मुंबई6 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
जे. पी. नड्डा हे अपयशी भाजप अध्यक्ष आहेत. ते गद्दारांच्या साथीने मुंबई महापालिका जिंकण्याचे स्वप्न पहात आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. ते मुंबईत बोलत होते.
नड्डा आज पुण्यात आहेत. त्यांनी यावेळी काँग्रेस आणि ठाकरे गटावर घणाघाती टीका केली. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, मला काँग्रेस सोबत जाण्याची वेळ आली तर शिवसेना बंद करेल. मात्र, आज तेच घडले. उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेले व त्यांची शिवसेना बंद झाली, असा टोला त्यांनी हाणला. नड्डा यांच्या याच टीकेला लोंढे यांनी उत्तर दिले.
हिमाचलमध्ये पराभव
अतुल लोंढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे गृहराज्य असलेल्या हिमाचल प्रदेशात काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव करत विधानसभेवर विजय पताका फडकावली. शिमला महापालिकेतही भाजपचा काँग्रेसने पराभव केला. त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात भाजपचा एकही उमेदवार ते निवडून आणू शकले नाहीत. कर्नाटकातही नड्डांच्या भाजपचा सुपडासाफ झाला. नड्डा म्हणजे पराभव. ते काही गद्दारांच्या साथीने मुंबई महापालिका जिंकण्याचे दिवास्वप्न पहात आहेत.
भ्रष्टाचारात बुडाले
अतुल लोंढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला देशभरातील जनता कंटाळलेली आहे. विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचारात भाजप आकंठ बुडालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जनता प्रतिसाद देत नाही तर जे. पी. नड्डांना कोण प्रतिसाद देणार? परंतु राणा भीमदेवी थाटात मुंबई महापालिका जिंकण्याच्या वल्गना ते करत आहेत.
मुंबईत थारा नाही
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या कांदीवलीमधील कार्यक्रमाला शंभर माणसेही उपस्थित नव्हती. जे . पी. नड्डांना त्यांचे गृहराज्य हिमाचल प्रदेशने स्वीकारले नाही, तर मुंबईची जनता त्यांना कशी साथ देईल. भाजपा व जे. पी. नड्डा यांनी कितीही जोर लावला, तरी मुंबई महानगरपालिका जिंकणे त्यांना शक्य नाही. मुंबईकर जनता भाजपाचे राजकारण ओळखून आहे, ते त्यांना थारा देणार नाहीत, असा दावाही लोंढे यांनी केला.
संबंधित वृत्तः
ज्यांना पोरगा झाला नाही, तेही आनंद साजरा करत आहेत – कर्नाटक निवडणुकीवरून ठाकरेंना फडणवीसांचा टोला
मविआचा 1 पक्ष भाकरी फिरवणारा, दुसरा तुकडे करणारा, तिसरा भाकरी हिसकवणारा – फडणवीस