अमरावती2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुरक्षारक्षकांनी धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ आज, मंगळवारी तिवसा शहरात धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीने निदर्शने करण्यात आली. तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोनलनादरम्यान सरकारविरुद्ध घोषणा देत मंत्री विखे पाटील यांचा राजीनामा मागण्यात आला. धनगर समाज संघर्ष समितीचे नेते अॅड. आशिष लांडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे धनगर समाजाच्या एका कार्यकर्त्यांने निवेदनातून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी मागणी केली होती. यावेळी खंडोबाचा पवित्र भंडारा विखे पाटलाच्या अंगावर उधळला होता. तेव्हा उपस्थित सुरक्षारक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर कार्यकर्त्याला लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली व त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करवून घेतला. लोकशाही मार्गाने निवेदन देणाऱ्या व खंडोबाचा पवित्र भंडारा उधळल्याच्या रागातून समाजातील एका कार्यकर्त्याला बेदम मारहाण झाल्याने समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे राज्यातील धनगर समाजाच्यावतीने ठिकठिकाणी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
त्याच क्रमात आज तिवसा शहरातदेखील निषेध नोंदवून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातून विखे पाटील यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, मारहाण करणाऱ्याविरुद्ध कारवाई व्हावी व मंत्री विखे पाटील यांनी समस्त धनगर समाजाची माफी मागावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदन सादर करतेवेळी अॅड. आशिष लांडे यांच्यासह नगरसेवक किसन मुंदाने, सुधीर गोडसे, सरपंच आशिष बांबल, माजी सरपंच मुकुंद पुनसे, सुनील तालन, प्रवीण पांडे, विजय करडे, किशोर गोरडे, मोहन गोरडे, प्रफुल्ल गंधे, सागर वडे, कपिल बांबल, स्वप्निल गंधे, रामभाऊ टेकाळे, राधेश्याम महात्मे यांच्यासह अनेक धनगर समाजबांधव उपस्थित होते.