मराठीचे विचारविश्व व सध्याचे वैचारिक लेखन


‘वैचारिक’ या सदरात मोडणारे जे लेखन होत आहे, ते अगदी ‘सुमार’ दर्जाचे असते. या तक्रारीचे विश्लेषण करायचे झाल्यास परंपरेने ‘वैचारिक लिखाण’ कशास म्हटले आहे

Advertisement

श्री. मा. भावे यांनी संपादक या नात्याने ‘नवभारत’ मासिकात विविध विषयांवर विपुल लेखन केले. त्यांच्या या लिखाणापैकी निवडक लेख ‘नवभारतमधील लेख’ या पुस्तकाद्वारे श्री. मा. भावे सुहृद मंडळ व राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. उन्मेष अमृते संपादित या पुस्तकातील वैचारिक लेखनासंबंधीचा श्री. मां.चा हा संकलित लेख…

गेल्या दोन-तीन वर्षांत अशी तक्रार बरेचदा ऐकू येत आहे की, मराठीत सध्या वैचारिक लेखन होत नाही. ‘वैचारिक’ या सदरात मोडणारे जे लेखन होत आहे, ते अगदी ‘सुमार’ दर्जाचे असते. या तक्रारीचे विश्लेषण करायचे झाल्यास परंपरेने ‘वैचारिक लिखाण’ कशास म्हटले आहे; वैचारिक लेखनाची कोणती मानके मराठी समाज मानत आला आहे; वैचारिक लिखाणाविषयीची प्रचलित समज पुरेशी व्यापक आहे की नाही; सध्याच्या समजुतीत ज्याला वैचारिक लिखाण मानले जात नाही त्या लिखाणाचा समावेश आपण ‘वैचारिक लेखन’ या सदरात केल्यास आपले वैचारिक वाङ्मय समृद्ध आहे असा निष्कर्ष काढता येईल का; या व अशा पैलूंचा विचार करावा लागेल.

Advertisement

आपल्याकडे मुद्रणकला एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात वापरात आली. पण पाश्चात्त्य समाजाच्या विचारविश्वात मुद्रणामुळे जे सर्वांगीण परिवर्तन घडून आले, तसे इथे झाले नाही. येथील सामाजिक वास्तव, ज्ञानाची व शिक्षणाची परंपरा आणि मुख्य म्हणजे ब्रिटिश राजवट यांच्यामुळे येथील वैचारिकतेला एकारलेपणा आला. 

ब्रिटिशकाळात काही मराठी विद्वानांनी उदा. डॉ. भांडारकर, लोकमान्य टिळक इंग्रजीतून ग्रंथ आणि शोधनिबंध लिहून जागतिक स्तरावरही चांगली कीर्ती संपादन केली. तथापि, शोधनियतकालिके किंवा वैज्ञानिक व सामाजिक शास्त्रावरील ग्रंथनिर्मिती यांच्या बाबतीतील प्रगती नगण्य होती.  

Advertisement

इंग्रजांनी भारताविषयी केलेल्या लेखनातून (उदा. जेम्स मिलने लिहिलेला ‘हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया’ हा ग्रंथ) हिंदी लोकांच्या मागासलेपणाची जी लक्षणे सांगितली जात, त्यात स्त्रियांवरील अन्याय, मूर्तिपूजा, बळी देणे अशा प्रथांचा उल्लेख केला जाई. बंगालधील भद्र लोकांचे या चर्चांकडे फार लक्ष असे. त्यांच्यातील मोठे पुढारी राजा राममोहन रॉय, पंडित विद्यासागर, महर्षी देवेन्द्रनाथ टागोर यांनी सतीप्रथेला विरोध, विधवा विवाह, अमूर्त ब्रह्माची उपासना करणारा ब्राह्मो समाज यांसारख्या चळवळी सुरू केल्या. तो आदर्श पुढे ठेवून आपल्याकडील नवसुशिक्षितांनीदेखील विधवा विवाह, स्त्रीशिक्षण, प्रार्थना समाज या चळवळी हाती घेतल्या. याबाबतचे विचारविनिमय व योजना इंग्रजीतूनच मांडल्या जात. पण थोड्याच दिवसांत असे ध्यानात आले की, नव्या विचारांचा प्रसार सामान्य माणसापर्यंत पोचण्यासाठी या चळवळींविषयी मराठीतूनही बोलले व लिहिले गेले पाहिजे. या चळवळींच्या अनुषंगाने मराठीतील वैचारिकता प्रौढ होत गेली.

