जालना36 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
मराठा आरक्षणासाठी जालन्याच्या आंतरवाली सराटीत सुरू असणाऱ्या आंदोलनावर अद्याप तोडगा निघाला नाही. सरकारने या प्रकरणी कुणबी दस्तऐवज दाखवणाऱ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. तसा GR ही काढला. पण त्यात वंशावळ दाखवण्याची अट ठेवली. त्यावर मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी हरकत घेऊन सरकारचे टेन्शन वाढवले. सरकार व आंदोलकांत खालील 3 मुद्यांवर घोडे अडले आहे.
एक
जरांगे पाटील यांनी गुरुवारी आपल्या 3 प्रमुख मागण्या पत्रकार परिषदेत मांडल्या. ते म्हणाले की, सरकारने काल काढलेल्या GR मधून वंशावळी हा शब्द वगळवा. त्याजागी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या असा उल्लेख करावा. सरकारने आमच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्या. आम्ही त्याचे स्वागत करतो. पण त्यांनी वंशावळी शब्द टाकून मोठी चूक केली.
आमच्याकडे कोणतेही कागदपत्र नाहीत. ते असते तर आम्ही स्वत: जाऊन प्रमाणपत्र घेतले असते. त्यासाठी सरकारच्या GR ची गरजच नव्हती, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
दोन
सरकारने मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली होती. हे गुन्हे मागे घेण्याचे सरकारच्याच हातात आहे. त्यासाठी अहवाल तयार करण्याची गरज नाही. एखादी समिती स्थापन करण्याचीही गरज नाही. आज ना उद्या ते निर्णय घेतीलच. पण ते गुन्हे मागे का घेत नाही हे कळत नाही. हा मुद्दा मागे पडणार नाही. द्वेषापोटी आमच्यावर टाकलेले गुन्हे मागे घ्या, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
तीन
मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर न पाठवता त्यांना थेट बडतर्फ करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, मराठा समाजावर लाठीमार करणाऱ्या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. आम्हाला ते मंजूर नाही. या अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणी सरकारने तत्काल पाऊले उचलावीत.
सरकारच्या GR चा 1 टक्काही फायदा नाही
राज्य सरकारने केवळ शब्दांची आकडेमोड करू नये. तुमच्या जीआरने आम्हाला एक टक्काही फायदा होणार नाही. त्यामुळे सरकारने आम्ही सूचवलेली दुरुस्ती करून नवा जीआर काढावा. अन्यथा आमचे आंदोलन व उपोषण सुरूच राहील, असेही मनोज जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केले.
सरकारला मी पाणी घेण्याचा व सलाईन लावण्याचा शब्द दिला होता. मी माझ्या शब्दाला जागलो. आता सरकारनेही आपल्या मनात काही एक न ठेवता आपल्या शब्दाला जागले पाहिजे, असेही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.