भगीरथ.. दूधगंगेचा!


डॉ. कुरियन यांचा आणि गुजरातमधील आणंद येथे सुरू झालेल्या ‘श्वेतक्रांती’चा प्रवास अचंबित करणारा आहे.

Advertisement

डॉ. अजित कानिटकर [email protected]

२०२१ मध्ये ‘खाउजा’ (खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण) धोरणाला तीस वर्षे पूर्ण झाली. ‘खाउजा’ धोरणांची व्याप्ती वाढण्यापूर्वीच्या माझ्या पिढीतील अनेकांना त्यापूर्वीची ३०-४० वर्षांची सकाळ अजूनही स्मरणात असेल. पेंगुळलेल्या अवस्थेत पहाटे दुधाची ‘टोकन’ सांभाळत शासकीय दूधविक्री केंद्राबाहेर अर्धा तास रांगेत उभे राहिल्यावर काचेच्या बाटलीत मिळालेले अर्धा किंवा एक लिटर दूध घेऊन घरी आल्यानंतर आम्हाला जणू छोटी लढाईच जिंकल्याचा आनंद होत असे. सणासुदीच्या काळात आणि उन्हाळ्यात दुधाचा तुटवडा असणार, हे तेव्हा लोक गृहीतच धरत असत. उन्हाळ्यात ‘पिवळ्या’ सायीचे, वास येणारे दूध हे भुकटीपासून बनवलेले असायचे (ते ताजे दूध नसे.) हे कळायला बरीच वर्षे जावी लागली. घराघरांत तेव्हा पत्र्याचे ‘अमूल’ पावडरचे डबे असायचे. ताज्या दुधाची तहान पावडरच्या दुधावर भागवीत १९४७ ते १९८०-८५ अशी ४० वर्षे भारताने अनुभवली. अशा अभूतपूर्व अभावातून दुधाच्या प्रवाही महापुरापर्यंत देशाला घेऊन जाणाऱ्या चरित्रनायकाचे नाव आहे डॉ. वर्गीस कुरियन! २६ नोव्हेंबर २०२१ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष.   भारतात ‘श्वेतक्रांती’(Operation Flood) द्वारे दुधाची सर्वदूर उपलब्धता करून देणाऱ्या या क्रांतिकारकाचे स्मरण नक्कीच उचित ठरावे.

Advertisement

डॉ. कुरियन यांचा आणि गुजरातमधील आणंद येथे सुरू झालेल्या ‘श्वेतक्रांती’चा प्रवास अचंबित करणारा आहे. ‘मंथन’ या श्याम बेनेगल यांच्या चित्रपटात यातला काही भाग पाहिल्याचे अनेकांना आठवत असेल. डॉ. कुरियन यांच्या ‘too had a dream’ या पुस्तकातही त्याचे सविस्तर वर्णन आहे.

कालिकतमध्ये सीरियन ख्रिश्चन कुटुंबात जन्म, मद्रासमध्ये (आताचे चेन्नई) शिक्षण, इंजिनीअरिंगची पदवी घेऊन जमशेदपूरमध्ये टाटा उद्योगसमूहात प्रशिक्षणार्थी म्हणून डॉ. कुरियन यांचा सुरुवातीचा प्रवास.. त्यांनीच लिहिल्याप्रमाणे, त्या ठिकाणी ते ‘चिकटून’ राहिले असते तर अर्थातच सर्वोच्च अधिकारी पदावरून निवृत्त होऊन गोल्फ खेळण्यात त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध गेला असता. पण तसे व्हायचे नव्हते! मिशिगन विद्यापीठात पीएच. डी. शिक्षणासाठी निवड होऊन Nuclear physics व metalurgyया विषयात उच्च शिक्षण व जाता जाता  Dairy Engineering मध्ये काही अनुभव घेऊन हा तरुण १९४८ मध्ये भारतात परतला. पण तो फेकला गेला अपघाताने गुजरातेत आणंदसारख्या छोटय़ा गावात.. एका गंजलेल्या सरकारी दूध केंद्राच्या छोटय़ा पडवीत मोडकी यंत्रे दुरुस्त करण्यासाठी! तरुण कुरियनने हे पोस्टिंग नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. कारण परदेशी शिष्यवृत्तीत खर्चासाठी मिळालेले सरकारी अनुदान परत करण्यासाठी ही ‘सक्तमजुरी’ आवश्यकच होती. आणंदच्या या गंजलेल्या creamery मध्ये त्यांची भेट झाली शेतक ऱ्यांचे नेते त्रिभुवनदास पटेल यांच्याशी! दोनच वर्षांपूर्वी वल्लभभाई पटेल व त्यांचे उजवे हात असलेले मोरारजीभाई पटेल यांच्या सल्ल्याप्रमाणे त्रिभुवनकाका आणंद परिसरात घोडय़ावरून गावोगाव फिरत दूधउत्पादक शेतकऱ्यांची सहकारी चळवळ उभी करीत होते. त्यातूनच जन्म झाला होता ‘खेडा (Kaira) जिल्हा सहकारी दूधउत्पादक संघाचा’- ज्याला नंतर ‘Amul’’ नावाने सर्व जण ओळखू लागले. आणंदमधील Polson Dairy च्या मनमानी कारभाराविरुद्ध व त्यातून होणाऱ्या शेतक ऱ्यांच्या शोषणाविरुद्ध एकत्र येऊन पर्याय देण्याचा हा त्रिभुवनकाकांचा प्रयत्न होता डिसेंबर १९४६ चा. त्याला साथ मिळाली कुरियन यांची. आणि या मनोमीलनातून घडला तो इतिहास.. १९४८ ते अगदी आजपर्यंत!

Advertisement

‘Operation flood’ची सुरुवात झाली आणंदमध्ये. सुरुवातीस दूधसंकलन होते जेमतेम १०० लिटरचे. तेही आजूबाजूच्या चार-सहा गावांमधूनच. या छोटय़ा बीजाचे मोठय़ा वृक्षात रूपांतर होण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान व व्यवस्थापनाची नजर डॉ. कुरियन यांची आणि शेतक ऱ्यांचे भक्कम पाठबळ उभे करण्याचे काम त्रिभुवनकाकांचे अशी अनोखी, पण विश्वासावर आधारित कामांची विभागणी झाली. या वाटचालीत नंतर अनेक महत्त्वाचे टप्पे आले. त्या साऱ्यांचा उल्लेख करणे या लेखात अशक्य आहे. काहींचा उल्लेख मात्र डॉ. कुरियन यांच्या दूरदृष्टीचे निदर्शक आहे. मुंबईतील Bombay Milk Scheme द्वारे काबीज केलेली बाजारपेठ शेतक ऱ्यांच्या हातात आली पाहिजे यासाठीचे सुरुवातीच्या पाच वर्षांतील प्रयत्न म्हणजे चाणक्यनीती, Corporate business strategy चा नवीन अध्याय आहे. या शेतक ऱ्यांना विश्वास देणाऱ्या तीन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे दुधाला कधीही सुट्टी नाही. येणारे प्रत्येक दुधाचे भांडे- मग ते अर्धा लिटर असो वा दहा लिटर- सहकारी संस्था (गुजरातीतील प्रचलित शब्द ‘मंडळी’) नाकारणार नाही. दुसरी गोष्ट- दुधाला भाव गुणवत्तेप्रमाणे व अचूक मोजमाप करून मिळेल. थोडक्यात- भेसळीला उत्तेजन नाही. तिसरी गोष्ट- मिळणाऱ्या विक्रीभावाचा जास्तीत जास्त पैसा (रुपयातील ७० ते ८० पैसे) शेतक ऱ्यांना भाव अधिक बोनस स्वरूपात परत मिळतील. आणि या सगळ्याचे व्यवस्थापन शेतकऱ्यांनीच भांडवल उभे केलेल्या सहकारी संस्थांद्वारे! दुधाचा हाच ‘आणंद पॅटर्न’!

या प्रवासातील आणखी दोन टप्पे म्हणजे कुरियन यांचे सहकारी श्री. दलाया या तज्ज्ञाने म्हशीच्या दुधावर प्रक्रिया करून बनविलेली दुधाची भुकटी! तोपर्यंत अनेक पाश्चात्त्य तज्ज्ञांच्या अनुभवाप्रमाणे फक्त गाईच्या दुधातून प्रक्रिया करून अशी भुकटी तयार करता येण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध होते. हा टप्पा १९५०-५५ मध्ये पार पडल्यामुळे हिवाळा व उन्हाळा यांत दूधसंकलनात होणाऱ्या प्रचंड तफावतीचा प्रश्नच उरला नाही. कोणाचेही दूध नाकारायचे नाही, या तत्त्वामुळे हिवाळ्यात जास्तीचे संकलन झालेले दूध प्रक्रिया करून साठवून ठेवायचे व उन्हाळ्यात तुटवडा असताना ‘दूध’ म्हणून पुन:प्रक्रिया करून ते बाजारात आणायचे.

Advertisement

आणंदमध्ये हा प्रयोग यशस्वी होतो आहे, हे पाहून गुजरातच्या अनेक जिल्ह्य़ांमध्ये या प्रयोगाची आवृत्ती सुरू झाली. साबरकाठा, मेहसाणा, सुरत, बनासकाठा, वडोदरा येथेही जिल्हापातळीवरच्या सहकारी दूधसंस्था वेगाने वाढू लागल्या. डॉ. कुरियन यांची पुढची धोरणात्मक दूरदृष्टी म्हणजे या सर्व संस्थांना  Gujrat Co-operative Milk Marketing Federation (GCMMF) या शिखर संस्थेद्वारे एकत्र बांधणे! तसे केले नसते तर बाजारपेठेत या सर्व संस्था एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभ्या राहिल्या असत्या. ते न होण्यासाठी सर्वाची नाममुद्रा  एकच.. ती म्हणजे Amul’! उत्पादन आणंद, सुरत, मेहसाणा कोठेही होऊ देत, ब्रॅण्ड एकच.. Amul’. आज GCMMF या शिखर संस्थेची आर्थिक उलाढाल तीस हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. Amul नाममुद्रा वर्षांनुवर्षे बटर, चीझ, आईस्क्रीम आणि अर्थातच ताज्या दुधासाठी प्रसिद्ध आहे. पण एका अर्थाने गुजरात व आणंद पॅटर्न हा ट्रेलरच म्हणावा लागेल. कारण १९६५ ते १९८५ या त्यांच्या कारकीर्दीतील पुढची वाटचाल म्हणजे National Dairy Development Board (NDDB) ची स्थापना व या ‘श्वेतक्रांती’चा भारतभर विस्तार!

गुजरातमधील या प्रयोगाची कीर्ती ऐकून पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणंदला आले, एका खेडय़ात शेतक ऱ्याच्या घरात एक रात्र राहून त्यांनी हा प्रयोग प्रत्यक्ष पाहिला, अनुभवला व त्यातूनच त्यांनी डॉ. कुरियन आणि त्यांच्या सहकाऱ्यांसमोर आव्हान ठेवले की, या प्रयोगाची भारतभर आवृत्ती करा. त्यातून जन्म झाला ‘श्वेतक्रांती’ (Operation flood) या संकल्पनेचा!

Advertisement

या सर्व नियोजनात व कार्यवाहीत पुन्हा ‘कुरियन टच्’ होता. त्यांनी या प्रकल्पाचे व NDDB चे कार्यालय ठेवले आणंदला. ल्यूटन दिल्ली व तेथील सत्ताधीशांपासून चार हात लांब आणि प्रत्येक कार्यक्षेत्राच्या जवळ.. जेथे हा प्रयोग यशस्वी होण्याचे मोठे संचित भांडवल उपलब्ध होते! पण त्याहीपेक्षा हुकमाची वेगळी खेळी म्हणजे युरोपियन देश व आंतरराष्ट्रीय संघटनांकडून त्यांनी ‘मदत’ घेतली; पण तीही आपल्या देशाच्या भल्याच्या अटींवर!

‘श्वेतक्रांती’चा सर्व पैसा परदेशी होता- वस्तूंच्या देणगी स्वरूपात. म्हणजे युरोपीय देशांनी त्यांच्याकडील भुकटीचा साठा भारतात वाटण्याचा हा कार्यक्रम! डॉ. कुरियन यांनी त्याला चतुरपणे वळण दिले. एका हाताने मदत घेतली व तीही फुकटच; पण दुसरीकडे NDDB द्वारे व देशभरातील जिल्हा संघांद्वारे त्याची ‘विक्री’ करून भांडवल उभे केले. एका दगडात अनेक पक्षी याद्वारे मारले गेले. ग्राहकवर्ग निर्माण झाला. यातून दुधाची बाजारपेठ तयार झालीच; शिवाय फुकटी वृत्ती निर्माण न होता या मदतीतून ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी भांडवलनिर्मितीही झाली. ‘दुधाचा महापूर’ या संकल्पनेबद्दल तज्ज्ञांनी हजारो संशोधन निबंध लिहिले आहेत. पण त्या सर्व लेखनामध्ये डॉ. कुरियन यांच्या यासाठी आवश्यक त्या ‘पर्यावरण’निर्मितीच्या विशेष कर्तृत्वाचा फारसा उल्लेख आढळत नाही. ‘दुधाचा महापूर’ यशस्वी व्हायचा असेल तर त्यासाठी पूरक व प्रोत्साहन देणारी सर्वंकष रचना म्हणजेच ‘पर्यावरण’ (Eco-system) आवश्यक आहे, हे डॉ. कुरियन यांनी हेरले व त्याप्रमाणे ५०-६० वर्षांत अशा अनेक संस्था-संघटनांची जाळी ‘अमूल’भोवती त्यांनी उभारली. त्यातील शेतकऱ्यांचे दूध हमखास विक्री होण्यासाठी मुंबईतील विक्री यंत्रणा हा १९५०-६० च्या दशकातील पहिला विचार! तथापि ही विक्री आपसूक होणार नाही, त्यासाठी ग्राहकाच्या मनात ‘अमूल’चे चित्र ठसले पाहिजे. त्यासाठी मग ‘अमूल बेबी’च्या प्रसन्न, खेळकर व समयोचित जाहिराती त्यांनी केल्या.

Advertisement

शेतक ऱ्यांकडील गाई-म्हशींच्या दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी योग्य चारा व गुरांच्या आजारपणावरची औषधे, ती औषधे घरपोच पुरविणाऱ्या पशुवैद्यक तज्ज्ञांचे जाळे, त्यांना रात्री-अपरात्री साद घालण्यासाठी टेलिफोन-मोबाइल सेवा नसतानाच्या काळातही वॉकी टॉकी यंत्रणा, पशुखाद्य निर्मितीचे कारखाने, त्यांतून शेतक ऱ्यांना त्यांच्या सहकारी समितीतर्फे मिळणारे उत्तम दर्जाचे पशुखाद्य ही अशी ‘पर्यावरण’ बळकट करणारी रचना त्यांनी उभारली. परदेशी औषध कंपन्यांची किमती ठरवण्यातली दादागिरी नको म्हणून  Indian Immunological’ सारख्या मित्र-उद्योगांची स्थापनाही त्यांनी केली; ज्यातून आजारपणावर व कृत्रिम वीर्यबीजारोपणासाठीच्या आवश्यक लसींची उपलब्धता सतत होईल.

एकीकडे दुधाचे उत्पादन वाढत असताना दूधप्रक्रियेसाठी लागणारे आवश्यक ते तंत्रज्ञान व यंत्रसामग्री भारतातच तयार व्हावी यासाठी आणंदजवळ वल्लभविद्यानगर येथे आणखी एका वेगळ्या मित्र-कंपनीची स्थापना कुरियन यांच्याच दूरदृष्टीतून झाली. तेथील आधुनिक, दर्जेदार उत्पादनांनी भारतात प्रस्थापित युरोपियन कंपन्यांना शह दिलाच; त्याचबरोबरीने हजारो स्थानिक लघु-मध्यम उद्योगांना प्रोत्साहनही दिले. हाच प्रयत्न बडोद्याजवळ Tetra Packing चे तंत्रज्ञान आवाक्यात आणण्यासाठी केलेल्या उद्योगाच्या स्थापनेतही त्यांनी केला. आणि हे सर्व उद्योग १९७० ते २००० या तीस वर्षांमध्ये कुरियन यांनी काढले.

Advertisement

भारतात वेगाने वाढणाऱ्या सहकार क्षेत्रातील उद्योगांना व्यवस्थापन करणारी मनुष्यशक्ती कोण पुरवणार? त्यासाठी अहमदाबादमधील Indian Institute of Management मधून प्रशिक्षित व्यवस्थापक तज्ज्ञांनी सहकार क्षेत्रात यावे असा प्रयत्न त्यांनी त्यांचे नातेवाईक डॉ. रवी मथाई (IIM संचालक) यांच्याबरोबर केला. परंतु अहमदाबादमध्ये प्रशिक्षित झालेले मॅनेजर्स आणंदसारख्या छोटय़ा गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या मालकीचे उद्योग चालवतील ही शक्यता जवळपास शून्य आहे हे त्यांना लगेचच समजून आले. त्यातून मग आणंदमध्येच Institute of Rural Management (IRMA) या ग्रामीण क्षेत्रासाठी व्यवस्थापनाचे धडे देणाऱ्या नव्या शिक्षणतीर्थाची पायाभरणी झाली. माझ्या सुदैवाने डॉ. कुरियन IRMA चे अध्यक्ष असताना (१९९१-१९९५) तेथे प्राध्यापक म्हणून काम करण्याची सुसंधी मिळाली. २०२१ मधील भारत आणि साठ-सत्तरच्या दशकातील भारताचे चित्र यांत प्रचंड फरक आहे. ‘खाउजा’ धोरणाच्या तिशीनंतर भारताचे पंतप्रधान पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची स्वप्ने देशाला दाखवीत आहेत. देशी-परदेशी कंपन्यांतील सीमारेषा धूसर झाल्या आहेत. देशातील १० ते ३० कोटीचा मध्यमवर्ग केवळ आपल्याच नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेला पाठबळ देतो आहे. जगाला भारताविषयी नव्याने वाटणारे प्रेम हे योग, आयुर्वेद, संस्कृत यापेक्षाही ‘मध्यमवर्गाची क्रयशक्ती आवडे सर्वाना’ या न्यायाने बाजारपेठेच्या विक्री आकडय़ांवर जास्त केंद्रित आहे. आणि दुसरीकडे भारत महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत असतानाच ४० ते ६० कोटी अभावग्रस्त नागरिक आजही आपल्या देशात आहेत. त्यातील बहुसंख्य हे ग्रामीण भागात छोटय़ा छोटय़ा जमिनींच्या तुकडय़ांवरील जिरायती शेतीवर अवलंबून आहेत. एकीकडे नवीन तीन शेती कायदे ‘शेतीतील खाउजा’ म्हणून गौरवले जात आहेत, पण दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या आंदोलक शेतकऱ्यांना त्यांच्या संभाव्य फायद्यापेक्षा होणाऱ्या तोटय़ाचीच जास्त काळजी आहे. नव्याने स्थापन होऊ घातलेल्या दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतील अनेक अडचणींवरचा उपाय ठरतील अशी भाबडी आशा धोरणकर्त्यांना आहे. शेतक ऱ्यांचे उत्पन्न पाच वर्षांमध्ये दुप्पट करून दाखवू, ही घोषणाही शेतकरी गेली सात वर्षे ऐकत आहेत. पण हे सर्व कोण साधणार? ‘योजक: तत्र दुर्लभ:’ हे गेली कित्येक वर्षे अनेक विकास प्रकल्पांमध्ये सातत्याने लक्षात येत आहे. २०२१ मधील शेतक ऱ्यांचे प्रश्न व त्यावरील संभाव्य उत्तरे शोधताना डॉ. कुरियन यांच्या ‘आणंद मॉडेल’मधून शिकण्यासारखे बरेच काही आहे. याकरता शेतकऱ्यांची प्रगती व भल्याची कळकळ असणारे अनेक ‘कुरियन’ आणि निस्वार्थी ‘त्रिभुवनदासकाका पटेल’ त्यांच्या पाठीशी उभे राहिले तर या देशात दुधाचाच काय, संपत्तीचाही महापूर येईल. डॉ. कुरियन यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने देशातील युवाशक्तीला हे स्फुरण मिळावे, ही सदिच्छा!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

AdvertisementSource link

Advertisement