इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात आत्तापर्यंत अनेक युवा खेळाडूंनी छाप पाडली आहे. यात आता आणखी एका खेळाडूचे नाव जोडले गेले आहे, तो खेळाडू म्हणजे मुकेश चौधरी. चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएलमध्ये याच वर्षी त्याने पदार्पण केले आहे. पदार्पणानंतर पहिल्या काही सामन्यात तो फारसा प्रभाव टाकू शकला नव्हता, पण जसजशी स्पर्धा पुढे जात गेली, तशी तो छाप पाडण्यात यशस्वी ठरला. गुरुवारी तर त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना सामनावीराचा पुरस्कारही जिंकला.
गुरुवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात सामना झाला. हा सामना चेन्नईने अखेरच्या चेंडूवर ३ विकेट्सने जिंकला. चेन्नईच्या या विजयात मुकेश चौधरीने महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने ३ षटकांत १९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे त्याने मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन यांना शुन्यावर बाद केले. तसेच त्याने डेवाल्ड ब्रेविस याला देखील बाद केले. त्याने घेतल्या या तीन विकेट्समुळे मुंबई बॅकफुटवर पडली होती. याच मुकेश चौधरीने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहलीलाही केवळ १ धावेवर बाद केले होते.
कोण आहे मुकेश चौधरी?
पहिल्याच आयपीएल हंगामात विराट-रोहितसारख्या खेळाडूंच्या विकेट्स घेणारा हा कोण आहे मुकेश चौधरी, हे जाणून घेऊ. मुकेश चौधरी २५ वर्षांचा असून त्याचा जन्म राजस्थानमधील भिलवाडा येथे झाला आहे. असे असले तरी तो देशांतर्गत क्रिकेट महाराष्ट्र संघाकडून खेळतो. तसेच त्याने पुण्यात क्रिकेटचे धडे गिरवले आहेत.
मुकेशने २०१७ मध्ये महाराष्ट्र संघाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये रेल्वेविरुद्ध त्याचा पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला होता. त्याने महाराष्ट्र संघाकडून तिन्ही प्रकारच्या क्रिकेटचे प्रतिनिधित्तव केले आहे. त्याने आत्तापर्यंत १३ प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यात त्याने ३८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने १२ अ दर्जाचे सामने खेळले असून १७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर तो १८ टी२० सामनेही त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत खेळला असून त्याने २३ विकेट्स घेतल्या आहेत.
गेल्यावर्षी चेन्नईचा नेट गोलंदाज
मुकेश हा आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा नेट गोलंदाज होता. त्यामुळे त्याच्यावर चेन्नई संघव्यवस्थापनाची नजर होती. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या आयपीएल २०२२ च्या लिलावात चेन्नईने त्याच्यावर २० लाखाच्या मुळ किंमतीत बोली लावली आणि आपल्या संघात सामील करून घेतले. मुकेशला चेन्नईने फक्त संघात घेतले नाही, तर त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला पदार्पणाची संधी दिली. त्याने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यातून चेन्नईकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ६ सामन्यांत ७ विकेट्स घेतल्या आहेत.