पुणे3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
पुण्यात मध्यरात्रीपर्यंत सुरू असणाऱ्या चायनीज खाद्यपदार्थांची गाडी पोलिसांनी बंद केल्यानंतर जेवण न मिळाल्याने एकाने चाकुने पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. हल्ल्यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. लोहगाव परिसरात पहाटे ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे.
पोलीस नाईक सचिन उत्तम जगदाळे (वय ३८) असे गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी महानंदेश्वर उर्फ मल्या महादेव बताले (वय २४, रा. नळदुर्ग, जि. उस्मानाबाद) याला अटक करण्यात आली आहे. खुनाचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक सचिन जगदाळे रात्रगस्तीवर होते.
लोहगाव परिसरातील धानोरी नाका येथील समायरा चायनिज सेंटर मध्यरात्री अडीच वाजता सुरू होते. पोलीस कर्मचारी सचिन आणि सहकाऱ्यांनी चायनीज सेंटर बंद केले. त्या वेळी महानंदेश्वर तेथे जेवण करण्यासाठी आला होता. सेंटर बंद केल्याने त्याला जेवण मिळाले नाही. त्यामुळे चिडलेल्या महानंदेश्वर याने चायनीज सेंटरमधील चाकू घेऊन सचिन यांच्यावर हल्ला केला. सचिन यांच्या गालावर चाकुने वार केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. महानंदेश्वर याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरूणी ठार
भरधाव मिक्सर ट्रकचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूणी जागीच ठार झाली. हा अपघात १४ जानेवारीला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास खडकीतील चर्च चौकात घडला. याप्रकरणी मुलीच्या मित्राने खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मधुरा शैलेश मिश्रा (वय २१, रा. निगडी ) असे ठार झालेल्या तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी मिक्सर ट्रकचालक रवी देवानंद नाडे (रा. वाघोली ) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदार तांबे (वय २० रा. निगडी ) याने फिर्याद दिली आहे.मंदार आणि मधुरा कामानिमित्त पुण्यात आले होते. त्यानंतर ते दुचाकीवर प्रवास करीत पुन्हा निगडीला चालले होते. त्यावेळी खडकीतील चर्च चौकात भरधाव मिक्सर ट्रकचालकाने मधुराच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दोघेही खाली पडल्यानंतर ट्रकचे चाक मधुराच्या अंगावरून गेले. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या मधुराचा जागीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे तपास करीत आहेत.