मोहसिना सय्यद| दिव्य मराठी8 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
औरंगाबादेतील प्रसिद्ध प्रर्यटनस्थळ बीबी का मकबरा पाहण्यासाठी आज जळगाव येथून एका शाळेची सहल आली होती. मात्र, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त बीबी का मकबरापर्यंत जाण्यासाठी असलेला रस्ता बंद होता. त्यामुळे शिक्षकांची चांगलीच पंचाईत झाली. बीबी का मकबरा न पाहताच परवाते लागेल की काय?, अशी स्थिती निर्माण झाल्याने विद्यार्थीही चांगलेच हिरमुसले.
मात्र, याबाबत शाळेच्या शिक्षकांनी दिव्य मराठीशी संपर्क साधताच दिव्य मराठी प्रतिनिधीने तातडीने पोलिस, वाहतूक कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांना अडचण समजून सांगितली. पोलिसांनीही सहकार्य करत शाळेच्या बसला बीबी का मकबरापर्यंत जाण्यास परवानगी दिली तसेच मदतही केली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर हसू उमटले तसेच शिक्षकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. भारावलेल्या शिक्षक, विद्यार्थ्यांनी व्हिडिओ संदेश पाठवत दिव्य मराठीचे आभार मानले.
नेमके झाले काय?
औरंगाबाद शहर पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. बीबी का मकबरा पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे येतात. सध्या विविध शहरातील शाळेतून विद्यार्थी सहलीनिमित्त औरंगाबाद शहराला भेट देत आहेत. यावल, जळगाव येथून फातेमा गर्ल्स शाळेतील सहल औरंगाबाद शहरात आली होती. बीबी का मकबरा पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह, शिक्षकही उत्सुक होते. सकाळी ७ वाजेपासून सहल यावल येथून निघाली. छावणी येथे दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोहचल्यावर त्यांना कळले की, नामविस्तार दिनानिमित्त रस्ता बंद आहे.
रस्तेकामामुळे पर्यायी मार्गही बंद
बीबी का मकबरापर्यंत जाण्यासाठी दुसरा पर्याय महेमूद दरवाजा येथून होता. परंतु पुलाचे काम सुरू असल्याने तो रस्ताही बंद आहे. तिसरा पर्याय म्हणून टाऊन हॉल उड्डाणपूल होता. परंतु तेथेही रस्त्याचे काम सुरू असल्याने पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना पुढे जाण्यास मनाई केली. आता मकबरा पाहताच येणार नाही, अशी सर्वांची परिस्थिती होती. शेवटी त्यांनी दिव्य मराठीशी संपर्क साधून समस्या सांगितली.
पोलिसांनी सहकार्य केले
समस्या कळताच दिव्य मराठीचे प्रतिनिधी तेथे पोहचले. वाहतूक पोलिस अधिकारी कामे यांना समस्या सांगितल्यावर त्यांनी टाऊन हॉल येथून जा, मी कर्मचाऱ्यांना सांगातो, असा विश्वास दिला. त्यानुसार दिव्य मराठीचे प्रतिनिधी सहलीबरोबर त्या रस्त्याने गेले. तेथे पोलिस कर्मचारी शेख उपस्थित होते. त्यांनी बसला टाउनहॉल मार्गे बीबी का मकबरा येथे जाण्याची परवानगी दिली. तसेच, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सहकार्य केले. दिव्य मराठीचा पुढाकार पाहून शाळेतील शिक्षक भारावले. त्यांनी थँक्यू दिव्य मराठी, असा संदेश व्हिडीओद्वारे पाठवला.