प्रसंगोचित, पण मौलिक!


अलीकडेच निशिकांत पवार यांची ‘साहित्य प्रसंग’, ‘संवाद प्रसंग’, ‘तुलना प्रसंग’ ही तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत

Advertisement

आसाराम लोमटे

अनुवादाची प्रक्रिया बऱ्याचदा आपल्याकडे एकतर्फी असते. म्हणजे अन्य भाषेतून मराठी भाषेत साहित्यकृतींचे अनुवाद होतात, पण मराठी भाषेतील श्रेष्ठ साहित्यकृती अन्य भाषेत अपवादानेच अनुवादित होतात. आजचे बहुतेक अनुवादक हे केवळ मराठी अनुवाद करणारेच आहेत. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अनुवादक, समीक्षक निशिकांत ठकार यांचे कार्य उठून दिसते. मराठीतील अनेक महत्त्वपूर्ण लेखकांचे साहित्य त्यांनी हिंदूी भाषेत नेले आहे.

Advertisement

प्रसिद्ध कवी अरुण कोलटकर, नामदेव ढसाळ, ना. धों. महानोर, वाहरू सोनवणे यांच्यासह श्याम मनोहर, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, महेश एलकुंचवार यांच्या साहित्यकृती हिंदूीत अनुवादित करून मराठी साहित्य सर्वदूर पोहोचविण्यात ठकार यांनी मोलाचे योगदान दिले आहे. मराठीतील श्रेष्ठ कविता, कादंबरी, नाटक, कथा असे सर्वच साहित्यप्रकार हिंदूी भाषेत नेण्याचे त्यांचे हे कार्य अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अनुवादाच्या क्षेत्रात मौलिक योगदान देणाऱ्या निशिकांत ठकार यांचे ‘मराठी कविता : स्वरूप आणि विवेचन’, ‘साहित्याचे परिघ’, ‘साहित्यमूल्य आणि मूल्यांकन’, ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कथा : परिदृश्य’ हे समीक्षा/संपादन ग्रंथ त्यांच्यातल्या मर्मज्ञ समीक्षकाची ओळख करून देण्यास पुरेसे आहेत. वाङ्मय क्षेत्रात अनुवाद, समीक्षा, संपादन अशा सर्वच कामांत त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे.

अलीकडेच निशिकांत पवार यांची ‘साहित्य प्रसंग’, ‘संवाद प्रसंग’, ‘तुलना प्रसंग’ ही तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनुवाद, समीक्षा यासंदर्भात आयुष्यभर अत्यंत निष्ठापूर्वक आणि गांभीर्याने ठकार यांनी केलेले काम जाणकार मराठी वाचकांना परिचित आहे. या तिन्ही पुस्तकांच्या माध्यमातून त्यांचे प्रसंगपरत्वे केलेले लेखन, भाषणे, संपादित-संकलित झाले आहेत. यातले बहुतांश लेखन हे प्रसंगोचित असले तरी त्यानिमित्ताने झालेले चिंतन मात्र एकूण साहित्यविचाराला समृद्ध करणारे आहे. ठकार यांच्या निवृत्तीलाही आता पंचवीस वर्षे झाली आहेत. निवृत्तीनंतरही दीर्घकाळ सक्रिय राहणारे त्यांच्यासारखे उदाहरण दुर्मीळ आहे.

Advertisement

‘साहित्य प्रसंग’ हे पुस्तक एकूण भारतीय साहित्याची मर्मस्थळे शोधण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. भारतीय कथा, कविता, कादंबरी या संकल्पना ठकार यांनी त्यातून स्पष्ट केल्या आहेत. त्याचबरोबर कालिदास, संत नामदेव, मिर्झा गालिब, राहुल सांकृत्यायन, प्रेमचंद यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा त्यांनी घेतलेला शोध महत्त्वाचा आहे. या पुस्तकातील ‘भारतीय कादंबरीचा शोध’ या लेखात आशयद्रव्य आणि आविष्कार रूप या दोन्ही अंगांनी भारतीय कादंबरीचा मर्मज्ञ वेध ठकार यांनी घेतला आहे. त्याआधी त्यांनी स्पष्ट केलेली ‘भारतीय’ ही संकल्पना महत्त्वाची आहे. कादंबरीकाराकडे हवी असणारी प्रगतिशील जीवनदृष्टी, बहुमितीने जीवनाचे चित्रण करण्याची असोशी आणि वास्तववादी शैलीच्या मर्यादा तोडून नवे स्वरूप घडविण्याची आकांक्षा अशा अनेक वैशिष्टय़ांवर कोणत्या कादंबऱ्या खऱ्या अर्थाने भारतीय म्हणता येतील याची चर्चा या लेखात करण्यात आली आहे. त्याच प्रकारे कविता, कादंबरी या वाङ्मयप्रकारांतील भारतीय संकल्पनेचा शोध घेणारे लेख या पुस्तकात आहेत. गालिब, प्रेमचंद, नाटककार मोहन राकेश यांच्या साहित्यातील श्रेष्ठतेचे ठकार यांनी केलेले विश्लेषण नवी दृष्टी देणारे आहे. साहित्यातील भारतीयता कवेत घेणारा त्यांचा आवाका स्तिमित करणारा आहे.

‘संवाद प्रसंग’ या पुस्तकात त्र्यं. वि. सरदेशमुख, विष्णू खरे, अरुण कोलटकर या साहित्य क्षेत्रातील व्यक्तींशी झालेला संवाद आहे. सुधीर पटवर्धन, पं. सत्यदेव दुबे, मोहन आगाशे, स्मिता पाटील या कला क्षेत्रातील व्यक्तींच्या मुलाखतींचा अंतर्भाव यात आहे.  या व्यक्तिमत्त्वांच्या अंतरंगाची ओळख या संवादातून होते. यातील त्र्यं. वि. सरदेशमुख यांची मुलाखत अत्यंत महत्त्वाची आहे. त्यातून त्यांचा साहित्यिक प्रवास, जीवनधारणा स्पष्ट होतात. ‘बखर एका राजाची’, ‘डांगोरा’ आणि ‘उच्छाद’ या कादंबरी त्रयींमागील निर्मितीप्रक्रिया या संवादातून उलगडत जाते. विष्णू खरे यांच्याशी झालेल्या संवादातून अनुवादासंबंधीचे अनेक पैलू कळतात. ‘दर वीस वर्षांनी प्रत्येक कृती एका नव्या, वेगळ्या अनुवादाची मागणी करते. एखादी कृती एकाच काळातसुद्धा अनेक अनुवादाची मागणी करत असते. अनुवाद अनेक लोकांनी एकाच वेळी अथवा वेगवेगळ्या युगात करत राहिले पाहिजेत. नाहीतर एकीकडे अनुवाद जुने होत जातील आणि मूळ कृतीही मरून जातील. अनुवादक मूळ कृतींना जीवन देऊ शकतात..’ हा विष्णू खरे यांनी मांडलेला विचार नव्याने चर्चा करण्याजोगा आहे. या पुस्तकातील कलावंतांच्या मुलाखती त्या-त्या कलावंतांचे अंतरंग समजून घेण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. परिशिष्टात निशिकांत ठकार यांची दीर्घ मुलाखत आहे. अनुवादक, समीक्षक म्हणून ठकार यांनी केलेल्या कार्याचा परिचय आणि त्यामागील भूमिका या संवादातून स्पष्ट होते.

Advertisement

‘तुलना प्रसंग’ या ग्रंथातून काही व्यक्तिमत्त्वांची तुलना करण्यात आली आहे. साहित्य क्षेत्रात तौलनिक साहित्य ही ज्ञानशाखा आता सर्वाच्या परिचयाची झाली आहे. ठकारांनी संत तुकाराम- संत कबीर, िवदा करंदीकर आणि समशेर बहादूर सिंह, गजानन माधव मुक्तिबोध आणि शरच्चंद्र मुक्तिबोध, भुजंग मेश्राम आणि अरुण काळे अशा अनेक व्यक्तिमत्त्वांची वैशिष्टय़े नमूद केली आहेत. यातून कोणाची श्रेष्ठ-कनिष्ठता न दाखवता या दोन्ही बाजू वाचकांसमोर ठेवून त्या समजून घेण्याचा उद्देश त्यातून स्पष्ट होतो. तुलनेने ज्ञानाच्या कक्षा विस्तारतात, जाणिवांचा विकास होतो, परस्पर संगती-विसंगतीने भावना व विचारांची घुसळण होते आणि एकूणात अनुभव समृद्ध होतो, ही यामागची भूमिका आहे. यात जशी दोन व्यक्तिमत्त्वांची तुलना आहे, तशीच साहित्यकृतींचीही तुलना आहे. यातला ‘हिंदूी आणि मराठीतील मध्ययुगीन साहित्य’ हा दीर्घ लेख असंख्य संदर्भानी समृद्ध आहे. तर मराठी-कन्नड साहित्याचे अनुबंध शोधताना ठकारांनी दोन्ही भाषिक संस्कृतींचा मनोज्ञ परिचय घडवला आहे. मराठी-हिंदूी नाटकांचा परामर्श घेणारा लेखही या पुस्तकात आहे.

कोणत्याही साहित्यकृतीचा वेध घेण्याची ठकार यांची खास अशी समीक्षादृष्टी आहे. ती कुठेही आवाजी, अभिनिवेशी होत नाही. ज्या विषयाचे पैलू उलगडायचे आहेत त्याच्या गाभ्यापर्यंत ते जातात आणि मर्मज्ञ जाणकाराप्रमाणे वाचकांसमोर अनेक अलक्षित बाजू प्रकाशमान करतात. त्यामुळे साहित्यकृतींचे आकलन करताना ठकारांची शैली वाचकांनाही नवे भान देते. या तिन्ही पुस्तकांची शैलजा आशुतोष चित्रे यांनी चितारलेली मुखपृष्ठे अत्यंत वेधक आहेत. तिन्ही पुस्तकांचा मिळून साडेसहाशेहून अधिक पृष्ठांचा हा ऐवज आहे.

Advertisement

‘साहित्य प्रसंग’, ‘तुलना प्रसंग’, ‘संवाद प्रसंग’ : निशिकांत ठकार, आर्ष पब्लिकेशन, तिन्ही पुस्तकांची किंमत : ८८० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Advertisement

Source link

Advertisement