औरंगाबाद10 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
मसिआतर्फे आयोजित औद्योगिक टी-20 क्रिकेट स्पर्धेत कॉस्मो फिल्म्स संघाने शानदार विजय मिळवला. गरवारे स्टेडियमवर बुधवारी झालेल्या सामन्यात फार्मा स्ट्रायकर्सवर 38 धावांनी मात केली. या सामन्यात भास्कर जिवरग सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कॉस्मोने 20 षटकांत 6 बाद 181 धावा उभारल्या. यात सलामीवीर सतिशने 14 चेंडूंत 4 चौकारांसह 23 धावा केल्या. कर्णधार रोहन हंडिबागने 40 चेंडूंत 2 चौकार खेचत सर्वाधिक 45 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या सनी राजपूतने 24 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार मारत 42 धावा काढल्या. रोहन व सनी जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 62 धावांची भागीदारी केली. अष्टपैलू भास्कर जिवरगने 15 व विराज चितळेने 6 धावा केल्या. पवन थोरेने 14 चेंडूंत 3 चौकार खेचत नाबाद 24 धावा जोडल्या. फार्माकडून साई दहाळेने 2 आणि अमोल ढेंगळे, अमित चोपडा व सुनिल पल्लोड यांनी प्रत्येकी एक एक गडी बाद केला.
अनिरुद्ध शास्त्रीचे अर्धशतक व्यर्थ
प्रत्युत्तरात फर्मा स्ट्रायकर्स निर्धारित षटकांत 6 बाद 143 धावा करु शकला. संघाचे आघाडीचे चार फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. कर्णधार अनिरुद्ध शास्त्रीने अर्धशतक झळकावले. त्याने ५७ चेंडूंचा सामना करताना 9 चौकार व 2 षटकार खेचत नाबाद 74 धावांची खेळी केली. मात्र संघाच्या पराभवामुळे त्याचे अर्धशतक व्यर्थ ठरले. संजय बनकरने 28 चेंडूंत 2 चौकारांसह 24 धावा जोडल्या. संजय व अनिरुद्ध जोडीने चौथ्या गड्यासाठी 65 धावांची भागीदारी केली. अमित चोपडा 18 धावांवर नाबाद राहिला. कॉस्मोकडून भास्कर जिवगरने 16 धावा देत 3 गउी बाद केले. रोहन हंडिबाग, पवन थोरे, महेंद्र ढागे यांनी प्रत्येकी एकाला टिपले.