नाशिक/नगर6 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या 80 किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले आहे. यावेळी दोघांनीही कोनाशिलेचे अनावरण केले. त्यानंतर येथे उभारलेल्या व्यासपीठावर दीपप्रज्वलन केले.
तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या महामार्गामुळे नाशिक ते शिर्डी हे अंतर जलदरित्या कापता येणे शक्य होणार आहे.
7 मोठे पूल 30 भुयारी मार्ग
समृद्धी महामार्गावर 7 मोठे पूल, 18 छोटे पूल, वाहनांसाठी 30 भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी 23 भुयारी मार्ग, 3 पथकर प्लाझावरील तीन इंटरचेंज, 56 टोल बूथ, 6 वे ब्रिज आदी सुविधांचा समावेश आहे. पॅकेज क्र 11,12 आणि 13 चे इगतपुरी तालुक्यामधील भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचा खर्च 3200 कोटी रुपये एवढा असून लांबी 80 कि मी आहे. या टप्याच्या उद्घाटनानंतर 701 कि.मी पैकी आता एकूण 600 कि.मी लांबीचा समृध्दी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
महामार्गाचा हा आहे फायदा
या दुसऱ्या टप्यात सिन्नर येथील गोंदे इंटरचेंज येथून नाशिक, अहमदनगर, पुणे व त्या भागातील इतर गावांसाठी या महामार्गाचा उपयोग होईल. भरवीर इंटरचेजपासून घोटी (ता. इगतपुरी) हे अंदाजे 17 कि.मी अंतरावर आहे. या इंटरचेंजपासून नाशिक, ठाणे, मुंबई येथून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास जलद होईल. तसेच भरवीर ह्या इंटरचेजपासून एस.एम.बी.टी रुग्णालय अत्यंत जवळ (500 मीटर अंतरावर) आहे. शिर्डीपासून ह्या रुग्णालयापर्यंत एक तासाच्या आत पोहचता येईल. याशिवाय शिर्डी, अहमदनगर व सिन्नर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येण्यासाठी कमी कालावधी लागेल.
- या टप्यात अहमदनगर जिल्हयातील कोपरगाव तालुक्यातील एकूण 7 गावातून लांबी 11.141 कि.मी. नाशिक जिल्हयातील एकूण 68.036 कि.मी. लांबी पैकी सिन्नर तालुक्यातील एकूण 26 गावातून 60.969 कि.मी. व इगतपूरी तालुक्यातील 05 गावातील 7.067 कि.मी लांबीचा समावेश आहे.
- त्यामध्ये पॅकेज – 11अंतर्गत कोकमठाण, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर, पॅकेज – 12 अंतर्गत गोदे ता. सिन्नर, जि. नाशिक व पॅकेज- 13अंतर्गत एस.एम.बी.टी. मेडिकल कॉलेज, भरवीर, ता. इगतपूरी, जि. नाशिक या इंटरचेंजचा समावेश आहे.
- विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील 24 जिल्ह्यांच्या विकासासाठी गेमचेंजर ठरणाऱ्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर 20 22 रोजी केले होते.
- लोकार्पणानंतर हा महामार्ग खुला झाला, त्यामुळे नागपूर ते शिर्डी अंतर 10 तासांऐवजी फक्त पाच तासातच कापणे शक्य झाले आहे. पाच महिन्यांत लाखो वाहनधारकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केला आहे.