सोलापूर17 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मलईदार पोस्टींगसाठी तलाठ्यांमध्ये चडाओढ पहायला मिळत आहे.
कोरोनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या कमी प्रमाणात केल्या होत्या, पण यंदा ही संख्या १५० हून अधिक असणार आहे.
चांगला सज्जा मिळवण्यासाठी प्रयत्न
शासनाने शहरातील सोलापूर सर्कलमध्ये नवीन चार सर्कलची निर्मिती केली आहे. त्याठिकाणी यंदा नियुक्ती देण्यात येणार आहे. एका सर्कलसाठी पाचहून अधिक मंडलाधिकारी शर्यतीत राहत होते पण त्यात विभागणी झाल्याने स्पर्धा कमी झाली आहे. त्याऐवजी आता चांगला सज्जा मिळण्यासाठी तलाठी थेट वरच्या स्तरावरूनच प्रयत्न करत आहेत. सोलापूर सर्कलची विभागणी करून त्यात मजरेवाडी, सोरेगाव, कोंडी व बाळे ही चार नवीन सर्कल तयार केली आहेत. जिल्ह्यात १९ नवीन मंडळे तयार करण्यात आली आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांकडे अंतिम निर्णय
मे महिना सुरू झाला की कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागतात. काही जण सोयीच्या ठिकाणी तर काही जण कौटुंबिक अडचणीचे कारण समोर करून बदलीसाठी प्रयत्न करतात. यंदा ५५ अव्वल कारकून, ६२ महसूल सहायक तर २७ मंडलाधिकारी बदलीस पात्र आहेत. प्रशासकीय बदल्या व विनंती बदल्या याचा मेळ घालून कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जाते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर प्रशिक्षणासाठी गेल्याने अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे याचा अंतिम निर्णय घेणार आहेत.
पोस्टिंगसाठी फिल्डिंग
यंदाच्या बदली प्रक्रियेत अव्वल कारकून व मंडलाधिकारी यांच्यापेक्षा तलाठीच अधिक प्रयत्नशील आहेत. अव्वल कारकून व महसूल सहायक दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट व मोहोळ या तालुक्यांत पोस्टिंगसाठी प्रयत्नशील आहेत तर मंडलाधिकाऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी पोस्टिंग मिळावी यासाठी फिल्डिंग लावली आहे. बदलीसाठी पात्र कर्मचाऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या असून यावर पुढील आठवड्यात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.