मुंंबई9 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
मुंबईत आज ‘मातोश्री’ वर बुलढाणा लोकसभा मतदारसंघांचा आढावा उद्धव ठाकरे यांनी घेतला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव करण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत.
शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातर्फे लोकसभा मतदारसंघ निहाय आढावा बैठका सुरु आहेत. उद्धव ठाकरे यांनी पहिल्या टप्प्यात 32 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला होता. आजपासून दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघांच्या आढावा बैठका सुरु आहेत. दुसऱ्या टप्यातील 16 लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठका मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थित घेण्यात येत आहे.
निष्ठावंतांनी आपला बालेकिल्ला शाबूत ठेवावा
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा आढावा आज घेतला. माझ्यासोबत राहिल्या निष्ठावंतांनी आपला बालेकिल्ला शाबूत ठेवावा असे आदेश उद्धव ठाकरेंनी बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. इंडिया आघाडीमध्ये बुलढाणा लोकसभा मतदार संघ हा आपला पक्ष लढवणार आहे. या ठिकाणी शिंदे यांच्यासोबत गेलेल्या प्रतापराव जाधव यांचा पराभव करा आणि या मतदारसंघात आपलाच उमेदवार निवडून आणा असं सांगून उद्धव ठाकरेंनी कामाला लागण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत.
बुलढाणा मतदार संघाचा इतिहास
बुलढाणा लोकसभा मतदारसंघ 1999 पासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघातून सुरुवातीला 1999 आणि 2004 ला आनंदराव अडसूळ विजयी झाले होते. तर, 2009, 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव जाधव विजयी झाले होते. त्यामुळे इंडिया आघाडीत असताना देखील उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर दावेदारी सांगितलेली आहे.
दुसऱ्या टप्प्यात या जिल्ह्यांचा आढावा
उद्धव ठाकरेंनी पहिल्या टप्प्यात ३२ मतदारसंघांचा आढावा घेतला होता. ते आजपासून २६ ऑगस्टपर्यंत मराठवाडा आणि विदर्भातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा – गोंदिया, गडचिरोली – चिमूर, चंद्रपूर, जालना, संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा या मतदार संघांचा समावेश आहे.