पुस्तक परीक्षण : सामाजिक बदल ते वैयक्तिक शोधाचा प्रवास



सीमा भानू
आजच्या मराठी लेखकांमध्ये विश्राम गुप्ते हे नाव आवर्जून घ्यावे लागेल. समाज आणि समाजातील माणूस हे त्यांच्या लेखनाचे विषय. ‘ईश्वर डॉट कॉम’ या कादंबरीने त्यांचे वेगळेपण अधोरेखित केले. त्यांची ‘चेटूक’,‘ऊन’आणि ‘ढग’ ही कादंबरी-त्रयी आता रोहन प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहे.

Advertisement

या कादंबरी मालिकेत स्वातंत्र्याच्या उंबरठय़ावर असताना आणि त्यानंतरचा असा सुमारे ६०-६५ वर्षांचा पट उलगडला गेला आहे. ही कहाणी आहे दिघे कुटुंबाच्या तीन पिढय़ांची. पण याच काळात आजूबाजूला जे राजकीय, सामाजिक, आर्थिक बदल घडत गेले त्यातून जगण्याची सगळी परिमाणेच बदलली. या कादंबऱ्या या वास्तव वर्तमानालाही स्पर्श करत पुढे सरकतात. त्यामुळे ही  फक्त एका कुटुंबाची कथा राहत नाही, तर ती बदलत्या समाजाचीही गोष्ट ठरते.

अमृतराव दिघे आणि त्यांची पत्नी नागूताई हे पहिल्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे. नागपूरला राहणाऱ्या अमृतरावांनी आपला बरा चाललेला शिलाई व्यवसाय सोडून स्वातंत्र्य आंदोलनात उडी घेतली. त्यापायी त्यांना तुरुंगवासही होतो. डोक्यावर मालकीचे छप्पर असले तरी शिकणाऱ्या पाच मुलांचे काय करायचे, हा प्रश्न नागूताईंपुढे उभा राहतो. पण ही हिकमती बाई त्यातूनही मार्ग काढते. मोठय़ा मुलाचे- यशवंताचे शिक्षण थांबवून त्याला नोकरी करायला लावते आणि घर चालवते. यथावकाश अमृतराव सुटून येतात. त्यांचा मानही वाढतो. पण कमावता आधारस्तंभ आणि घरचा कर्ता मोठा मुलगा यशवंतच राहतो. पहिल्या दोन कादंबऱ्यांपुरता या कथेचा नायक आहे त्यांचा तिसरा मुलगा वसंता. एक देखणेपणा सोडला तर तो तसा सर्वसामान्यच आहे. पण राणीसारखी अत्यंत सुंदर, तल्लख, धीट, स्वतंत्र वृत्तीची मुलगी त्याच्या प्रेमात पडते आणि त्याचेच नव्हे तर सगळ्या कुटुंबाचेच दिवस पालटतात.

Advertisement

आपले सुखासीन आयुष्य सोडून, शिक्षणावर पाणी सोडून, आई-वडिलांची नाराजी पत्करून  राणी वसंताच्या एकत्र कुटुंबात येते खरी; पण काही दिवसांतच तिचा भ्रमनिरास होतो. पत्रांतून तिला मोहवणारा वसंता तिला भेटतच नाही. तिच्या अपेक्षा वेगळ्या आहेत- ज्या वसंताच्या आकलनापलीकडच्या आहेत. राणी अशारीर प्रीतीच्या शोधात आहे. आपली भावुकता वसंताला कळेल ही तिची अपेक्षा फोल ठरते. दोघे वेगळे होतात. त्यांची मुले आजोळीच राहतात. पुढे दोघेही दुसरे जोडीदार शोधतात. वसंता रूढ अर्थाने सुखीही होतो. पण राणी हे वेगळेच रसायन आहे. तिला सतत कशाचा तरी ध्यास आहे. त्यामुळे दुसरे नातेही तिला अपूर्ण वाटते यात काही आश्चर्य नाही.

