नागपूरएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने ऐन वेळेवर कच खाल्ल्याने शिवसैनिकांत नाराजी आहे. परिणामी नागपूर ग्रामीणचे उपजिल्हा प्रमुख दिलीप माथनकर यांनी राजीनामा दिला आहे. ऐन वेळेवर उमेदवारी मागे घ्यायला लावणे शिवसैनिकांना खूपच बोचले आहे. अनेकजण माझ्याजवळ नाराजी व्यक्त करीत असल्याचे माथनकर यांनी सांगितले. तर रात्री उशिराच्या घडामोडीत काँग्रेसने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांना पाठींबा जाहीर केला.
अर्ज का भरायला लावला?
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिक्षक सेनेचे गंगाधरराव नाकाडे यांनी मुंबईतून आलेल्या आदेशानंतर माघार घेतली. ही गोष्ट शिवसैनिकांच्या मनाला लागली आहे. या निवडणुकीत नाकाडे हे शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे उमेदवार होते. गंगाधरराव नाकाडे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, असे शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी जाहीर केले होते. उमेदवारी मागेच घ्यायची होती. तर जाहीर करून अर्ज का भरायला लावला असा सवाल शिवसैनिक करीत आहे.
काँग्रेसच्या मागे फरपटत जायचे होते तर….
नाकाडे यांचा अर्ज भरण्याचा आदेश आल्यानंतरच उमेदवारी दाखल केली होती. पहिला टप्पा पूर्ण झाला होता. पक्ष संघटनेने अधिकृत उमेदवाराला माघारी बोलावून चांगले केले नाही. पक्ष अडचणीत असताना उभारी देण्याऐवजी मनोधैर्य खच्ची करणे चांगले नाही. मी वर्षापासून 30 शिवसैनिक आहे. नाकाडे यांच्या उमेदवारीने नवचैतन्य संचारले होते. सुधाकर अडबाले यांना पाठींबा जाहीर करायचा होता, काँग्रेसच्या मागे फरपटत जायचे होते तर उमेदवारीच जाहीर करायची नव्हती असे माथनकर यांनी सांगितले. भाजपाचे नागो गाणार, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले हे तीन प्रमुख उमेदवार रिंगणात आहे.