कंपनीचा कारभार चालवण्यासाठी इंग्लंडहून जे अधिकारी येत ते नवीन प्रबोधन युगातील विचारांच्या प्रभावाखाली असत. जर समाजोपयोगी कायदे केले आणि शिक्षणाच्याद्वारे समाजात नव्या विचारांची पेरणी केली तर समाजातील शक्तींचा विधायक कार्यासाठी उपयोग होऊन सामाजिक जीवन संपन्न व सौहार्दपूर्ण होते असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळे कंपनी सरकारने व नंतर इंग्रज सरकारने खाजगी मालमत्तेला संरक्षण देणारे कायदे केले, धर्मांतर केले तरी वारसाहक्काने येणाऱ्या संपत्तीवर धर्मांतरितांचा हक्क राहील असा कायदा केला, विधवा विवाहाला कायद्याची मान्यता दिली, संमतिवयाचा कायदा केला. या सर्व कायद्यांचे उद्देश आपल्या समाजाच्या दृष्टिकोनातून विघातक व अनिष्ट होते. पण नवसुशिक्षितांनी यातील बहुतेक कायद्यांचे समर्थन केले. याविषयीचे वाद वृत्तपत्रांतून, सभांतून, उलटसुलट पत्रकांतून रंगले. या चळवळींच्या द्वारे समाजशिक्षण होत गेले. मराठीतील वैचारिक लेखनाचा मोठा भाग या चळवळींच्या अनुषंगाने घडत गेला. इंग्रजी शिक्षण घेतलेल्या याच लोकांना नंतर अशी इच्छा झाली की, राज्यकारभारात आपण राज्यकर्त्यांकडून अधिकाधिक वाटा मिळवला पाहिजे. राज्यकर्त्यांची मर्जी संपादून, त्यांच्याकडे हट्ट धरून, समाजातील इतर घटकांच्या पाठिंब्याचा दबाव आणून किंवा सरकारी निर्णयांच्या विरोधात लोकचळवळी उभ्या करून ही मुख्य मागणी सरकारच्या गळी उतरवणे शक्य होईल असे या सुशिक्षित पुढाऱ्यांना वाटले. सामान्य मनुष्याच्या पाठबळाची गरज असल्याने या चळवळींचा प्रचार मराठी वृत्तपत्रांतून लेख लिहून, मराठीतून भाषणे करवून, गावोगावी चळवळीची केंद्रे स्थापून व तेथे जनतेचे हक्क, सरकारकडून होणारे अन्याय यांच्याविषयी मराठीतून चर्चा घडवून करण्यात आला. मराठीतील विचारविश्वाची घडण व वैचारिक वाङ्मयाचा विकास कोणत्या ना कोणत्या चळवळीच्या आधारे होत गेला.

Advertisement

तीसच्या दशकात देशात चार प्रकारच्या राजकीय विचारप्रणाली प्रामुख्याने वावरत होत्या. त्या म्हणजे गांधीवाद, साम्यवाद, समाजवाद व थोड्या उशिराने मंचावर आलेला हिंदुत्ववाद. या चारही विचारप्रणालींचे नजीकचे ध्येय हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देणे हेच होते. सत्याग्रह, अहिंसा, आत्मक्लेश व विरोधकांचे हृदय परिवर्तन यांच्या साहाय्याने स्वातंत्र्य मिळवता येते आणि तसेच ते मिळवले पाहिजे, हा गांधीवाद्यांचा आग्रह होता. समाजवादी व साम्यवादी या दोघांचीही इच्छा लोकचळवळीतून, वाटल्यास हिंसक कृत्येही करून स्वातंत्र्य मिळवावे अशी होती. जे स्वातंत्र्य मिळावयाचे त्यात रयतेला आपल्या इच्छांची पूर्तता होईल याचे आश्वासन मिळायला हवे. त्यासाठी या दोन्ही प्रणाली आर्थिक व सामाजिक न्यायाचे आश्वासन देत होत्या आणि दोन्ही विचारप्रणालींचा खासगी मालमत्तेला विरोध होता. दोघांत फरक असा होता- समाजवाद्यांना समता ही लोकशाही सरकारने कायदे करून अमलात आणावी असे वाटत होते; तर साम्यवादी यासाठी सशस्त्र क्रांती व्हावी लागेल, या मताचे होते. हिंदुत्ववाद्यांची भीती अशी होती की, गांधीजींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष मुसलमानांना अवाजवी सवलती देऊन हिंदूंच्या हिताचा नाश करील. तेव्हा काँग्रेसवर दबाव आणणारा हिंदू महासभा हा हिंदुत्ववादी पक्ष त्यांनी स्थापन केला होता.

