छत्रपती संभाजीनगर26 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
प्रेमप्रकरणातून अपत्यप्राप्ती झाल्यानंतर बदनामीच्या धाकाने अर्भक शेतातील कुंपणात फेकून दिले. त्याची माहिती प्रियकराला दिल्यानंतर त्याने भावाच्या मदतीने अर्भक शिशुगृहात जमा केले. महिनाभरानंतर प्रियकरासोबत लग्नास मुलीच्या कुटुंबीयांनी अनुमती दिली. लग्नानंतर फेकलेल्या अर्भकासंबंधी मायेचा पाझर फुटला. मग मूल शिशुगृहातून परत आणण्यासाठी प्रियकराकडे हट्ट केला. पुन्हा बालकल्याण समितीच्या माध्यमातून अर्जफाटे केले. अखेर नवजात बाळ आणि मातेची डीएनए चाचणी करण्यात आली. चाचणीत बाळाचा दावा यशस्वी झाला. मूल संबंधित मुलीचे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याचा ताबाही देण्यात आला.
समाजात बदनामीच्या धाकाने तारुण्यात झालेली चूक लपवण्याचे बऱ्याच वेळा प्रयत्न केले जातात. मात्र, भाग्यात काही निराळेच लिहिलेले असते. अशीच एक घटना २२ वर्षे वयाची मुलगी व ३० वर्षे वयाच्या मुलाच्या प्रेमप्रकरणाची आहे. एकाच गावात एकाच समाजातील तरुण-तरुणीचे एकमेकांशी प्रेम जुळले. अधूनमधून झालेल्या भेटींमधून गोष्ट पुढे गेली. मुलगी गर्भवती राहिली आणि आश्चर्याची बाब म्हणजे नवव्या महिन्यापर्यंत आई-वडील अथवा कुटुंबातील कुणाच्याही ते लक्षात आले नाही. मुलीची अंगकाठी अशी होती की ती गर्भवती असल्याचे लक्षात आलेच नाही. प्रसूतिवेदना जाणवू लागल्यानंतर सायंकाळी मुलगी एकटीच शेतात गेली. तेथे तिने गोंडस मुलीला जन्म दिला. दगडाने नाळ तोडली. तिला एका कपड्यात गुंडाळून सुरक्षित कुंपणात ठेवले आणि घरी परतली.
कुटुंबीयांच्या संमतीने आधी लग्न, नंतर मायेचा पाझर
मुलीच्या कुटुंबाला बाळाविषयी माहिती समजली. नंतर दोन्ही कुटुंबीय लग्नासाठी तयार झाले. लग्न झाले आणि मुलीला मायेचा पाझर फुटला. लग्नानंतर शिशुगृह गाठून त्यांनी बाळाचा ताबा देण्याची विनंती केली. प्रकरण पुन्हा बालकल्याण समितीसमोर आले. समितीने ‘डीएनए’ चाचणीचे आदेश केले. ‘डीएनए’ चाचणी जुळली. बाळाला नवविवाहित दांपत्याच्या स्वाधीन करण्यात आले.
गर्भवती मुलीच्या भावना न समजणे हे दुर्दैवच
नऊ महिन्यांच्या गर्भवती मुलीच्या भावना आईला समजल्या नाहीत हे दुर्दैव आहे. एकाच समाजाच्या सज्ञान मुलाशी प्रेमप्रकरण होते. त्यांच्या भावनांची कदर केली असती तर अशी परिस्थिती उद्भवली नसती. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाचा त्याग केल्यानंतर दोन महिन्यांत पुन्हा आई परत घेऊ शकते. नसता मूल दत्तक दिले जाते. – गजानन सूर्यवंशी, सदस्य, बालकल्याण समिती, छत्रपती संभाजीनगर.