- Marathi News
- Local
- Maharashtra
- Nagpur
- For The First Time In The State, Water Will Be Produced Using Atmospheric Moisture; 500 To 1000 Liters Of Pure Drinking Water Will Be Available Daily
अतुल पेठकर | नागपूर17 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
साम्विद इंटरनॅशनलचे प्रमुख सहकारी व प्रकल्प.
- अमरावती जिल्ह्यातील राणीगावात मे महिन्याच्या अखेरीस होणार प्रकल्पाचे लोकार्पण, हे पाणी १०० % शुद्ध असल्याचा दावा
पाण्याअभावी प्रसंगी गावेच्या गावे स्थलांतरित होतात. मुक्या जनावरांची तडफड होते. शहरात निदान टँकरने तरी पाणीपुरवठा होतो; पण दुर्गम भागात पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. ४०० ते ५०० फूट बोअर घेऊनही पाणी लागत नाही. अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील राणीगाव हे समुद्रसपाटीपासून ३७७८ मीटर सर्वाधिक उंचीवरील गावही याला अपवाद नव्हते. परंतु, येथील पिण्याच्या पाण्याची गरज आता हवेतील आर्द्रतेच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. नागपुरातील साम्विद इंटरनॅशनल या संस्थेने नटराज निकेतन या संस्थेच्या मदतीने राणीगाव येथे हवेतील आर्द्रतेचा वापर करून शुद्ध पाण्याच्या निर्मितीचा राज्यातील पहिला प्रकल्प उभारला आहे. मे महिन्याच्या अखेरीस या प्रकल्पाचे लोकार्पण होईल, अशी माहिती साम्विद इंटरनॅशनलचे महाव्यवस्थापक मुकुंद विलास पात्रीकर यांनी दिली.
२,१८७ लोकसंख्या असलेल्या या गावातील लोकांना पाण्यासाठी ५ ते १० किलोमीटर पायपीट नेहमीचीच होती. गावात नोव्हेंबरपासूनच सुरू होणारी पाणीटंचाई ग्रामस्थांच्या पाचवीलाच पुजलेली. परंतु, आता किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तरी मार्गी लागत आहे. तोही पाइपलाइन किंवा बोअरने नव्हे, तर हवेच्या माध्यमातून.
सध्या रणरणता उन्हाळा सुरू आहे. पाण्याचा थेंबही मोलाचा ठरत आहे. यातच हवेतील बाष्पाचा वापर करून पाण्याची निर्मिती करता आली तर किमान पिण्यासाठी पाण्याची सोय तरी होईल या विचारांतून हे तंत्र विकसित करत पात्रीकर यांनी हे संयंत्र राणीगाव येथे उभारले. “साम्विद आॅक्सिऔरा अॅटमाॅसस्पेरिक वाॅटर जनरेटर’ हे या मशीनचे नाव आहे.
असे आहे तंत्रज्ञान : हवा शोषून घेत फिल्टर करून बाष्पाचा वापर
उपकरणात एअर फिल्टरमधून हवा शोषून घेतली जाते. हवेतील धूलिकण व प्रदूषित घटक फिल्टरद्वारे काढले जातात. नंतर दवबिंदूंचे तापमान कमी केले जाते व हीट एक्स्चेंजरवर पिण्याचे पाणी तयार होते. ते एकत्रित करून एका टाकीत साठवले जाते. या पाणीनिर्मितीसाठी ७.२ किलोवाॅट (सिंगल फेज) वीज लागते. तापमान १२ ते ४८ डिग्री सेल्सियस आणि आर्द्रता ३० ते ९९ टक्के हवी. मात्र साम्विद इंटरनॅशनलने विकसित केलेल्या यंत्रात यापेक्षा कमी आर्द्रतेतही पाणीनिर्मितीचे तंत्र विकसित केले आहे. मुकुंद पात्रीकर यांच्यासह निखिल व्यास, मधुरा व्यास आदी तांत्रिक चमूने प्रत्यक्ष गावात जाऊन, संपूर्ण बाजू तपासून प्रकल्पाचा आराखडा तयार करून उभारणी केली आहे.
- हवेतील दवबिंदूंचे तापमान कमी करून होते पाण्यात रूपांतर, नंतर टाकीत साठवले जाते
- ग्रामपंचायतीचा एक कामगार एका कुटुंबासाठी रोज दहा ते बारा लिटर पाणी वितरणाचे नियोजन करणार
- ४०० फूट खोलीवरही या भागात पाणी लागत नाही.
- १० ते ५० टक्के आर्द्रतेवर काम करते हे संयंत्र
- ५०० ते १ हजार लिटर पाणी रोज मिळू शकेल