अहमदनगर6 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
महाविकास आघाडीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भविष्यकार तयार झाले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सध्या कोणतेही काम राहीलेले नाही.त्यामुळेच भविष्य सांगण्याचा धंदा त्यांनी सुरू केला.अशी टीका राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी रविवारी 22 (जानेवारी) ला करून पोपटपंची करणाऱ्या भविष्यकारांकडून जेवढ्या तारखा सांगितल्या जातील तेवढा सरकारचा कालावधी अधिक मजबूतीने वाढत जाणार आहे. असा विश्वास पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
अहमदनगर जिल्हा भाजपच्या संघटनात्मक कार्याचा आढावा बैठक मंत्री विखे यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.उत्तर महाराष्ट्राचे संघटन मंत्री रवी अनासपुरे, आमदार बबनराव पाचपुते खासदार डॉ.सुजय विखे, दक्षिण भाजपचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, उत्तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर शहराध्यक्ष भैय्या गंधे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आदी यावेळी उपस्थित होते.
मंत्री विखे म्हणाले,सरकारच्या संदर्भात त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्याची कीव येते.महाविकास आघाडीच्या नेत्यांना सध्या कोणतेही काम राहीलेले नाही.त्यामुळेच भविष्य सांगण्याचा धंदा त्यांनी सुरू केला असला,तरी त्यांची पोपटपंची वायफळ आणि तथ्यहीन आहे. ते जेवढ्या तारखा जाहीर करतील तेवढा शिंदे -फडणवीस सरकारचा कालावधी अधिक मजबूतीने वाढणार असल्याचा टोला त्यांनी लगावला.
यापुर्वी जनतेने भाजप- शिवसेनेला राज्यातील स्थापनेचा कौल दिला होता.परंतू जनतेशी गद्दारी करून शिवसेनेने महाभकास आघाडी निर्माण केली होती.विचारांशी प्रतारणा झाल्यानेच एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार आणि खासदार बाहेर पडले. त्यांनाच निवडणूक आयोगाने आता बाळासाहेबांची शिवसेना म्हणून मान्यता दिली असल्याकडे लक्ष वेधून मंत्री विखे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या काळात वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे होणारे अनावरण हा महाराष्ट्रातील प्रत्येक माणसांसाठी अभिमानाचा क्षण आहे. परंतू त्या कार्यक्रमाबाबत ठाकरे गटाला दुर्बुध्दी सूचत असल्याची टिका त्यांनी केली.
सत्यजित तांबे यांच्यावर खरच अन्याय झाला असेल तर त्यांनी जाहीरपणे मांडावा
नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत पक्ष नेतृत्व जो निर्णय करून आदेश देतील, त्या उमेदवाराचे काम पदाधिकारी आणि कार्यकर्ते करतील. काँग्रेस पक्षात सत्यजीत तांबे यांच्यावर खरंच अन्याय झाला असेल ,तर तो त्यांनी जाहीरपणे मांडण्याचा सल्ला मंत्री विखे यांनी दिला.