औरंगाबाद17 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
मराठवाड्यातील मराठा महाराष्ट्रात असूनही पारतंत्र्यात असल्यासारखी वागणूक मिळत आहे. स्वतंत्रपूर्वी काळात मराठवाडा हैदराबाद स्टेट म्हणजे निजामाच्या अंमलाखाली होता. तेव्हा एवढे हाल झाले नाही, असे हाल सध्या होत आहेत. त्यामुळे मराठवाडा मुक्ती दिनावर संपूर्ण मराठवाड्यात बहिष्कार टाकणे, तसेच सर्व मराठा बांधवांनी स्वतःच्या घरावर काळे झेंडे लावून निषेध व्यक्त करावा, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. या आशयाचे निवेदन सोमवारी विभागीय आयुक्तांना देण्यात आले.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, मराठवाडा निजामांऐवजी महाराष्ट्र मराठी भाषिक राज्यात समाविष्ट करावे म्हणून आम्ही रक्त सांडले. देशासाठी मोठे जन आंदोलन उभारले. भारत स्वतंत्र झाला. परंतु आम्ही भारताच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिने दोन दिवसांनी स्वतंत्र झालो. स्वतंत्र महाराष्ट्रात विनाअट सामील झालो, ही आमची चूक झाली की काय असे आता वाटायला लागले आहे. स्वतंत्र्यानंतर 75 वर्षांत म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षापर्यंत आमचा कोणताच विकास झालेला नाही. मराठवाड्यातील जो अनुशेष भरून काढण्याची बोलणे झाले होते आणि शब्दही दिले होते, त्याचा आतापर्यंत कोणीही विचार केलेला नाही. म्हणून आम्ही आजही महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने 60 वर्षे मागे राहिलो आहोत.
मराठवाड्यातील मराठा व शेतकरी हा कोरडवाहू जमिनीवर उपजीविका करतो. छत्रपती संभाजी नगर सोडले तर कोठेच मोठे उद्योग नाहीत. मोठ्या शैक्षणिक संस्था नाहीत. रेल्वे व विमान सारखे दळणवळण नाही. पाण्याचा तर कायमस्वरूपी दुष्काळाच आहे. तरी आम्ही कोणतीच तक्रार न करता सर्व जातीचे समाज बांधव गुण्यागोविंदाने राहत आहोत. मूळ प्रश्न आहे की मराठवाड्यातील सर्व मागास जाती समूह निजाम स्टेट मध्ये ज्याच्या त्याच्या आरक्षणाचा लाभ घेत होते. त्यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातील लोकसंख्येने 38% असणारा मराठा समाज इतर मागासवर्ग मध्ये म्हणजे ओबीसी मध्ये आरक्षित होता.
1923 ला मराठा समाजातील युवकांना निजाम स्टेटने ओबीसी आरक्षणामधून नोकरी मिळाल्या. येथे आम्हाला अमृत महोत्सवी कुणबी असल्याचे पुरावे सादर करावे लागत आहेत. सरकार आरक्षण देत नाही. कोर्टातही ते टिकत नाही. त्यामुळे गोरगरीब मराठा समाज हतबल झाला आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन करतो आहे. तेरा दिवसापासून आंतरवाली सराटी येथे जरंगे पाटील आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या तब्येतीचे अवस्था अतिशय बिकट झाली आहे. संपूर्ण राज्यात आंदोलन सुरू आहेत. तरी सरकार निर्णय घेत नसेल तर त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. शांततेत आंदोलन चालू असताना लाठी हल्ला केला जातो. गोळ्या घातल्या जातात. अश्रूधुरांचा मारा केला जातो. त्यामुळे मराठवाड्यात समाविष्ट होऊन एक प्रकारची चूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे.
.