औरंगाबाद8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात चार दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असला तरी पाण्याची वेळ 60 मिनिटांवरून 45 मिनिटे करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एक तास पाणी पुरवठा सुरू करावा, यासह विविध मागण्या भाजपच्या शिष्टमंडळाने मंगळवारी महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेऊन केली.
भाजपचे शहराध्यक्ष शिरिष बोराळकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी शहरातील विविध विकास कामांसंदर्भात प्रशासक डॉ. चौधरी यांची भेट घेतली. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत शहरात रस्त्यांची कामे केली जात आहेत. मात्र कामांच्या दर्जाबाबत माजी नगरसेवकांकडून तक्रारी येत आहेत. त्यामुळे रस्ते कामांसंदर्भात स्वतंत्र बैठक घेण्यात यावी, रामनगर येथील नियोजित हॉस्पिटलच्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत पण कामाला सुरवात झालेली नाही, कामाला सुरवात करावी, महिलांसाठी स्वतंत्र शहर बस, बेंगळूरूच्या धर्तीवर मोबाईल स्वच्छतागृह सुरू करावेत. संत तुकाराम नाट्यगृहाचे रखडलेले काम सुरू करावे, गरवारे स्टेडीयम परिसरातील जलतरण तलावाच्या कामासाठी अतुल सावे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होणार आहे.
त्यासाठी प्रस्ताव पाठवावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. लवकरच या संदर्भात निर्णय घेण्यात येतील, असे आश्वासन डॉ. चौधरी यांनी शिष्टमंडळाला दिल्याचे बोराळकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी महापौर भगवान घडमोडे, माजी उपमहापौर राजू शिंदे, माजी नगरसेवक समीर राजूरकर, प्रमोद राठोड, राजगौरव वानखेडे, शिवाजी दांडगे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.
समाधानकारक कामे होत
यावेळी पत्रकारांसोबत बोलताना बोराळकर म्हणाले, राज्यात आमची सत्ता असली तरी प्रशासनाकडून समाधानकारक कामे होत नसल्यामुळे निवेदन देण्याची वेळ आली आहे. प्रशासन आणि पदाधिकारी एकत्र आले तर चांगली कामे शहरात होतील, त्यामुळे डॉ. चौधरी यांची भेट घेतली. समाधानकारक चर्चा यावेळी झाली.