सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या १५व्या हंगामानंतर भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया एक कसोटी, ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिकेसाठी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. ३ आठवड्यांच्या या महत्त्वाच्या दौऱ्यासाठी बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेण्याचे ठरवले आहे. वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपचा विचार करून आयपीएलनंतर होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेण्याचे ठरवले आहे.
बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा या सात खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतलाय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेतील सर्व सामन्यासाठी या खेळाडूंना विश्रांती दिली जाईल. या मालिकेसाठी बायो बबल देखील असणार नाही.
भारतीय क्रिकेट संघ आयपीएल २०२२नंतर ९ ते १९ जून या काळात पाच शहरात पाच टी-२० सामने खेळणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया आयरर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाईल. हा दौरा लक्षात घेता वर्कलोड विचारात घेऊन संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली जाणार आहे. भारताच्या काही खेळाडूच्या फॉर्मवरून देखील चिंता व्यक्त केली जात आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपच्या आधी महत्त्वाचे खेळाडू फॉर्ममध्ये नसने काळजीचा विषय आहे.
बीसीसीआय वर्कलोड मॅनेजमेंट प्रोग्राम तयार करत आहे. आयपीएलमध्ये दिर्घ काळापासून बायो-बबलमध्ये राहिल्याने खेळाडूंना ताजे होण्यासाठी विश्रांती दिली जाणार आहे. खेळाडूंना किती कालावधीसाठी विश्रांती दिली जाईल याचा निर्णय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी चर्चा करून घेतला जाणार आहे. टीम इंडिया आणि बीसीसीआय आगामी टी-२० वर्ल्डकपची तयारी करत आहे. त्यामुळेच खेळाडूंना मानसिक आणि शारिरिक दृष्टीने फिट ठेवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. भारताने मोठ्या कालावधीपासून ICCच्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले नाही, यासाठी द्रविड रणनिती तयार करत आहेत.
हार्दिकबाबत होणार निर्णय
भारतीय संघाकडून हार्दिक पंड्या पुन्हा खेळणार का याबाबतचा निर्णय लवकर घेतला जाईल. हार्दिकने २०२२मध्ये चांगली कामगिरी केली आहे. ६ सामन्यात त्याने २९५ धावा केल्या आहेत. त्याच बरोबर तो गोलंदाजी देखील करतोय. आयपीएलनंतर होणाऱ्या द.आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत तो टीम इंडियामध्ये पुन्हा दिसू शकतो.