अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादने मुंबईचा अवघ्या ३ धावांनी पराभव केला. हैदराबादच्या १९३ धावांचा पाठलाग करताना मुंबईने ७ बाद १९० धावांपर्यंत मजल मारली. मुंबईकडून रोहित शर्माने सर्वाधिक ४८ तर टीम डेव्हिडने १८ चेंडूत ४६ धावा केल्या. हैदराबादकडून उमरान मलिकने भेदक मारा करत २३ धावात ३ विकेट घेतल्या. हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक ७६ धावा केल्या. त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला.
सनराईजर्स हैदराबादने ठेवलेल्या १९४ धावांचा पाठलाग करताना मुंबईने देखील दमदार सुरूवात केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी ९५ धावांची सलामी दिली. मात्र अर्धशतकाला दोन धावांची गरज असताना रोहित शर्मा ४८ धावांवर वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर उमरान मलिकने देखील इशान किशनला अर्धशतक पूर्ण करू दिले नाही. किशन ३४ चेंडूत ४३ धावा करून बाद झाला.
आयपीएल २०२२ मधील ६५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमने-सामने आले. वानखेडे स्टेडियमवर झालेला हा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला. मात्र अखेरीस मुंबई इंडियन्सला ३ धावांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह सनरायझर्स हैदराबादचे स्पर्धेतील आव्हान अजूनही जिवंत आहे असे वाटत नाही.
इशान किशन बाद झाल्यानंतर मुंबईच्या डावाला गळती लागली. उमरान मलिकने १५ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तिलक वर्माला बाद केले. त्यानंतर याच षटकाच्या सहाव्या चेंडूवर डॅनियल सॅम्सला १५ धावांवर बाद केले. स्नब्ज देखील २ धावांवर धावाबाद झाला. दरम्यान, टीम डेव्हिडने आक्रमक फटकेबाजी करत १८ चेंडूत ४६ धावा चोपल्या. मात्र मोक्याच्या क्षणी त्याला नटराजनने धावबाद केले. यानंतर आलेल्या संजय यादवला भुवनेश्वरने शुन्यावर बाद केले. शेवटच्या षटकात मुंबईला विजयासाठी १८ धावांची गरज असताना रमनदीप सिंगने एक षटकार आणि एक चौकार मारत १५ धावा केल्या. मात्र मुंबईला अखेर विजयासाठी ३ धावा कमी पडल्या.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डॅनियल सॅम्सने अभिषेक शर्माला ९ धावांवर बाद करत मुंबईला चांगली सुरूवात देखील करून दिली. मात्र त्यानंतर प्रियाम गर्ग आणि राहुल त्रिपाठी यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी रचली. परंतु, रमनदीप सिंगने २६ चेंडूत ४२ धावा करणाऱ्या प्रियाम गर्गला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर राहुल त्रिपाठीने दमदार फलंदाजी करत नाबाद अर्धशतकी खेळी केली. राहुलने निकोलस पूरन सोबत तिसऱ्या विकेटसाठी ४२ चेंडूत ७६ धावांची भागीदारी रचली. मात्र मेरेडिथने पूरनला (३८) बाद करत ही जोडी फोडली. त्या पाठोपाठ रमनदीपने राहुल त्रिपाठीची ४४ चेंडूत केलेली ७६ धावांची खेळी संपलवी. रमनदीपने माक्ररमची देखील शिकार केली. त्यामुळे हैदराबादची अवस्था ५ बाद १७५ अशी झाली. त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी हैदराबादला १९३ धावांपर्यंत पोहचवले.