‘चेटूक’ आणि ‘ऊन’ या दोन कादंबऱ्या वसंता-राणीचा प्रवास मांडतात. ‘ढग’ मात्र विकासची आहे.. त्यांच्या दुसऱ्या मुलाची! आई-वडिलांचा सहवास मोठय़ा मुलाला- प्रकाशलाही मिळालेला नाही. पण हे नाते तुटल्याचा खरा परिणाम होतो तो विकासवर. तो आईवेडा आहे. पण त्याची खरी आई त्याच्यापासून शरीराने आणि मनानेही दूर आहे. वडिलांची दुसरी पत्नी त्याला हवी असलेली माया कधीच देऊ शकलेली नाही. या वातावरणात विकास अस्थिर, आपल्याला नेमके काय हवे आहे हे न समजणारा, मुळात ‘मी कोण आहे’ हा प्रश्न पडलेला असा मुलगा आहे. त्याची पत्नी-मुलांसह कुटुंबही त्याला दिलासा देऊ शकत नाही.

Advertisement

कादंबरीची ही त्रयी तीन स्तरांवर मांडण्यात आली आहे. ‘चेटूक’मध्ये खूप सामाजिक संदर्भ आहेत. पन्नासच्या दशकातील नागपूरचे चित्र त्यात आहे. हळूहळू  बदलत जाणाऱ्या परिस्थितीचा आयुष्यावर अपरिहार्यपणे होणारा परिणाम आहे. एकत्र कुटुंबातील राग-लोभ आहेत. ताणेबाणे आहेत. अनेक पात्रे, त्यातील बहुतेकांची सुस्पष्ट  व्यक्तिचित्रे यामुळे अगदी बारीकसारीक तपशील असले तरी ‘चेटूक’ कंटाळवाणी होत नाही. उलट, पुढील भागात काय असेल याची उत्सुकता लागून राहते. ‘ऊन’मध्ये वसंता आणि राणी यांची समांतर आयुष्ये येतात. या दोघांनाही आपले जोडीदार सापडले असले तरी एकत्र येणे फारसे सोपे नाही. या पूर्ण कादंबरीत राणी व्यक्त होते ती तिच्या डायरीतून. राणी ही व्यक्तिरेखा फटकळ, बहिर्मुख असली तरी ती सतत आपल्या मनाचे ऐकणारी आहे. पहिल्या प्रेमातील अपेक्षाभंगाने ती थोडी विचारी, अंतर्मुखही झाली आहे. ही बदललेली राणी डायरीतून व्यक्त होत असल्याने अधिक सुस्पष्ट होऊन समोर येते. दिघ्यांचे एकत्र कुटुंब वेगळे झाले असले तरी त्यांच्यातील कौटुंबिक मूल्यांचे उबदार ‘ऊन’ अजूनही टिकून आहे, हे या भागात अधिक ठाशीवपणे समोर येते.

‘ढग’ हा मात्र वैयक्तिक शोधाचा प्रवास आहे. ‘मी कोण आहे?’ ‘मला काय हवे आहे?’ असे मूलभूत प्रश्न नायक विकासला पडले आहेत. स्वत:च्या शोधाचा हा प्रवास आहे. ‘चेटूक’पेक्षा ‘ऊन’ची मांडणी वेगळी आहे. पण ‘ढग’या भागाची शैली तर या दोन्हींपेक्षा अगदीच निराळी आहे. हा भाग वाचकाला अधिक अस्वस्थ आणि अंतर्मुख करून जातो. ही कादंबरी-त्रयी नक्कीच वाचनीय आहे.

Advertisement

‘चेटूक’,‘ऊन’ आणि ‘ढग’- विश्राम गुप्ते,

रोहन प्रकाशन, पाने (अनुक्रमे)- ३३४, २२८, २८६, किंमत- (अनुक्रमे)- ३५० रुपये,

Advertisement

३०० रुपये, ३५०रुपये ६

The post पुस्तक परीक्षण : सामाजिक बदल ते वैयक्तिक शोधाचा प्रवास appeared first on Loksatta.

Advertisement



Source link

Advertisement