भारत-आफ्रिका कसोटी मालिका : बचावात्मक इशांत की आक्रमक उमेश?तिसऱ्या कसोटीत सिराजची जागा घेण्यासाठी अनुभवी गोलंदाजांत चुरस

Advertisement

नवी दिल्ली : बचावात्मक शैलीत गोलंदाजी करून धावांवर लगाम घालणारा इशांत शर्मा आणि आक्रमक शैलीत मारा करणारा उमेश यादव या अनुभवी वेगवान गोलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघात मोहम्मद सिराजची जागा घेण्यासाठी चुरस आहे.

भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीत पराभव पत्करावा लागला. आफ्रिकेने हा सामना सात गडी राखून जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना ११ जानेवारीपासून केप टाऊन येथील न्यूलँड्स येथे होणार असून सिराजच्या तंदुरुस्तीची भारतीय संघाला चिंता आहे. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात गोलंदाजीदरम्यान सिराजच्या उजव्या पायाचे स्नायू ताणले गेले. त्यानंतर त्याने गोलंदाजी केली; पण त्याला संपूर्ण कसोटीत एकही गडी बाद करता आला नाही. त्यामुळे भारतीय संघ सिराजला विश्रांती देत इशांत आणि उमेशपैकी एकाला संधी देऊ शकेल.

Advertisement

३३ वर्षीय इशांतच्या गाठीशी १०५ कसोटी सामने आणि ३११ बळींचा अनुभव आहे. परंतु मागील काही काळात त्याला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. दुसरीकडे, ३४ वर्षीय उमेशने आतापर्यंत ५१ कसोटी सामन्यांत १५६ गडी बाद केले आहेत. मागील काही सामन्यांत इशांतच्या तुलनेत उमेशची कामगिरी उजवी आहे. असे असले तरी कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक राहुल द्रविड ही जोडी इशांतला संधी देण्याचा विचार करू शकेल.

दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्टय़ांवर उंचपुऱ्या गोलंदाजांना मदत मिळत असल्याचे पाहायला मिळाले आहे. ‘‘आफ्रिकेच्या गोलंदाजांना अधिक उंचीचा नक्कीच फायदा झाला. चेंडू खाली-वर राहणाऱ्या खेळपट्टय़ांवर अधिक उंचीच्या गोलंदाजांविरुद्ध खेळणे फलंदाजांना अडचणीचे जाते,’’ असे द्रविड म्हणाला होता. इशांतने याआधी दक्षिण आफ्रिकेत सात कसोटीत २० गडी बाद केले असून उमेशला आफ्रिकेत कसोटी खेळण्याचा अनुभव नाही. त्यामुळे निर्णायक कसोटीत सिराजची जागा घेण्यासाठी इशांतचे पारडे आहे.

Advertisement

आफ्रिकेचे योग्य दिशेने पाऊल -एल्गर

भारताविरुद्ध जोहान्सबर्गवर झालेला दुसरा कसोटी सामना जिंकत दक्षिण आफ्रिकेने योग्य दिशेने पाऊल टाकल्याचे मत या संघाचा कर्णधार डीन एल्गरने व्यक्त केले. ‘‘पहिला कसोटी सामना मोठय़ा फरकाने गमावल्यानंतर दुसऱ्या कसोटीतील विजय, ही आमच्यासाठी सकारात्मक गोष्ट होती. आम्ही योग्य दिशेने पाऊल टाकले आहे. पुढील कसोटीत आमच्यापुढे वेगळे आव्हान असेल. आमच्या क्षमतेचा कस लागेल आणि आमचे खेळाडू कशा प्रकारे दडपण हाताळतात हे पाहणे महत्त्वाचे असेल. मात्र, दुसऱ्या कसोटीतील विजयामुळे आमचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे,’’ असे एल्गरने सांगितले.

Advertisement

The post भारत-आफ्रिका कसोटी मालिका : बचावात्मक इशांत की आक्रमक उमेश? appeared first on Loksatta.Source link

Advertisement