नाशिक3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
शहर धान्य वितरण कार्यालय हे जिल्हाधिकारी कार्यालयात हलविण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे, विषेश म्हणजे यासाठी नाशिकरोड येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही साथ दिल्याने नाशिकरोडकरामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
नाशिकरोड परिसरात असल्याने नाशिकरोडसह देवळाली कँम्प, शिंगवे बहुला, भगुर, नानेगाव, शिंदे, पळसे, एकलहरा, कोटमगाव, चाडेगाव, विहीतगाव, वडनेर दुमाला, देवळालीगाव, सिन्नरफाटा, जेलरोड, उपनगर, जय भवानी रोड, नाशिकरोड येथील नागरिकांना शिधापत्रिका काढणे, त्यामध्ये नाव वाढविणे, नाव कमी करणे, तसेच स्वस्त धान्य दुकानदारांविषयी काही तक्रार असतील त्या मांडणे यासाठी सोयीचे जाते. तसेच या ठिकाणी वाहन पार्किंगसाठी जागाही असल्याने ती गैरसोय दुर झाली आहे, परंतू शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे) वतीने हे कार्यालय हलवण्याची मागणी करण्यात आली.
शिवसेनेने (उध्दव ठाकरे गट) माजी मंत्री बबन घोलप, सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करजंकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आणि वसंत गीते यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेवुन शहर धान्य वितरण कार्यालय हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हलविण्याची मागणी केली. तसेच सोबत सिडको, सातपुर, पंचवटी, नाशिकरोड अशा विभागनिहाय उपकार्यालय स्थापन करण्याची मागणी केली. परंतू अनेक वर्षापासून धान्य वितरण कार्यालयात मनुष्यबळ अपुरे असल्याने खासगी कर्मचारी ठेवुन काम करावे लागते.
सर्व्हरचा कायम स्वरुपी समस्या असल्याने शिधापत्रिका तयार होते, परंतू त्याची आँनलाईन नोंदणी होत नसल्याने हातात शिधापत्रिका असुनही सर्व सामान्य नागरिकांना स्वस्त धान्यापासुन वंचित रहावे लागत आहे.अशाच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विभाग निहाय कार्यालयाची मागणी केली आहे.
राज्य शासनाच्या तिजोरीवर आर्थिक भार येत असल्याने गेल्या अनेक वर्षापासुन सरकारी कार्यालयात शिपाई, वाहनचालक यांची भरती बंद केली आहे. ही पार्श्वभुमी माहिती असतांनाही शिवसेनेच्या या मागणीबाबत नाशिकरोड मध्ये उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.यावेळी नितीन चिडे, मसुद जिलानी, सुधाकर जाधव, जगन आगळे, सागर निकाले, योगेश देशमुख, स्वप्निल औटे हे उपस्थित होते.
नाशिकरोडकरांची होणार गैरसोय
शहर धान्य वितरण कार्यालय हे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात स्थलांतरित झाल्यास नाशिकरोड शहरासर परिसरातील गावातील नागरिकांना शिधापत्रिका काढण्यासाठी, किंवा दुरुस्त करण्यासाठी नाशिक शहरात जावे लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल.
”शहर धान्य वितरण कार्यालय हे जिल्हाधिकारी कार्यालयात स्थलांतरित करुन प्रत्येक विभागनिहाय उपकार्यालय सुरु करण्याची शिवसेनेची मागणी आहे.” – नितिन चिडे, पदाधिकारी शिवसेना.
”नाशिकरोडचा वाढता विस्तार लक्षात घेवुन शहर धान्य वितरण कार्यालय हे नाशिकरोडलाच ठेवावे, तसेच आरटीओचे चे उपक्रेंद देखील नाशिकरोडला उभारण्यात यावे. जेणेकरुन नाशिकरोडकरांची गैरसोय होणार नाही.”– जिम्मी देशमुख, पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस.