विराट कोहली एकेकाळी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल असायचा. पण या आयपीएलमधील १२ सामन्यांत तो तीन वेळा शून्यावर बाद झाला आहे, तर ६ सामन्यांमध्ये त्याला दोन अंकी धावसंख्याही उभारता आलेली नाही. त्यामुळे अपयशी ठरलेल्या विराट कोहलीला आता भारताचे माजी कर्णधार व समालोचक सुनील गावस्कर यांनी मोलाचा सल्ला दिला आहे.
विराट कोहली हा सध्याच्या घडीला आयपीएलमध्ये सातत्याने अपयशी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंतच्या १२ सामन्यांतील सहा लढतींमध्ये तर त्याला दोन अंकी धावसंख्याही उभारता आलेली नाही. आतापर्यंतच्या सर्व आयपीएलमधील त्याची ही वाईट कामगिरी ठरली आहे. त्यामुळे भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर कोहलीवर चांगलेच भडकलेले पाहायला मिळत आहे.
सुनील गावस्कर नेमकं काय म्हणाले, पाहा…
कोहलीचा वाईट कामगिरी पाहता त्याला भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ब्रेक घेण्याचा सल्ला दिला होता. याबाबत गावस्कर म्हणाले की, ” विराट हा भारताच्या सामन्यांमध्ये खेळणार नाही, या आपण ब्रेक म्हणू शकत नाही. कोणत्याही खेळाडूची देशाकडून खेळण्यालाच पहिली पसंती असायला हवी. त्यामुळे कोहलीने भारताकडून खेळायलाच हवे. जर कोहलीने ब्रेक घेतला आणि तो खेळला नाही तर त्याचा हरवलेला फॉर्म परत येणार तरी कसा, त्यामुळे त्याने खेळतच राहायला हवे. फक्त ड्रेसिंग रुममध्ये बसून फॉर्म काही परत येणार नाही. विराट जितका काळ क्रिकेट खेळेल तितक्या लवकर त्याला फॉर्मात येण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे त्याने ब्रेकचा विचार न करता खेळत राहायला हवे.”
गावस्कर पुढे म्हणाले की, ” ज्या लोकांना क्रिकेट समजतं किंवा जे क्रिकेट बराच कालावधीपासून पाहत आहेत, त्यांना प्रत्येकाला विराटने फॉर्मात यायला हवं, असं वाटत आहे. विराटने भारताकडून खेळताना जास्तीत जास्त धावा काढाव्यात, असे सर्वांनाच वाटते. पण त्यासाठी विराटने सतत खेळत राहायला हवे. विराट पुन्हा एकदा मोठी खेळी साकारेल, अशी अपेक्षा सर्वांनाच आहे.”
या आयपीएलमध्ये कोहली अपयशी ठरलेला आहे. एकेकाळी कोहली हा आयपीएलमधील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून ओळखला जायचा. पण सध्याच्या घडीला मात्र विराटवर फॉर्म रुसलेला आहे. दोन वर्षांमध्ये त्याला एकही शतक पूर्ण करता आलेले नाही. त्यामुळे आता विराट पुन्हा कधी फॉर्मात येणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.