|| संजय वाघ
जगणे, बोलणे, वागणे आणि लिहिणे या चारही कृती परस्परांशी सुसंगत असल्या पाहिजेत. त्यांत विरोधाभास असता कामा नये. तसे जर होत नसेल तर लेखकाने लिहिण्याच्या भानगडीत पडूच नये असे मला वाटते. या चारही पातळ्यांवर विसंगती दिसून येते तेव्हा मन विषण्ण होत नाही, तर त्या बेरक्या जमातीविषयी हसू येते. मी मात्र माझ्या परीने कटाक्षाने या बाबींशी एकजीव होत मुळाक्षरे गिरवत आलो आहे.
८० च्या दशकात माझे वडील रामदास वाघ हे साहित्यावरील निष्ठेपायी पदरमोड करून ‘क्रांतिगंध’ नावाचे त्रैमासिक प्रकाशित करायचे. आम्ही तिन्ही भावंडे ते अंक काखेत धरून वर्गणीदारांपर्यंत पोहोचते करायचो. तेव्हापासून हृदयाला बिलगलेल्या मराठी साहित्याचे आणि आपले अतूट नाते असल्याची भावना निर्माण झाली. या भावनेतूनच वाचनाची गोडी वाढत गेली. खरे तर शालेय पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त मी सर्वप्रथम मराठी साहित्य जर कोणाचे वाचले असेल, तर ते वडिलांचे! वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या कथा, कविता, लेख असोत, की जळगाव आकाशवाणीवरून प्रसारित झालेली आणि कापडण्यातील गावकऱ्यांनी अंगणात बसून ऐकलेली ‘काळ्या आईचा पुत्र’ ही कथा असो; या सगळ्या गोष्टी बालवयात माझ्यावर साहित्य संस्कार करायला पोषक ठरल्या. आपणही त्यांच्यासारखे काहीतरी लिहायला हवे असे वाटत असतानाच नववीत ‘न्याय’ ही पहिली कविता मी लिहिली आणि तेथून माझा काव्यप्रवास सुरू झाला. एकंदरीत मला लिखाणाची प्रेरणा वडिलांकडूनच मिळाली. त्यांच्या अंगी असलेला प्रामाणिकपणा, स्पष्टवक्तेपणा, पुरोगामित्व, सेवाभाव आणि त्यांचे कष्टप्रद जीवन जवळून न्याहाळल्याने त्यांच्या विचारांचा पगडा माझ्यावर नकळत बसत गेला. आपल्यालाही समाजासाठी काहीतरी हातभार लावता यावा, या उद्देशाने मी पत्रकारितेकडे वळलो. प्रारंभीच्या काळात सामाजिक बांधिलकी व आवड म्हणून या क्षेत्राकडे वळलो आणि पुढे ते आयुष्याचे एक अविभाज्य अंग बनून गेले. वास्तविक पत्रकारिता आणि साहित्य लेखन या दोन्ही गोष्टी काहीशा वेगळ्या असल्या तरी लेखनाची ऊर्मी मला स्वस्थ बसू देत नव्हती. प्रौढ व बालकथा, कविता, लेख महाविद्यालयीन जीवनापासूनच लिहीत होतो. परंतु पुस्तकरूपाने पहिल्या अपत्याची वाट तब्बल ३९ वर्षे बघावी लागली. व्यक्तिचित्रे, रिपोर्ताज, ललित, बालकथा, बालकविता, बाल-एकांकिका, किशोर कादंबरी व संपादन असे विविध प्रकार मी हाताळत आलो आहे. परंतु खरा आनंद दिला तो बालसाहित्याने. पत्रकारितेच्या रुक्ष व ताणतणावाच्या क्षेत्रात कार्यरत असताना पुस्तक लेखन कसे जमते, हा अनेकांच्या दृष्टीने उत्सुकतेचा आणि असूयेचा विषय होता. माझ्या मते, साहित्यनिर्मिती ही एक खाज असते. एखादा विषय लेखकाला आतून बाहेरून ढवळून काढत असतो. साहित्य लेखन हा लेखकाच्या आनंदाचा, समाधानाचा भाग असतो. ‘आवड असली की माणूस सवड काढतो’ या उक्तीप्रमाणे मी लिहीत राहिलो आणि शेपटीकडे न बघता गजराजाच्या ऐटीत चालत राहिलो. कालांतराने यशही मागोमाग येत गेले. हे करीत असताना यशाचा व पुरस्कारांचा विचार कधी डोक्यात ठेवला नाही. मुळात कोणत्याही लेखकाने या अपेक्षेने न लिहिता स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या आनंदासाठी लिहीत राहायला हवे. आनंदी होणे आणि आनंद वाटणे हाच खरा लेखकाचा लेखनधर्म असतो. हा आनंद पेरताना समाजातील दु:ख, दैन्य, दारिद्य्र आणि मन विषण्ण करणाऱ्या घटनांनी व्यथित झाला नाही तर तो लेखक या शब्दाला पात्र ठरत नाही. समाजातील पूर्वीची एकत्र कुटुंबपद्धती आणि आताची विभक्त कुटुंबपद्धती याच्या नफ्यातोट्याचा हिशेब केला तर या स्थित्यंतराचा सर्वाधिक फटका बालकांना आणि किशोरवयीन मुलांना बसला आहे. एकत्र कुटुंबपद्धतीत घरात आजी-आजोबा असायचे. ते थोर पुरुषांच्या गोष्टी सांगायचे. त्यामुळे कळत-नकळत बालमनावर संस्कार व्हायचे. कुटुंबात एकोप्याची भावना टिकून होती. दहा-बारा जणांचे खटले गुण्यागोविंदाने नांदायचे. नात्यात गोडवाही टिकून होता. आता ‘हम दो, हमारे दो’ कुटुंबात रमणारी पिढी काळाच्या ओघात संस्कृती आणि नातेबंधही विसरत चालली आहे. पर्यायाने मुले एकलकोंडी बनून आत्मविश्वासही हरवून बसली आहेत. सोबत खेळायला, गोष्टी सांगायला कोणी नसल्याने तासन् तास हातात मोबाईल घेऊन मुले नकली शत्रूला नकली गोळ्या मारण्यात धन्यता मानू लागली आहेत. या आत्मविश्वास हरवलेल्या मुलांच्या पंखांत विश्वासाची उमेद जागविण्यासाठी आपण काहीतरी लिहायला हवे हा विचार मला अस्वस्थ करीत होता. त्याच सुमारास ‘जोकर बनला किंगमेकर’ या किशोर कादंबरीचे बीज सापडले. आतापर्यंत करमणुकीच्या पलीकडे जोकरकडे बघितले गेले नाही, परंतु या कादंबरीत जोकरला नायकाचे स्थान देऊन त्याच्या समवयीन मुलांचा त्याला टीम लीडर बनवले आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाविषयीचे आतापर्यंतचे सर्व ढोबळ अनुमान खोडून काढत सामाजिक भान जपणारा आणि सामाजिक जाण असणारा सव्वादोन फूट उंचीच्या जोकरने ठरवले तर तो गावाचा कायापालट करू शकतो, गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणू शकतो… मग शरीराने सर्वसामान्य आणि धडधाकट मुले आपल्या यशाची पायवाट का निर्माण करू शकणार नाहीत, हा संदेश ‘जोकर बनला किंगमेकर’ या किशोर कादंबरीद्वारे देण्याचा प्रयत्न मी केला आहे.
बालसाहित्याने पारंपरिक प्रतिमा, प्रतीके आणि तोच तोच कित्ता गिरविण्यापेक्षा लेखनाची दिशा बदलण्याची वेळ आली आहे. ज्येष्ठांनी अनुभवलेले बालपण आणि आताच्या पिढीचे बालपण या दोन गोष्टी तशा निराळ्या आहेत. ग्रह-ताऱ्यांशी दोस्ती करायला निघालेल्या या पिढीला आपण किती दिवस चिव-काऊच्या गोष्टी सांगणार आहोत? अजाण असेपर्यंत पशुपक्ष्यांचे आकर्षण जरुर असते, परंतु त्यापुढे काय, असे प्रश्न आपल्या मनात उपस्थित होणे ही वर्तमानाची निकड व भविष्यकाळाची हाक आहे. आणि ती लेखकांनी अवश्य ऐकली पाहिजे.
विज्ञानयुगातील बालकांच्या आवडीनिवडी तसेच त्यांना समाधान देणाऱ्या गोष्टी बदलल्या आहेत. त्यांची कल्पकता, झेप हे सर्व काही आता बदलले आहे. बालसाहित्य हा दुय्यम दर्जाचा वाङ्मयप्रकार निश्चितच नाही. तो लिहिताना लेखकाचा कस लागतो. बालकविता लिहिताना साठीतल्या लेखकाला सहा वर्षाच्या बालकाच्या अंतरंगात शिरावे लागते… त्याच्या मानसिकतेचा विचार करावा लागतो. केवळ ‘ट’ला ‘ट’ लावून स्वत:चीच टिंगल करून घेणाऱ्या कवितांकडे हल्लीची मुले ढुंकूनही पाहत नाहीत. ती लगेचच पुस्तकाची पाने पालटतात. मुलांना गुंतवून ठेवणाऱ्या, त्यांना आपल्याशा वाटणाऱ्या कवितांची, कथांची, बाल- कादंबऱ्यांची या पिढीला प्रतीक्षा आहे. प्रौढ साहित्य सहजतेने लिहिता येते; बालसाहित्य मात्र अधिक जबाबदारीने लिहावे लागते. बालसुलभ मनाला रुचेल, पचेल व भावेल अशा बालसाहित्याची सध्या उणीव असून ती भरून काढायची असेल तर शहरी-ग्रामीण असा भेद न करता दोन्ही भागांतील मुलांना आपलेसे वाटेल अशा साहित्यनिर्मितीची गरज आहे. त्यासाठी साहित्यिकांना काळासोबत चालण्यावाचून गत्यंतर नाही.
शब्दांकन : परिणत आरकाडे
srwagh70@gmail.com
The post बालसाहित्यात लेखकाचा कस लागतो… appeared first on Loksatta.