नागपूरएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान केवळ 10 मिनिटात बँकेकडे वळते करण्यात आले. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील 2 हजार 362 लाभार्थ्यांच्या खात्यात 50 हजारांपर्यंत प्रोत्साहन राशी मिळणार आहे.
सोमवारी सायंकाळी बँकेच्या खात्यात 11 कोटी 6 लाख 74 हजार 221 रुपये जमा झाले असल्याची माहिती नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर अनुदान जमा झाले नसल्याच्या तक्रारी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आल्या होत्या. याची तातडीने दखल घेत बावनकुळे यांनी प्रोत्साहनपर अनुदान मिळवून दिले आहे.
सोमवारी बँकेच्या महाल येथील मुख्य कार्यालयात बावनकुळे यांनी कर्जमाफी व प्रोत्साहन निधी याबाबतची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. बँकेच्या अधिकाऱ्यांना अडचणींचा पाढाच वाचला. अडचणी समजून घेत बावनकुळे यांनी सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार व सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला व शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी तातडीने प्रोत्साहन अनुदान जारी करण्याची विनंती केली.
यावर अतिरिक्त मुख्य सचिवांनी सोमवारीच अनुदान जारी केले जाणार असल्याचे सांगितले. काही वेळ बँकेच्या अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांच्या समस्येबाबत बोलत असतानाच 10 मिनिटांच्या आताच मध्यवर्ती बँकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना अनुदान बँकेकडे वळते करण्यात आल्याची बातमी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी.आर. नाईक यांनी बावनकुळे यांनी दिली.
आतापर्यंत 2594 खातेधारकांना लाभ
2017-18 ते 2019-20 या तीन वर्षांच्या कालावधीत कर्ज घेऊन कोणतेही दोन वर्षे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची प्रोत्साहन राशी देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या योजनेचे नागपूर जिल्ह्यातून 7,373 शेतकरी पात्र ठरले होते. तर मध्यवर्ती सहकारी बँकेचे 2,650 पात्र खातेधारक प्रोत्साहनपर राशीच्या प्रतिक्षेत होते. त्यापैकी 235 शेतकऱ्यांना योजनेचा लाभ काही दिवसांपूर्वी मिळाला होता. उर्वरित 53 खातेधारकांना देखील तातडीने प्रोत्साहन राशी मिळावी यासाठी बँकेकडून पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती नाईक यांनी दिली.