मुंबई14 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची अद्याप चर्चा सुरू झाली नाही, अशी माहिती काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली. सध्या जी काही चर्चा बाहेर सुरू आहे, ती चुकीची आहे. या चर्चेला कुठल्याही प्रकारचा आधार नाही, वास्तव नाही. जागावाटपासंदर्भात अजून कुठलीही चर्चा सुरू झालेली नाही, असे म्हणत त्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला.
ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही आज जागावाटपाच्या चर्चेबद्दल विचारण्यात आले. मात्र, त्यांनीही नो-नो असे दोन शब्द उच्चारून चर्चेचे खंडन केले.
का होतेय चर्चा?
शरद पवारांच्या उपस्थितीत नुकतीच महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्धार झाला. यावेळी लोकसभेच्या 48 जागांच्या वाटपावर प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. त्यात 2019 मध्ये जिंकलेल्या जागा कायम राहतील. सोबतच भाजपच्या 23 मतदारसंघांत 50% जागा उद्धवसेना, तर उर्वरित 50% दोन्ही काँग्रेस लढणार असल्याचे समजते. यात काही जागांत बदलही घडू शकतो.
नेते काय म्हणाले?
कर्नाटक निवडणुकीचे निकाल आल्यानंतर शरद पवारांच्या घरी जागावाटपाची बैठक झाल्याचे समजते. मात्र, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी अशी कुठलिही चर्चा झाली नसल्याचे आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. या चर्चेला कसलाही आधार नाही. अजून चर्चा सुरूच झाली नाही, तर जागा वाटप ठरले, फॉर्म्युला ठरला, याला कसलाही आधार नसल्याचे सांगितले. या संदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनीही नो-नो म्हणत कसलिही चर्चा झाली नसल्याचे सांगितले.
चर्चेअंती प्रस्ताव मान्य?
भाजपकडे असलेले 23 मतदारसंघ तिन्ही पक्षांना समान (7 किंवा 8 जागा) वाटून द्यावेत, अशा प्रस्तावावर शरद पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीत सुरुवातीला चर्चा झाली. पण त्यावर एकमत झाले नाही. या मतदारसंघांमध्ये पक्षनिहाय ताकद वेगवेगळी असल्याने उद्धवसेनेने त्यापैकी 11, राष्ट्रवादीने 7 आणि काँग्रेसने 5 जागांवर तयारी करावी, हा प्रस्ताव चर्चेअंती मान्य करण्यात आल्याचे समजते.
संभाव्य जागावाटप
संभाव्य जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेस 11, काँग्रेस 6 जागांवर लढण्याची शक्यता आहे. 2019 च्या लोकसभेत भाजपने 25 जागा लढवून 23 जिंकल्या. शिवसेनेचे 18 (23), राष्ट्रवादी 4 (19) व काँग्रेसने 1 (25) जागा जिंकली. आता भाजपवगळता तिन्ही पक्ष एकत्र आले. शिवसेनेचे दोन गट पडले. त्यांचे 13 खासदार शिंदेंकडे, 5 उद्धवांकडे आहेत. मात्र गेल्या वेळी जिंकलेल्या जागा त्याच पक्षांना जातील असे मविआ नेत्यांनी ठरवले आहे. त्यामुळे फुटीर 13 खासदारांच्या जागेवरही उद्धवसेनेचाच उमेदवार असेल, असे समजते. तर दुसरीकडे लोकसभेसाठी तिन्ही पक्षात लोकसभेसाठी समसमान जागावाटप होईल, अशीही चर्चा आहे.
विधानसभेचे काय?
विधानसभेच्या जागावाटपाचीही प्राथमिक चर्चा झाली. लोकसभेनुसार हा फॉर्म्युला ठरवण्यावर एकमत झाले. त्यानुसार भाजपकडील 105 जागांपैकी 45% जागा उद्धवसेनेने, 30% राष्ट्रवादीने व 15 टक्के काँग्रेसने लढवाव्यात असे ठरले. वंचित, सपा, कम्युनिस्ट पक्ष, शेकाप या छोट्या पक्षांना 10 जागा मिळू शकतात. मात्र, सध्या तरी जागावाटपाची कसलिही बोलणी सुरू झाली नसल्याचे महाविकास आघाडीकडून सांगण्यात येत आहे.
इतर बातम्याः