिरामण बनकर
- 1977- चाळीसगाव, जळगाव- अनिर्णित
- 1978- मुंबई- आप्पासाहेब कदम
- 1979- नाशिक- शिवाजीराव पाचपुते
- 1980- खोपोली, रायगड- इस्माईल शेख
- 1981- नागपुर- बापू लोखंडे
- 1982- बीड- संभाजी पाटील
- 1983- पुणे- सरदार खुशहाल
- 1984- सांगली- नामदेव मोळे
- 1985- पिंपरी चिंचवड, पुणे- विष्णु जोशीलकर
- 1986- सोलापूर- गुलाब बर्डे
- 1987- नागपुर- तानाजी बनकर
- 1988- अहमदनगर- रावसाहेब मगर
- 1989- वर्धा- अनिर्णित
- 1990- कोल्हापूर- अनिर्णित
- 1991- अमरावती- अनिर्णित
- 1992- पुणे- आप्पालाल शेख
- 1993- बालेवाडी, पुणे- उदयराज जाधव
- 1994- अकोला- संजय पाटील
- 1995- नाशिक- शिवाजी केकान
- 1996- स्पर्धा रद्द
- 1997- देवळी, वर्धा- अशोक शिर्के
- 1998- नागपुर- गोरखनाथ सरक
- 1999- पुणे- धनाजी फडतरे
- 2000- खामगाव, बुलढाणा- विनोद चौगुले
- 2001- नांदेड- राहुल काळभोर
- 2002- जालना- मुन्नालाल शेख
- 2003- यवतमाळ- दत्तात्रय गायकवाड
- 2004- वाशी- चंद्रहास निमगिरे
- 2005- इंदापूर, पुणे- सईद चाउस
- 2006- बारामती, पुणे- अमोल बुचडे
- 2007- औरंगाबाद- चंद्रहार पाटील
- 2008- सांगली- चंद्रहार पाटील
- 2009- सांगवी, पुणे- विकी बनकर
- 2010- रोहा, रायगड- समाधान घोडके
- 2011- अकलूज, सोलापूर- नरसिंग यादव
- 2012- गोंदिया- नरसिंग यादव
- 2013- भोसरी- नरसिंग यादव
- 2014- अहमदनगर- विजय चौधरी
- 2015- नागपुर- विजय चौधरी
- 2016- वारजे, पुणे- विजय चौधरी
- 2017-भुगाव, पुणे- अभिजीत कटके
- 2018- जालना- बाला रफिक शेख
- 2019- बालेवाडी, पुणे- हर्षवर्धन सदगीर
- 2022- सातारा- पृथ्वीराज पाटील
महाराष्ट्र केसरीशी संबंधित इतर बातम्या वाचा…
दिवसा हमाली, रात्री कुस्तीचे धडे:वडिलांनी सिकंदरला कमी पडू दिला नाही खुराक, आज महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी खेळणार
महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आज अखेरचा दिवस आहे. हा किताब पटकवण्यासाठी माती विभागातून सिकंदर शेख व महेंद्र गायकवाड, तर गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर व शिवराज राक्षे मैदानात आहेत. हे सगळेच पट्टीचे पैलवान आहेत. त्यामुळे स्पर्धेत मोठी रंगत पाहावयास मिळत आहे. पण आतापर्यंत झालेल्या लढती पाहता सिकंदर शेख हा सर्वच पैलनावानांवर वरचढ ठरत असल्याचे चित्र आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी…
हर्षवर्धन सदगीर दुसऱ्यांदा किताबावर नाव कोरणार का?:दोघांमित्रांमध्येच होणार लढत, कोण मारणार बाजी?
हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरीच्या किताबावर दुसऱ्यांदा नाव कोरणार का, याकडे महाराष्ट्रातील तमाम कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेतील अंतिम लढतींचा थरार आज रंगणार आहे. गादी आणि माती विभागातील अंतिम लढती प्रथम होतील, त्यानंतर दोन्ही गटातील विजेत्यांमध्ये महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी लढत होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना पार पडणार आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी…