पुणेएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
गुजरात राज्यातील ओएनजीसी कंपनीमध्ये 50 कोटी रुपयांचे टेंडर मिळवून देतो असे सांगून गुंतवणुकीच्या बहाण्याने एका दाम्पत्याने एक कोटी 27 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
त्याचप्रमाणे कोरे धनादेश चोरून चोरट्यांनी दोन कोटी 57 लाख रुपये देखील परस्पर चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे.
अश्लेशा धर्मेश शहा आणि धर्मेश प्रफुल्लचंद्र शहा (दोघे रा. अपेक्षा पार्क सोसायटी, बडोदा, गुजरात) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. याबाबत विक्रम रघुनाथ नलावडे (वय – 46, रा. पिनॅक गंगोत्री सोसायटी, नागरस रोड, औंध,पुणे) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सदरचा प्रकार डिसेंबर 2019 ते डिसेंबर 2022 दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दाम्पत्य शाह हे पती पत्नी असून त्यांनी डिसेंबर 2019 ते डिसेंबर 2022 या कालावधीत संगणमत करून तक्रारदार यांना धर्मेश शहा याने गुजरात येथील नामांकित ओएनजीसी कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे लेटरहेड दाखविले. त्याच आधारे त्यांनी नलावडे यांना कंपनीनेमध्ये 50 कोटींचे टेंडर देतो असे खोटेच सांगून नलावडे यांच्याकडून वेळोवेळी रोख व आरटीजीएस स्वरूपात एक कोटी 27 लाख 50 हजार घेतले.
परंतु, त्यांना कोणत्याही प्रकारे गुजरात येथील ओएनजीसी कंपनीचे टेंडर न देता तसेच दिलेले पैसे परत न करता विश्वासघात करून तक्रारदार यांची फसवणूक केली. तसेच नलावडे यांचा एक सही केलेला धनादेश चोरून त्यावर दोन कोटी 57 लाख 69 हजारांची रक्कम टाकून तो धनादेश बँकेत वटविण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत.