पॅशन फॅशन : नव्या कापडांची नांदीमृणाल भगत response.lokprabha@expressindia.com

Advertisement

अननस किंवा कॉफीपासून तयार होणाऱ्या गोष्टींची नावे सांगा, असा प्रश्न कोणी विचारला, तर तुमचं उत्तर काय असेल? अर्थात सरबतापासून ते केकपर्यंतच्या असंख्य पदार्थाची नावे तुमच्या डोळ्यासमोर येतील. पण याच साहित्यापासून कोणी कापड तयार करत आहे, असं सांगितलं तर? अर्थात हे पचायला थोडं कठीण जाईल नाही? पण हे खरं आहे बरं का..

फॅशन किंवा कपडय़ांचा विषय निघाला की, कापडाचा विषय येणं साहजिकच आहे. कापडांचा विषय हा नैसर्गिक आणि कृत्रिम कापड यांच्यातील वादाशिवाय पूर्ण होऊ  शकत नाही. कॉटन, सिल्क, लिनिन हे कापडांचे प्रकार त्यांच्या नैसर्गिक आणि सुटसुटीत या दोन गुणधर्मामुळे नेहमीच उजवे ठरतात. पर्यायाने रेयॉन, पॉलिइस्टर, डेनिम आधुनिकतेच्या विभागात बाजू मारून नेत असले, तरी बाकी बाबतीत त्यांची बाजू थोडी कमजोरीची असते. कॉटन, लिनिन रोजच्या वापराला सोयीचे ठरतात. पारंपरिक समारंभ किंवा पार्टीमध्ये सिल्क भाव खाऊन जात, अशावेळी या कापडांच पारडं जड होणं साहजिकच आहे. त्यात या कापडांना खूप जुनी परंपरा आहे. इतिहासात याचे संदर्भ सापडतात. त्यामुळे उत्तम कापडांच्या यादीमध्ये या कापडांचा समावेश होतोच. पण याच कॉटनच्या निर्मितीमध्ये पाण्याचा होणारा अतिजास्त अपव्यय किंवा रासायनिक खतांचा बेसुमार वापर, सिल्कच्या निर्मितीमध्ये रेशीम किडय़ांची अनैसर्गिक पद्धतीने केली जाणारी पैदास असे कितीतरी मुद्दे दुर्लक्षित केले जातात. अर्थात गेल्या काही वर्षांंमध्ये या मुद्दय़ांकडे सगळ्याचं नव्याने लक्ष जाऊ  लागलं आहे. विशेषत: फॅशन उद्योगाचं पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम, फास्ट फॅशन आणि कपडय़ांच्या कचऱ्यांचा वाढता खच अशा विविध मुद्दय़ांकडे लोकांच लक्ष वेधलं जाऊ  लागलं आहे. त्यातून सस्टनेबल फॅशनची संकल्पना जोर धरू लागली. डिझायनर्स कलेक्शन्स बनविताना पर्यावरणाचा आवर्जून विचार करू लागले होते. त्यामध्ये नैसर्गिक कापडांचा वापर, जुन्या कापडांचा पुनर्वापर, पर्यायी स्त्रोतांचा वापर असे अनेक उपाय वापरले गेले. याच चळवळीचे एक पाऊल म्हणून पारंपरिक कापडांच्या प्रकाराला वेगवेगळे पर्याय शोधण्यास सुरवात झाली. त्यातूनचं या नव्या युगातील कापडांचा उदय होऊ  लागला आहे.

Advertisement

शूज, बॅग्सच्या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या चामडय़ाच्या कापडाची निर्मिती ही प्राण्यांवर अवलंबून असते. गायीपासून ते मगरीपर्यंत विविध प्राण्यांच्या चामडय़ाचा वापर कित्येक वस्तू बनविण्यासाठी सहजतेने होतो, ही बाब कोणासाठी नवीन नाही. पण कित्येक वर्षे प्राणीप्रेमी निव्वळ चैनीच्या वस्तूंच्या शौकसाठी या प्राण्यांच्या होणाऱ्या कत्तलीचा विरोध करत आहेत. साहजिकच चामडय़ाला पर्यावरणस्नेही पर्याय शोधायचा प्रयत्न विविध स्तरातून केला जात आहे. ‘अनानास अनाम’ या कंपनी अंतर्गत ‘पिनानेक्स’ नावाच्या कापडाची निर्मिती केली जाते. चामडय़ाच्या कापडाला पर्यायी ठरू शकणारं हे कापड अननसाच्या शिल्लक पानांपासून बनविलं जातं. त्यासाठी सेन्द्रीय पद्धतीने अननसाची शेती करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल जातं. शूज, बॅग, बेल्ट्स, दागिने अशा चामडय़ापासून बनणाऱ्या विविध वस्तू बनविण्यासाठी या कापडाचा उपयोग सहजतेने करता येतो. ‘बोल्ट थ्रेड’ या कंपनीनेसुद्धा मशरूम या वनस्पतीचा वापर चामडय़ासमान कापड बनविण्यासाठी केला आहे. मशरूमच्या मुळांचा वापर या संशोधनामध्ये केला जातो. या कंपनीने डिझायनर स्टेला मर्डीसोबत हातमिळवणी करत हँडबॅग्सचं कलेक्शन काढलं होतं. या कलेक्शनचं प्रदर्शन लंडनमधील प्रसिद्ध ‘विक्टोरिया अँड अल्बर्ट’ संग्रहालयात आयोजित केलं होतं.

कमळाच्या देठापासून बनविलेले धागे, सिल्क आणि नैसर्गिक रंग वापरून बनविलेलं ‘सामातावो’ कापड हे आधुनिक कापड निर्मिती क्षेत्रातील उत्तम दर्जातील नैसर्गिक कापड समजलं जातं. हे कापड विणण्यासाठी कंबोनियातील पारंपारिक विणकाम पद्धतीचा वापर होतो. उंची कपडय़ांमध्ये सिल्कला पर्याय म्हणून या कापडाचा वापर होतो. केळ्याच्या सालीपासून धागा निर्मिती करून त्यापासून उच्च दर्जाचे सिल्क कापड बनविले जाते. जपानमध्ये या कापडाची निर्मिती १३ व्या शतकापासून होत आहे. या ‘बनाना सिल्क’पासून बनविलेल्या साडय़ांना भारतीय बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे. याच पद्धतीने संत्र्याच्या सालीचा वापरही रेशमी कापड निर्मितीमध्ये करण्याचे प्रयोग सध्या सुरू आहे. संत्र्याचा नैसर्गिक नारंगी रंग, त्याचा सुवास आणि हलकेपणा या कापडामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतो. त्यामुळे उंची कपडय़ांच्या निर्मितीमध्ये या कापडाला मागणी आहे. तसेच अन्नपदार्थापासून बनविल्या जाणाऱ्या या कापडांचे शरीराला काही फायदे असू शकतात का याबद्दलसुद्धा सध्या संशोधन सुरु आहे. जगभरात प्लॅस्टिकच्या प्रदूषणाची चिंता सगळ्यांनाच भेडसावते आहे. पण प्लॅस्टिकचा विविध क्षेत्रातील वापर हा मुद्दा नाकारता येत नाही. अशावेळी बटाटय़ाच्या वाया जाणाऱ्या साली आणि इतर भागांपासून ‘पाब्र्लेक्स प्लॅस्टिक’ बनविले जात आहे. अर्थात या प्लॅस्टिकची उत्पादन क्षमता, किंमत लक्षात घेता जगभरातील संपूर्ण प्लॅस्टिक वापराला पर्याय म्हणून याचा वापर सध्या शक्य नसला तरी चष्म्याची फ्रेम, केसाच्या अ‍ॅक्सेसरीज, दागिने अशा उंची उत्पादनांमध्ये यांचा वापर होऊ  लागला आहे. ऑस्ट्रेलियन कंपनी ‘नानोलॉस’ने नारळाच्या उरलेल्या भागापासून ‘नुर्लाबोर’ नामक कापडाची निर्मिती केली आहे. हे कापड कॉटन आणि रेयॉन या कापडांना पर्याय म्हणून वापरता येतं. सध्या याच कंपनीच्या मार्फत या कापडापासून निर्मित कलेक्शन काढली जातात. कॉफी बनवून झाल्यावर कॉफी बीनचा चोथा फेकला जातो. तैवानमधील एका कंपनीने याच चोथ्यापासून कापडनिर्मिती केली असून हे कापड स्पोर्ट्सवेअर म्हणून सहज वापरता येत. तसंच घरगुती वापरासाठीही या कापडाचा उपयोग होतो. याशिवाय समुद्रात मिळणारे शिंपले, मासेमारी करायला वापरल्या जाणाऱ्या नायलॉनच्या जाळ्या यांपासून नव्याने कापडाची निर्मिती केली जात आहे. हे कापडसुद्धा स्पोर्ट्सवेअरमध्ये सहज वापरता येतं.

Advertisement

‘हेम्प’ या पिकाची शेती कॉटनप्रमाणेच कापड निर्मितीसाठी केली जाते. या कापडाचा वापरही कॉटनला पर्याय म्हणून होतो. अर्थात हेम्पच्या शेतीसाठी कापसाच्या शेतीच्या तुलनेने कमी पाणी लागते आणि खतांचीही फारशी आवश्यकता नसते. उलट हेम्पच्या कापणीनंतर या पिकामुळे जमिनीचा कस वाढतो. या पिकाच्या शेतीमुळे जमिनीतील पोषण मूल्ये वाढतात आणि जमिनीची धूप कमी होते. त्यामुळे सध्या जगभरात हेम्पची मागणी वाढत आहे. ‘आदिदास’सारख्या मोठय़ा ब्रँडच्या कलेक्शनमध्ये हेम्पचा वापर होतो. अर्थात या पिकाचा वापर अमली पदार्थ निर्मितीमध्येसुद्धा होतो. त्यामुळे या पिकाच्या उत्पादनावर काही प्रमाणामध्ये बंधने आहेत. तरीही यापासून बनणाऱ्या कापडाला मागणी भरपूर आहे. हेम्पप्रमाणे ‘नेटल्स’ या पिकाचं उत्पन्नसुद्धा कापडनिर्मितीसाठी होतं. हे कापडसुद्धा कॉटनप्रमाणे सुटसुटीत असतं. त्यामुळे रोजच्या वापरातील कपडे बनविण्यासाठी या कापडाचा वापर प्रामुख्याने होतो. नेटल्सच्या निर्मितीतसुद्धा पाण्याचा अपव्यय टाळला जातो आणि या पिकाचे दुष्परिणामसुद्धा नाहीत. त्यामुळे सध्या या पिकाला नगदी पिकाचा दर्जा मिळाला आहे. याशिवाय विविध झाडांच्या बुंध्याचा वापरसुद्धा कापडनिर्मितीसाठी केला जातोय.     या पद्धतीचे कित्येक प्रयोग जगभरात वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहेत. या प्रयोगातून पारंपारिक कापड निर्मितीमध्ये येणारे दुष्परिणाम टाळण्याचा प्रयात्न होत आहे. अर्थात या कापडांच्या निर्मितीचा वेग हा पारंपरिक कापडांपेक्षा कमी आहे. तसेच त्यांच्या उत्पादन क्षमतेचा आणि किंमतीचा मेळ बसणे गरजेचे आहे. त्यामुळे सध्या तरी मोठे ब्रँड, उंची कलेक्शन्समध्ये या कापडांचा वापर होतोय. पण येत्या भविष्यात हे कापडांचे प्रकार सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. न जाणो, काही वर्षांनी आपण कॅफेतून कॉफीचा आस्वाद घेऊन बाहेर पडेपर्यंत मागच्या दारातून कॉफीचा चोथ्याने कॅफे ते फॅक्टरी ते जिमचे कपडे हा प्रवास पूर्ण केलेला असेल.

The post पॅशन फॅशन : नव्या कापडांची नांदी appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement