चंद्रपूर31 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय चिमूरचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्यासह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर आपत्तीजनक पोस्ट शेअर करणाऱ्या साईनाथ बुटके यांना घरात घूसून मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात आता आमदार बंटी भांगडिया आणि साईनाथ बुटके यांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारीनंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रपुरचे चिमूरचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्या विरोधात अश्लील शब्दातंर्गत मजकूर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा मजकूर साईनाथ उर्फ अश्वमेघ तुकाराम बुटके यांनी व्हायरल केला होता. या मजकूरावर आमदार भांगडिया चांगलेच भडकले होते. रागाच्या भरात आमदार बंटी भांगडिया हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन साईनाथ बुटके यांच्या चिमूर येथील राहत्या घरी गेले व त्यांच्यावर हल्ला करून मारहाण केली. शेकडोच्या जमावासमोर हा प्रकार घडला होता.
या घटनेनंतर साईनाथ बुटके यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून आमदार आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी चिमूर पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केले होते. मात्र आमदार बंटी भांगडिया व साईनाथ उर्फ अश्वमेध तुकाराम बुटके यांनी एकमेकांच्या विरोधात चिमूर पोलिस स्टेशन तक्रारी दाखल केल्या. या तक्रारीवर दोन्ही पक्षावर गुन्हे नोंदवण्यात आले. आमदार बंटी भांगडिया यांच्या तक्रारीवरून साईनाथ बुटके यांच्यावर अश्लील शिवीगाळ करणे, संगणकीय प्राताधिकार भंग गुन्ह्याबरोबर भांदवी २९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक गोळा करून घरात घुसून हल्ला केल्याप्रकरणी आमदार बंटी उर्फ किर्तीकुमार भांगडिया यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांवर भादवी कलम 143, 147, 149,452, 323,354, 294 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार बंटी भांगडिया हे भाजपचे असून उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय आहे. तर साईनाथ बुटके यांचा कुठल्याही पक्षासोबत संबंध नाही. मात्र त्यांचे भाऊ गजानन बुटके हे काँग्रेसचे पदाधिकारी असून माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. ते माजी कॅबिनेट मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक आहेत. या प्रकरणात अजून पर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नसून पुढील तपास सुरु आहे.