परभणी4 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
गंगाखेड तालुक्यातील 3 भावांची पोलिस भरतीत अंतिम निवड झाली आहे. तिघे लहान असतानाच आई-वडीलांचे नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. मात्र, खचून न जाता आश्रम शाळेत शिक्षण घेत मेहनत करत पोलिस भरतीची तयारी केली आणि पहिल्याच फटक्यात यश मिळवले आहे.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेडच्या माखणी गावातील कृष्णा, ओंकार, आकार या सिसोदे बंधूंच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र वयाच्या आठव्या वर्षीच हरपले. यावेळी ना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक परस्थिती होती ना, काही साधन. मात्र, ह्या तिन्ही भावांनी शिक्षणाची वाट सोडली नाही. गावातील जि.प.च्या शाळेत दुसरीपर्यंत शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी खानापूर फाटा येथील आश्रमशाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतले. मात्र, ही शाळा बंद झाली. यानंतर परभणीतील जिजाऊ ज्ञानतीर्थ या शैक्षणिक संस्थेत त्यांना मोफत शिक्षणाची संधी मिळाली, आणि त्यांच्या शिक्षणाचा पुढचा मागर्क मोकळा झाला. याच शाळेत त्यांनी 8 वी ते 12 पर्यंतचे शिक्षण घेतले.
यानंतर सिसोदे बंधुंनी पुण्यात काम करण्यास सुरूवात केली असली तरी देखील बालपणापासून असलेली आर्थिक परस्थिती बदलायची म्हणून अभ्यासाची साथ सोडली नाही. आपला मोठा भाऊ सालगडी म्हणून काम करत आपल्याला प्रत्येक वेळी मदत करतो त्यांच्यासाठी काही तरी करावे. आणि यातच त्यांना पोलिस भरतीची जाहिरात निघाल्याचे समजले. तिन्ही भावंडांपैकी कृष्णा आणि आकार यांनी मुंबई, तर ओंकार याने परभणीत अर्ज भरला. कृष्णा केशव सिसोदे (23), ओंकार केशव सिसोदे (21), आकार केशव सिसोदे (21) या तिन्ही भावंडांनी पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली आणि यारुपाने तिघांच्या संघर्षाला फळ मिळाले.
मेहनतीचे चीज झाले
कृष्णा, ओंकार आणि आकार हे 8 ते 10 वर्षांचे असताना त्यांच्या आई-वडीलांनी नापिकीला कुटाळून आतम्हत्या केली होती. यावेळी त्याचा मोठा भाऊ आकाशवर हा तिघांची जबाबदारी आली. आकाशने लहान वयातच मिळेल ते काम करून त्यांनी भावंडांना शिक्षणासाठी मदत करून आई- वडीलांचे कर्तव्य एकट्याने पार पाडले. माखणी गावात आकाश सिसोदे आजही सालगडी म्हणून काम करत आहे. मोठ्या भावाने तिघांना सांभाळले, त्याच्या कष्टाचे मेहनतीचेही आज चीज झाल्याचे आकाश सिसोदे म्हटले आहे.