हिंगोली28 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
कळमनुरी तालुक्यातील बोल्डाफाटा येथील उपबाजार समितीच्या १६३ भुखंड घोटाळा प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून सहाय्यक निबंधकांचे पथक या प्रकरणात सखोल चौकशी करणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे तातडीने सादर करण्याच्या सुचना बाजार समितीला देण्यात आल्या आहेत. या चौकशीकडे हिंगोली जिल्हयाचे लक्ष लागले आहे.
आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत बोल्डाफाटा उपबाजारपेठ आहे. या ठिकाणी बाजार समितीने नियमबाह्य पध्दतीने १६३ दुकाने काढून त्याची विक्री करण्याचा सपाटा लावला आहे. या दुकान विक्रीमध्ये पावती ७० हजार रुपयांची अन तब्बल १० ते १५ लाख रुपये घेतले जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने (ठाकरे गट) करण्यात आला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
याप्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हा प्रमुख विनायक भिसे पाटील, माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांच्या मार्गदर्शनाखाली आखाडा बाळापूर येथील हुतात्मा स्मारकापासून रविवारी ता. १७ आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेसचे नेते जकी कुरेशी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष डी. के. दुर्गे, माजी जिल्हा परिषद सदस्य अजित मगर, दिलीप घुगे, डॉ. संतोष बोंढारे, सोपान पाटील बोंढारे, अक्षय देशमुख, बाबुराव वानखेडे, डॉ. अरुण सुर्यवंशी, भागवत चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर बाजार समिती प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या निवेदनामुळे कळमनुरीच्या सहाय्यक निबंधक कार्यालयाने बाजार समितीकडे तातडीने खुलासा मागविला होता. मात्र बाजार समितीने त्रोटक खुलासा दिल्यामुळे आता या प्रकरणात सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार कळमनुरीचे सहाय्यक निबंधक सुधीर कांबळे, सहकार अधिकारी आर. व्ही. पुंड यांचे पथक चौकशी करणार आहेत. या चौकशीमध्ये काय निष्पन्न होणार याकडे परिसरातील व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.