नाशिक6 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
उन्हाळ्यामुळे पाणीसाठा कमी होत आहे. पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेवून पाण्याचा वापर कमीत कमी ठेवावा. नळाला मोटारी लावू नये असे जाहीर आवाहन प्रशासनाने केले होते. मात्र त्या आवाहनाला न जुमानता काहींनी नळाला मोटारी लावून पाणी खेचण्याचे कृत्य उघडपणे सुरूच ठेवले. त्यामुळे इतरांना नळाचे पाणी व्यवस्थित, पुरेसे मिळत नसल्याच्या तक्रारी पाणी पुरवठा विभागाला प्राप्त होत होत्या. त्याची दखल घेऊन प्रशासनाने आजपासून धडक कारवाई सुरू केली.
नळाला सर्रासपणे मोटार वापरताना आढळून आलेल्या सहा मोटारी चारणवाडी भागातून जप्त करण्यात आल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डच्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता स्वप्नील क्षत्रिय यांनी दिली.
उन्हाचा तडाखा वाढला असून त्याप्रमाणे पाणी जपून वापरण्याचे आवाहन देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पाणी पुरवठा विभागाकडून होत आहे. शहरातील काही भागात मोटारी वापरल्याने त्या भागातील ईतर कनेक्शन धारकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्याबद्दल तक्रारीचा ओघ सुरू होतो. त्यामूळे शहरात पाण्याच्या मोटारी जप्त करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे.
शुक्रवार दिनांक १९ रोजी सकाळी पाणीपुरवठा विभागाच्या वतीने मोटार जप्त करण्याची मोहिम कँटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राहुल गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली व अभियंता स्वप्नील क्षत्रिय यांच्या मुख्य उपस्थितीत सुरू करण्यात आली.
यावेळी पाणीपुरवठा विभागाचे देविदास बनसोडे, शेखर त्रिभवन, राजेश कंडारे, हनीफ शेख, संदीप मेढे, दिनेश ठोकळ, योगेश लोणे, राजेश पवार, संदीप गोरे, राहूल साबळे, बाळू गायकर, कैलास कासार, निखिल भालेराव, नितीन चौधरी यांनी पहिल्याच दिवशी चारनवाडी भागात छुप्या पद्धतीने पाण्याच्या मोटारी वापरणाऱ्याच्या ६ मोटारी देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने जप्त करण्यात आल्या. शहरात सर्व वॉर्डांत मोटार जप्त करण्याची मोहिम राबविली जात असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.