टिळकांच्या मृत्यूनंतरच्या काळात वैचारिक नियतकालिकांनी महाराष्ट्रातील वैचारिक लेखनाला उत्तेजन दिले. ‘विविधज्ञानविस्तार’ नावाचे मासिक १८६०च्या दशकापासून चालत आले होते. पण आता ‘चित्रमयजगत्’, ‘लोकशिक्षण’ (आधी ओकांचे व नंतर जांभेकरांचे), ‘किर्लोस्कर’ व थोड्या उशिराने ‘सह्याद्री’ ही चर्चानियतकालिके सुरू झाली. यांनी वर सांगितलेल्या चार विचारप्रणालींची चर्चा तर चालवलीच, पण समाजात वेळोवेळी ज्या विचारांच्या लहरी- उदा. नवमतवाद, बुवाबाजी व अंधश्रद्धा यांच्यावर टीका, फ्रॉइडचे मानसशास्त्र-  उद्भवल्या त्यांचीही साक्षेपी नोंद घेतली. र. धों. कर्वे यांचे ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक लैंगिक समस्या व लैंगिक आरोग्य यांची तळमळीने चिकित्सा करीत असे.

Advertisement

महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांना जी सुधारणा अपेक्षित होती ती जातींच्या उतरंडीमुळे हिंदू समाजात भिनलेली भीषण विषमता नष्ट करणारी सुधारणा. त्या विषमतेचा सर्वात दाहक प्रत्यय अस्पृश्यतेतून येत होता. डॉ. आंबेडकरांच्या पूर्वीही शिवराम जानबा कांबळे यांनी ‘सोमवंशीय मित्र’ नावाचे मासिक चालवून अस्पृश्यांच्या सुधारणेसाठी प्रचार चालवला होता. परंतु डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या हक्कांसाठी चळवळ सुरू केली. त्यासाठी त्यांनी वृत्तपत्रे काढली, संघटना उभारली, सत्याग्रह केले, व्याख्याने दिली. त्यानंतर गांधीजींनी अस्पृश्यता निवारणाची चळवळ हाती घेतली. स्वामी केवलानंद सरस्वती, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कोकजे शास्त्री, भाऊजी दफ्तरी या विद्वानांनी ‘धर्मनिर्णय मंडळ’ नावाची संस्था काढली व सनातन्यांच्या विरोधात पुस्तिका काढून वाटल्या, लेख लिहिले, विद्वत्सभांकडून अस्पृश्यताविरोधी ठराव मंजूर करून घेतले.

१८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झाल्यापासून स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या ९० वर्षांत मराठीतील विचारविश्व निरनिराळ्या विद्याशाखांच्या अभ्यासाने व विविध विचारप्रणालींच्या प्रवर्तनाने गजबजून गेले होते. असे असले तरी याच काळात पाश्चात्त्य जगातील विचारवंतांनी एकूण मानवी ज्ञानक्षेत्राचा जो अटकोविकट विस्तार झपाट्याने चालवला होता त्याच्याशी तुलना करता मराठीचे विचारक्षेत्र किती तोकडे होते हे इतिहासाचार्य राजवाड्यांनी १९१२ साली ‘महाराष्ट्रातील कत्र्या पुरुषांची मोजदाद’ या निबंधात परखडपणे दाखवून दिले होते.

Advertisement

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वांस आकृष्ट करणारे सामायिक उद्दिष्ट राहिले नाही. स्वातंत्र्यापूर्वी गांधीवाद, समाजवाद, साम्यवाद व हिंदुत्व या विचारप्रणाली महाराष्ट्रात जोमाने वावरत होत्या. त्यांपैकी गांधीवाद वगळला तर इतर विचारप्रणालींच्या प्रस्तुततेची कसोटी स्वातंत्र्यानंतरच लागावयाची होती. स्वातंत्र्यानंतर देशाने स्वत:ला ‘लोकशाही प्रजासत्ताक’ म्हणून घोषित केले. त्यामुळे निवडणुकांद्वारे सत्तेवर येण्याची संधी सर्व नागरिकांना तत्त्वत: मिळाली. परंतु प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत ही संधी पोचवण्यासाठी निरनिराळे पक्ष स्थापण्यात आले. ब्रिटिशांनी काँग्रेसकडे सत्ता सोपवली होती. त्या पक्षाने कोणत्याच विचारसरणीशी स्वत:ला बांधून घेतले नव्हते. ‘प्रजाहितार्थ राज्य चालवणे’ हेच त्या पक्षाने स्वत:चे उद्दिष्ट ठरवले होते. 

खरी अडचण हिंदुत्ववादी संप्रदायाची झाली. स्वातंत्र्यापूर्वी त्यांचे कार्य हे काँग्रेसने मुसलमानांना सवलती देण्याचे मान्य करून हिंदूंच्या हिताला बाधा पोचवू नये यासाठी हिंदूंना जागृत ठेवण्याचे होते. हे काम हिंदू महासभा हा पक्ष काढून ते करत होते. स्वातंत्र्याबरोबरच फाळणी झाली व पाकिस्तानातून हिंदू निर्वासित मोठ्या संख्येने भारतात आले. त्यावेळी हिंदुत्ववादी सांगू लागले की, आम्ही दाखवून दिलेले धोके प्रत्यक्षात उतरत आहेत व आमची प्रस्तुतता प्रकर्षाने ध्यानात येत आहे. खरे तर हिंदुत्ववादी केवळ हिंदू महासभेतच होते असे नव्हे. त्या विचारप्रणालीशी जवळीक दाखवणारे अनेक जण काँग्रेस पक्षातही होते. यावेळी जर गांधीजींचा दुर्दैवी खून झाला नसता तर कदाचित काँग्रेसमधील हिंदुत्ववादी हिंदू महासभेकडे आलेही असते. गांधीहत्येचे संकट आल्यानंतर हिंदुत्ववाद्यांना स्वत:ची विचारप्रणाली व तिच्याशी निष्ठा ठेवणारे अनुयायी यांची पुनर्घटना करावी लागली व त्यात पुढची पंचवीस वर्षे गेली.

Advertisement

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वनिष्ठ संघटना असली तरी राजकीय पक्ष नव्हता. त्याकाळचा हिंदुत्वनिष्ठ पक्ष हिंदू महासभा हा होता. हा पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे नाते काय होते, याविषयी नाना मते होती. एवढे नक्की, की रा. स्व. संघ हा हिंदू महासभेच्या राजकीय संघर्षाची जबाबदारी घेत नव्हता. गांधीहत्येनंतर हिंदुत्ववाद्यांवर राजकीय संकट कोसळले. एक म्हणजे रा. स्व. संघावर बंदी आली व दुसरे हिंदू महासभा हा पक्ष वाळीत पडला. अशा वेळी अपकर्षाकडे जाणाऱ्या हिंदू महासभेला तारण्याची खटपट न करता हिंदुत्वनिष्ठ संप्रदायाला जनसंघाच्या रूपाने नवा राजकीय पक्ष देण्याचे काम संघाने केले व त्याही स्थितीत आपण सत्ताकांक्षी राजकीय पक्ष नाही हे स्पष्ट केले.

सारांश- १९७५ साली काँग्रेस सरकारने आणीबाणीची घोषणा केली तेव्हा जे तीन संप्रदाय काँग्रेसला विरोध करणारे होते त्यातील साम्यवादी व समाजवादी संप्रदायातील लोकांनी केव्हा ना केव्हा काँग्रेसला साथ दिली होती. खुद्द काँग्रेस पक्ष विचारप्रणालीवर आधारलेला कधी नव्हताच व आता तर तो व्यक्तिनिष्ठ झाला होता.

Advertisement

जगातील साम्यवादी सरकारांची उलथापालथ झाल्यानंतर जागतिकीकरण, उदारीकरण व खाजगीकरण या धोरणांचा ‘आर्थिक सुधारणा’ या नावाखाली पुकारा केला जाऊ लागला. त्या काळात देशाची आर्थिक स्थिती निराशापूर्ण होती. त्यावेळच्या काँग्रेस सरकारने ही धोरणे स्वीकारली. साम्यवादीच नव्हे, तर हिंदुत्ववादी संप्रदायानेही या धोरणांना विरोध केला. पण तो केवळ आपले वेगळेपण दिसावे एवढ्यासाठीच होता. कारण नंतर आलेल्या सरकारांत कधी साम्यवादी संप्रदायाचे, तर कधी हिंदुत्ववादी विचारांचे प्रतिनिधी होते, तरी त्यांनी ही धोरणे चालूच ठेवली. हिंदुत्व ही प्रणाली अशी आहे की, तिच्या केंद्रस्थानी असणारा आग्रह वगळता ती इतर कोणत्याही बाबतीत तडजोडीला किंवा बदलाला तयार असते. केंद्रस्थानी असलेला आग्रह असा की, या देशात हिंदू परंपरा, हिंदू धर्म व हिंदू समाज म्हणून काही आहे व त्याला डावलून इथले सरकार कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही.

वैचारिक लेखनाचे ढोबळपणे दोन भाग पाडता येतील : एक- आवाहनात्मक व उपदेशकी वैचारिक लेखन व दोन- विवेचक व विश्लेषणात्मक लेखन. स्वातंत्र्यपूर्व काळात या दोन्ही प्रकारांचे वैचारिक लेखन चालत होते. पण ‘स्वातंत्र्य’ हे सर्वसमावेशक उद्दिष्ट सतत नजरेपुढे असल्याने पहिल्या प्रकारच्या लेखनाला वैचारिक लिखाण समजण्याकडे समाजाचा कल राहिला.

Advertisement

स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना चार वेगवेगळ्या विचारप्रणालींच्या आधाराने समाजापुढील समस्यांचे आकलन केले जाऊ लागले. मात्र, विसाव्या शतकाच्या शेवटाला परिस्थिती इतक्या झपाट्याने बदलली, की वैचारिक क्षेत्रात आघाडीला असणारी साम्यवादी विचारप्रणाली मोठ्या प्रमाणात आपली विश्वासार्हता गमावून बसली. त्याचवेळी हिंदुत्वाशी निष्ठा बाळगणारा संप्रदाय- मुख्यत: त्याची राजकीय शाखा जो भारतीय जनता पक्ष हा सामर्थ्यशाली व लोकप्रिय होत गेला. आता तर तो एकट्याच्या बळावर केंद्रस्थानी आणि राज्यांतही सत्तेवर आला आहे.

तक्रार करणाऱ्यांच्या अस्वस्थतेचे मूळ हे या त्यांच्या दृष्टीने विपरीत परिस्थितीत आहे. हिंदुत्ववादी विचारप्रणाली अतिशय लवचीक आणि गमखाऊ आहे. तिला विरोध करून किंवा त्या विचारसरणीतील दोष किंवा अंतर्विरोध दाखवून काही बौद्धिक व सांप्रदायिक समाधान लाभले तरी परिस्थिती बदलणार नाही. साम्यवादी संप्रदायाने म्हणा किंवा हिंदुत्वाविरोधी संप्रदायाने म्हणा- हिंदुत्वाचा विरोध करणे अंमळ बाजूला ठेवून आपण या कोंडीत कसे सापडलो याचा अंतर्मुख होऊन विचार केला तर चालू तकादीला काही गोमटे फळ येईल.

Advertisement

दुसरे असे की, विवेचक व विश्लेषणात्मक असे जे वैचारिक लिखाण मराठीत होत आहे, त्याला ‘सुमार’ म्हणता येणार नाही. ज्ञानाच्या नव्या नव्या क्षेत्रांत मराठी विचारवंत प्रवेश करीत आहेत. मनोरंजन व मनोरंजनाची माध्यमे यांचा अभ्यास करणारे, शेती व शेतीचे अर्थकारण यांच्या निरनिराळ्या अंगांविषयी विधायक विचार करणारे, विज्ञान व तंत्रज्ञान यांतील प्रगतीची माहिती देणारे अशा अनेक तºहांचे वैचारिक लेखन मराठीत होत आहे. 

सारांश, ‘वैचारिक लेखन सुमार होते आहे’ या तक्रारीचे मूळ वैचारिक लेखन म्हणजे आवाहनात्मक किंवा उपदेशपर लिखाण हा एकांगी दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे. अशा प्रकारच्या वैचारिक लेखनाचे पुरस्कर्ते जे साम्यवादी संप्रदायाचे लोक- त्यांच्या कुंठित अवस्थेमुळे आलेल्या नैराश्यातून ही तक्रार आली आहे. हा दृष्टिकोन सोडून जर आपण विश्लेषक व विवेचक लेखन हे वरच्या दर्जाचे व कसदार असू शकते असे मान्य केले तर मराठीत आज व पूर्वीही उत्तम दर्जाचे वैचारिक लेखन होत होते व आहे असे कळून येईल.

Advertisement

(सप्टेंबर २०१७)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

AdvertisementSource link

Advertisement