छत्रपती संभाजीनगरएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
- against BJP in front of Dr. Karad Union Minister of State for Finance
राज्यात अडीच लाखांपेक्षा अधिक जणांनी जातीची बनावट प्रमाणपत्रे काढून सवलती घेतल्या आहेत. त्यांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी बंजारा राजपूत भामटा भटके विमुक्त समाज कृती समितीतर्फे विभागीय कार्यालयावर पांढरे वादळ मोर्चा काढला. क्रांती चौकातून निघालेल्या या मोर्चाते हजारो नागरिक सहभागी झाले होते.
आमखास मैदानावर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. मागण्या मान्य न केल्यास कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील सरकारही उलथून टाकण्याचा इशारा काँग्रेसचे आ. राजेश राठोड यांच्यासह नेत्यांनी दिला. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड मोर्चेकऱ्यांना भेटण्यास आले असता त्यावेळी भाजपविरोधी घोषणा देण्यात आल्या. सकाळी अकरापासून क्रांती चौकातून गर्दी जमण्यास सुरुवात झाली. पांढरे झेंडे, पांढरे पोशाख, पारंपरिक वेशभूषेतील महिला, मागण्यांच्या फलकांच्या पाट्या आणि जोरदार घोषणाबाजी या वेळी लक्षवेधी ठरली. ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष राजपाल राठोड, राजेश राठोड, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.
मार्गात बदल अन् कडेकोट बंदोबस्त
आयोजकांच्या नियोजनानुसार क्रांती चौकातून मोर्चा पुढे पैठण गेट-गुलमंडी, सिटी चौक पोलिस स्टेशनमार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार होता. मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक शाखेच्या परवानगीने मोर्चा क्रांती चौकातून पुढे नूतन कॉलनी, क्रांती चौक पोलिस स्टेशन, भडकल गेटमार्गे आमखास मैदानामध्ये पोहोचला. या मोर्चासाटी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.
सरकार आमच्या विरोधात काम करतेय
फडणवीस सरकार आमच्याविरोधात काम करत आहे, मात्र जनता त्यांंना धडा शिकवेल.
– राजपाल राठोड, प्रदेशाध्यक्ष, ऑल इंडिया बंजारा सेवा संघ
२ लाख बोगस प्रमाणपत्रे रद्द करा
दोन लाख बोगस प्रमाणपत्रे रद्द केली नाही तर कर्नाटकप्रमाणे राज्यातही सरकार बदलावे लागेल.
– राजेश राठोड, आमदार
घोषणाबाजी आणि आश्वासन
डॉ. कराड क्रांती चौकात या मोर्चातील पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले असता भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकार मिळून समाजाचे प्रश्न सोडवू, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.