पुणे10 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
महाविकास आघाडी सरकारने मागील सरकारच्या काळातील विकास कामे रोखली. महाविकास आघाडी सत्तेत येणे म्हणजे महाराष्ट्राचे नुकसान आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की ,मला काँग्रेस सोबत जाण्याची वेळ आली तर शिवसेना बंद करेल. मात्र, आज तेच घडले आहे, उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेले व त्यांची शिवसेना बंद झाली असा जोरदार टोला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र तर्फे प्रदेश कार्य समिती बैठकीचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
स्वबळावर सत्ता हवी
जे. पी. नड्डा म्हणाले, राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी कोणते योगदान देऊ शकतो याचा विचार करावा. दुसऱ्याच्या कमजोरीवर आपण सत्तेत येण्यापेक्षा, स्वतःच्या हिमतीवर सत्तेत येणे महत्त्वाचे आहे.
सावरकरांवरील टीका स्वाभीमानावर
नड्डा म्हणाले ,स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर काँग्रेसकडून टीका होणे म्हणजे देशाच्या स्वाभिमानावर टीप्पणी होण्यासारखे आहे. याबाबत आपण ठाम भूमिका मांडली पाहिजे. जगामध्ये आर्थिक मंदी आली असून कोरोनाचे संकटाचा अनेकांना सामना करावा लागला.मात्र ,यादरम्यान रशिया, इटली, ब्रिटन ,ऑस्ट्रेलिया आदी देशांपेक्षा महागाई कमी ठेवण्यात आपण यशस्वी ठरलो आहे.
रोजगारालाही चालना
जे. पी.नड्डा म्हणाले, चीन, फ्रान्स, ब्रिटनपेक्षा आपला जीडीपीचा दर चांगल्या प्रकारे आहे. काँग्रेसकडे दूरदृष्टी नाही. मात्र, भाजपने सन 2014 पासून मोठ्या प्रमाणात विकास कामे केलेली आहे. मोठ्या प्रमाणात रेल्वेचे बजेट आपण वाढवले आहे. देशभरात वेगवेगळे राष्ट्रीय महामार्ग जोडले जात आहे.संरक्षण क्षेत्र मजबूत करण्यात येत असून ४०० एअरबस, बोईंग विमाने खरेदी करण्याची ऑर्डर आपण दिलेली आहे. त्यामुळे अमेरिकेतही नवीन रोजगाराला संधी उपलब्ध झालेली आहे.
बुथ सक्षम करा
जे. पी. नड्डा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी ६० पेक्षा अधिक देशात गेले आणि त्यांनी विविध देशांशी मैत्रीपूर्ण संबंध तयार केले आहेत.आपल्या शेजारील नेपाळ ,श्रीलंका सारख्या देशातही 20 -20 वर्ष देशाचे पंतप्रधान गेलेले नव्हते. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावलेली असून 2014 नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला पाकिस्तानशी कोणी जोडत नाही. कारण, भारताने आपली वेगळी ओळख जगात निर्माण केलेली आहे. कार्यकर्त्यांनी बूथ सक्षमीकरणासाठी यापुढील काळात प्रयत्न करावेत. दहा लाख 40 हजार बुथपर्यंत पोहोचण्याचे आपले लक्ष असून त्यादृष्टीने आपण वाटचाल करत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय पदाधिकारी सी. टी.रवी, विनोद तावडे, पंकजा मुंडे, नारायण राणे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, कपिल पाटील, हंसराज अहिर, भारती पाटील, सुनील देवधर, गिरीश महाजन ,आशिष शेलार, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. तसेच राज्यातील भाजपचे आमदार, खासदार, मंत्री हे देखील उपस्थित होते.