मनोरंजन : एक अजब घर



सई गोखले – response.lokprabha@expressindia.com
‘घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम-जिव्हाळा, नकोत नुसती नाती!’ कोणतंही घर हे तिथल्या माणसांनी सजतं. घराला घरपण हे नात्यांच्या ओलाव्याने येतं. असंच एक घर १९ सप्टेंबरपासून आपल्या भेटीला आलं आहे, ते म्हणजे ‘बिग बॉस ३’चं घर! बिग बॉस मराठीच्या पहिल्या दोन पर्वाना अभूतपूर्व प्रतिसाद लाभला होता, यंदाचं पर्व देखील धमाकेदार असणार, असं दिसतंय.

Advertisement

बिग बॉसच्या घराने आतापर्यंत स्पर्धकांची अनेक रूपं पाहिली आहेत. या घरात कित्येकांनी नवीन-खोटे मुखवटे चढवले, तर अनेकांचे मुखवटे इथे उतरवले देखील गेले. भांडणं, मैत्री, राग, चिडचिड, समजूतदारपणा, आपुलकी अशा अनेक भावना या घराने अनुभवल्या. काही नाती तुटली, तर काही आयुष्यभरासाठी विणली गेली. या घराने स्पर्धकांमध्ये रंगलेली चुरस पाहिली, जिंकण्याची ओढ पाहिली, संघर्ष पाहिला. हीच सगळी धम्माल घेऊन बिग बॉसचं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

कलर्स मराठी (वायकॉम१८)चे प्रोग्रामिंग हेड विराज राजे म्हणाले, ‘गेली दोन र्वष आपण कठीण परिस्थितीचा सामना केला. या परिस्थितीमुळे बरेचजण मानसिकदृष्टय़ा खचले आहेत. अशा वेळी आम्ही असा शो घेऊन येत आहोत ज्यामध्ये १५ सदस्य आहे आणि ते सर्वजण मानसिकरीत्या खंबीर असणं आवश्यक आहे. या खेळात मानसिक स्वास्थ्य आणि खंबीरता याची कसोटी लागते. जो वाईट काळ आपण अनुभवला, त्यातून बाहेर पडून सकारात्मक आयुष्य जगावं हा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यंदाच्या पर्वात आम्ही मराठीपण आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. बिग बॉसचं घर, त्यात रंगणारे खेळ यातून त्याची झलक दिसेल. विकेन्डच्या डावाला यंदा आम्ही चावडीचं स्वरूप दिलं आहे. तिसऱ्या पर्वात काहीतरी वेगळेपणा देण्याचा आमचा मानस आहे.’

Advertisement

वेगवेगळ्या क्षेत्रांतले लोकप्रिय १५ स्पर्धक बिग बॉसच्या नजरकैदेत आहेत. यावर्षीही महेश मांजरेकर घरातील सदस्य आणि बाहेरील जग यांच्यामधील दुवा आहेत. ते सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आहेत. ‘दोन र्वष आपण सगळ्यांनीच खडतर परिस्थितीचा सामना केला आहे. या सगळ्यात बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन घेऊन मी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय याचा खूप आनंद आहे. या नव्या सिझनबद्दल मी स्वत: खूप उत्सुक आहे. बिग बॉसमुळे प्रेक्षक क्षणभर त्यांचं दु:ख विसरतील अशी मला आशा आहे.’ असं मत मांजरेकर यांनी व्यक्त केलं.

यंदाच्या पर्वातील १५ स्पर्धक विविध क्षेत्रांतील आहेत. बिग बॉसचा पहिला आठवडा हा ‘महिला विशेष’ आठवडा होता. यामध्ये स्त्रियांना काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या वाटल्या होत्या. ‘ये तो बस शुरुआत है..’ असं म्हणत हळूहळू प्रत्येक स्पर्धकाने आपापल्या पद्धतीने खेळ खेळायला सुरुवात केली आहे. आता या स्पर्धकांमध्ये चुरस कशी रंगतेय हे बघणं औत्सुक्याचं आहे.

Advertisement

मराठमोळं घर

बिग बॉसच्या पहिल्या दोन पर्वामध्ये स्पर्धक राहात असलेलं घर सर्व सुखसोयींनी युक्त आणि अतिशय देखणं होतं. तिसऱ्या पर्वाचं घरही असंच भव्यदिव्य आहे. यंदा १४ हजार चौरस फूट जागेत १५ स्पर्धक राहात आहेत. घराच्या मध्यभागी मोठं अंगण आणि अ‍ॅक्टिव्हिटी क्षेत्र आहे. याशिवाय स्विमिंग पूल, जिम, किचन, बेडरूम्स, झोपाळा आणि एक कोठडीसुद्धा या घरात आहे. यंदा बिग बॉसच्या घरात अस्सल मराठमोळ्या वस्तूंचा वापर करण्यात आला आहे, त्यामुळे या घराने एक वेगळंच मराठमोळेपण जपलं आहे.

घरात शिरताच, दाराशेजारी लिंबू मिरची लावलेली दिसते. घरातील स्पर्धकांना आणि घराला नजर लागू नये, हा यामागचा हेतू असावा. अंगणात एक तुळशीवृंदावनदेखील आहे. स्विमिंग पूलच्या बाजूला असलेल्या पेंटिंगवरील नथीने या स्विमिंग पूलला मराठी तडका दिला आहे. हॉलमध्ये देखील बाजूबंद, नथ असे अलंकार लावलेले आहेत. हॉलमध्ये झुमक्यांच्या आकाराचं झुंबरदेखील आहे.

Advertisement

मराठी नाटकांची आठवण करून देईल अशी सजावट करण्यात आली आहे. घरातल्या एका भिंतीवर ‘तो मी नव्हेच’, ‘साखर खाल्लेला माणूस’, ‘नटसम्राट’ अशा नाटकांच्या फ्रेम्स लावल्या आहेत. जणू काही प्रत्येक स्पर्धकाचं स्वभाववैशिष्टय़ या नावांमधून दिसतंय.

१५ स्पर्धक

सोनाली पाटील बिग बॉस ३ च्या घरात प्रवेश करणारी पहिली स्पर्धक ठरली आहे. विशाल निकम, स्नेहा वाघ, विकास पाटील, शिवलीला पाटील, मीरा जगन्नाथ, गायत्री दातार, उत्कर्ष शिंदे, तृप्ती देसाई, सुरेखा कुडची, आविष्कार दारव्हेकर, जय दुधाणे, मीनल शहा, संतोष चौधरी, अक्षय वाघमारे असे एकूण १५ स्पर्धक या घरात एकत्र राहत आहेत. आता बिग बॉसच्या घरात कोण टिकेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

Advertisement

धमाकेदार टायटल साँग!

‘आला सीझन तिसरा. जुनं सगळं विसरा. चेहरा ठेवा हसरा’ असे या शीर्षक गीताचे बोल आहेत. वैभव जोशी यांनी हे गाणं लिहिलं असून पद्मनाभ गायकवाड आणि राहुल सुहास यांच्या सुरांनी या गाण्याला वेगळाच तडका दिला आहे. महेश मांजरेकर यांच्या आवाजाने या गाण्याला चार चांद लागले आहेत. हितेश मोडक यांनी संगीत दिलं आहे. हे धमाकेदार गाणं प्रत्येकाला ठेका धरायला लावतं.

The post मनोरंजन : एक अजब घर appeared first on Loksatta.

Advertisement



Source link

Advertisement