औरंगाबादएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
मराठा आरक्षणासाठी गत 11 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. त्यांच्या जीवितास बरेवाईट झाले तर सरकार त्यास जबाबदार राहील. महाराष्ट्र पेटून उठेल. त्यामुळे सरकारने वेळखाऊ धोरण थांबवून मराठा आरक्षणाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, अशी मागणी शुक्रवारी प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थ्यांनी क्रांती चौकात (शिवतिर्थ) केलेल्या निदर्शनांवेळी केली. यावेळी आंदोलकांनी भरपावसात ठिय्या आंदोलनही केले.
गोरगरीब मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे. 58 मोर्चे शांततेत काढूनही सरकारने खोट्या आश्वासनाशिवाय काहीच केले नाही. या विरोधात आंतरवाली सराटी खेडे गावात मनोज जरांगे पाटील नामक तरुणाने बेमुदत उपोषण आंदोलनाचे अस्र उपसले आहे. एकतर माझी अंत्ययात्रा निघेल नाहीतर मराठा आरक्षणाची यशस्वी यात्रा, अशी भीम गर्जना त्यांनी केली. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जरांगे यांना पाठिंबा दर्शवला.
भरपावसात निदर्शने
या सर्वांनी ८ ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता क्रांती चौकात एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर भरपावसात जरांगे यांच्या समर्थनार्थ सरकार विरोधात निदर्शने दिली. हे आंदोलन सुरू असताना पावसाचा जोर आणखी वाढला होता. त्यामुळे उड्डाण पुलांच्या खाली बसण्यासाठी व्यवस्था केली,. तिथे सभा पार पडली. त्यात प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सरकारच्या राजकीय धोरणांवर तीव्र संताप व्यक्त केला.
सभेत काय दिला इशारा?
मराठा आमदार व खासदारांनी मराठा आरक्षणावर आतातरी आक्रमक भूमिका घ्यावी. संसदेत, विधानसभा, विधान परिषदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, त्यामध्ये सरसकट मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी एकमताने निर्णय घेऊन अध्यादेश काढावा. नाहीतर या सर्वांना पहिले मातीत गाडण्यासाठी सर्व समाज बांधवांनी मोट बांधावी. मताच्या पेटीतून त्यांना त्यांची जागा दाखवावी, अशी भावना यावेळी निदर्शकांनी व्यक्त केली.
जरांगे पाटील यांच्या जीवितास काही झाले तर लोकप्रतिनिधींना लपण्यासाठी जागा शिल्लक राहणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाने रस्त्यावर उतरून आंदोलनाची धग अधिक तेजोमय करावी, असे आवाहन यावेळी विद्यार्थीनी शीतल कदम, अजय पवार, डॉ. कैलास अंभोरे, ललित आधाने, डॉ. दैवत सावंत, डॉ. नंदा देशमुख, डॉ. सुलक्षणा जाधव, डॉ. रंजना चावडा, डॉ. समिता जाधव, डॉ. कृतिका खंदारे आदींनी केले. संततधार पावसातही विद्यार्थी व प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला.