लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात मंगळवारी आयपीएल २०२२चा ३१वा सामना खेळवला गेला. मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना झाला. हा सामना जिंकत उभय संघांना गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचण्याची संधी होती. त्यामुळे दोन्हीही संघ या सामन्यात दमदार प्रदर्शन करताना दिसले. परंतु अखेर बेंगलोरने १८ धावांनी हा सामना जिंकला. हा त्यांचा हंगामातील पाचवा विजय आहे. तर लखनऊचा हा तिसरा पराभव आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनऊने प्रथम गोलंदाजी निवडली होती. परिणामी बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांमध्ये ६ विकेट्सच्या नुकसानावर १८१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ ८ विकेट्स गमावून १६३ धावाच करूच शकला. कर्णधार केएल राहुल बाद झाल्यानंतर क्रुणाल पांड्या आणि दीपक हुड्डा ही अष्टपैलू जोडी भागीदारी करण्याच्या इराद्यात होती. मात्र मोहम्मद सिराजने हुड्डाला १३ धावांवर बाद करत ही जोडी फोडली.
जोस हेजलवुडचा भेदक मारा
बेंगलोरच्या १८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊकडून कृणाल पंड्याने सर्वाधिक धावा फटकावल्या. त्याने २८ चेंडू खेळताना २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ४२ धावांची झटपट खेळी केली. कर्णधार केएल राहुल या सामन्यात ३० धावा करून बाद झाला. तसेच मार्कस स्टॉयनिस (२४ धावा), दीपक हुडा आणि आयुष बदोनी (१३ धावा) यांनाही विशेष योगदान देता आले नाही. अष्टपैलू जेसन होल्डरही अंतिम षटकात ८ चेंडूंमध्ये १६ धावाच करू शकला. परिणामी लखनऊ संघ बेंगलोरच्या आव्हानाचा पाठलाग करण्यात अपयशी ठरला.
या डावात बेंगलोरकडून जोश हेजलवुडने शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २५ धावा देत ४ विकेट्स काढल्या. तसेच हर्षल पटेलनेही २ विकेट्स घेतल्या. आरसीबीचा डाव सावराणारा कर्णधार फाफ ड्युप्लेसिसला आपले शतक पूर्ण करण्यात अपयश आले. तो २० व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर ९६ धावांवर झेलबाद झाला. त्याला सामनावीराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. फाफ ड्युप्लेसिस आणि शाहबाज अहमदने पाचव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी रचली. मात्र शाहबाज २६ धावा करून धावबाद झाला आणि ही भागीदारी संपुष्टात आली.