पुणे17 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
- महागड्या गाड्याचे आमिष वेगवेगळ्या घटनांत १५ कोटी रुपयांची फसवणूक
बोगस कंपनी स्थापन करून कंपनीच्या नावे विविध योजना जाहीर करून नागरिकांना लाखो रुपयांच्या रकमा ट्रेडिंग कंपनीत गुंतवण्यास भाग पाडून ३९ जणांची एकूण चार कोटी ६२ लाख १५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्या मुख्यसंचालकासह ८ जणांवर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स एललएलपी या कंपनीचा मुख्य संचालक लोहितसिंग सुभेदार, कंपनीचा आशिया मार्केटिंगचा प्रमुख तसेच पुण्यातील ऑफिस चालक अमर चौघुले, डायमंड ग्रुपचे व टेक्सट्रग व्हेन्चर्संचा प्रमुख भिकाजी कुंभार, पिलर व कॅपिटल सिक्रेटचा कंपनीचा प्रमुख बाबूराव हजारे, ए. एस. ट्रेंडर्स डेव्हलपर्स अँड एलएलपी कंपनीचे पार्टनर व संचालक अदिनाथ पाटील, लोणावळा येथील फ्रॅचायजी चालक प्रदीप मड्डे व कंपनीचे पुणे जिल्हा फ्रॅन्चायजी चालक संतोष वाजे अशा आठ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणी मड्डे आणि वाझे यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत व्यावसायिक असलेले गुंतवणुकदार प्रकाश महालिंग खंकाळे (रा. धायरी, सिंहगडरोड,पुणे) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२२ ते आतापर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ए. एस. कंपनीचा मुख्य संचालक सुभेदार आणि इतर ७ जणांनी नागरिकांना फसवण्याच्या उद्देशाने बोगस ट्रेडिंग कंपनी सुरू केली होती. संबधित कंपनीच्या माध्यमातून विविध योजना जाहीर केल्या. गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे, महागड्या गाड्या बक्षीस देण्याचे, विदेशात सहलीला नेण्याचे आमिष दाखवून विविध योजनांच्या नावे गुंतवणुकदारांकडून लाखोंच्या रकमा जमा करून काही दिवस त्यांना परतावा देण्याचा बहाणा केला. गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन करून त्यानंतर सदर स्वीकारलेल्या रकमांवर कोणताही परतावा किंवा रक्कम परत न करता ३९ गुंतवणुकदारांची एकूण ४ कोटी ६२ लाख १५ हजार परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांना गंडवले
रेस्टॉरंट देण्याच्या बहाण्याने साडेपाच कोटींची फसवणूक
कॅम्प परिसरातील उच्चभ्रू इमारतीत रेस्टॉरंट विकत घेण्याच्या बहाण्याने एका बांधकाम व्यावसायिकाची साडेपाच कोटींची फसवणूक करण्यात आली. याबाबत प्रसाद यशवंत भिमाले यांनी तक्रार केली आहे. त्यानुसार सुशील घनश्याम अग्रवाल (रा. लुल्लानगर, पुणे) आणि अल्नेश अकील सोमजी ( रा. बोट क्लब रोड, पुणे ) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
रिव्ह्यू देण्याच्या बहाण्याने ३४ लाखांना ऑनलाइन गंडा
टेलिग्रामवर कमिशन देण्याच्या बहाण्याने एका तरुणाची तब्बल ३४ लाख ७६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपींविरोधात सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. अकिक वासूदेव रानडे यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. आध्या रीधान, रेक्रुईट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि धर्मेश कुमार नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला.
सूतगिरणी देण्याचा बहाणा करून ५ कोटींची फसवणूक
सोलापूर येथील सहकारी सूतगिरणी लिलावात घेतल्यानंतर सूतगिरणी आणि सूतगिरणीची जमीन पुण्यातील व्यवसायिकाला विक्रीच्या बहण्याने ५ कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मे आयबीए एंटरप्राईजेसचे संचालक अब्दुल करीम झाका (रा. आगरी पाडा, मुंबई) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत प्रशांत ओम प्रकाश भंडारी यांनी तक्रार दिली.