पालकच म्हणतायत.. पडद्यावरची शाळा आता पुरेटीम लोकप्रभा : रसिका मुळ्ये, बिपिन देशपांडे, अनिकेत साठे, चारुशीला कुलकर्णी, देवेश गोंडाणे – response.lokprabha@expressindia.com
हजारो मुलांनी दिवसभर किलबिलणाऱ्या जिवंत शाळा गेलं दीड वर्ष संगणकाच्या पडद्यात कशाबशा अवघडून बसल्या आहेत. वर्गपाठ-गृहपाठ, परीक्षा, स्पर्धा, प्रकल्प सारं काही नेहमीप्रमाणे सुरू आहे. फक्त त्या संगणकाएवढंच यंत्रवत! एकाच बाकावर बसणारी, मित्रांचा डबा फस्त करणारी, जरा संधी मिळताच धुडगूस घालणारी मुलं आजही एकमेकांच्या बाजूला बसलेली दिसतात. फक्त पडद्यावरच्या खिडक्यांमध्ये! ना स्पर्श, ना संवाद! नेहमी ओझं ओझं म्हणून ज्याला हिणवलं जायचं ते दप्तर आता धुळीत पडलं आहे. अर्थात त्या जादूई पोतडीतला पुस्तकांपलीकडचा खजिनाही रिता झाला आहे. शाळा कर्तव्यात चोख! भलं मोठं पटांगणही त्यांनी त्या एवढय़ाशा पडद्यात बसवलं आहे. ऑनलाइन कवायती वगैरे होतात. पण मैदानातली माती मुलांना किती दिवसांत दिसलेलीच नाही. परीक्षांचं तर काय विचारता? मुलं अचानक एवढी हुशार झाली आहेत, की कागदावर काही तास चालणारा पेपर पडद्यावर अवघ्या १०-१५ मिनिटांत सोडवून मोकळी होतात आणि वर भरघोस गुणही मिळवतात. सारं काही सुरळीत सुरू आहे. पण आता या पडद्यात अवघडून बसलेल्या शाळेला पडद्यासमोर बसून बसून अवघडलेली मुलं कंटाळली आहेत. त्यांना आभासी नव्हे, तर खऱ्याखुऱ्या शाळेत जायचं आहे. शिक्षकांनाही कसाबसा नव्हे तर कसून अभ्यास करवून घ्यायचा आहे. विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर अशा आभासी जगात वाढणारी आपली मुलं उद्या जेव्हा पुन्हा वास्तव जगात जातील तेव्हा ती तिथे सक्षमपणे, आत्मविश्वासाने वावरू शकतील का, हा प्रश्न पालकांना भेडसावत आहे. साथ कधी ना कधी सरेल, पण मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि बौद्धिक वाढीतल्या या गाळलेल्या जागा कशा भरून निघणार अशी चिंता त्यांना वाटू लागली आहे. पडद्यावरची शाळा आता सर्वानाच पुरे झाली आहे. पण सरकार मात्र अद्याप शाळा सुरू करायच्या की बंदच ठेवायच्या याविषयी निर्णय घेऊ शकलेलं नाही..

Advertisement

याविषयी राज्याच्या विविध भागांतल्या पालकांना काय वाटतं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकप्रभा’ने केला असता, बहुसंख्य पालकांनी आता शाळा उघडल्या पाहिजेत, असं मत व्यक्त केलं. कारण शाळा म्हणजे केवळ अभ्यास नव्हे. ते समाजाचं एक छोटं रूपच असतं. हा छोटा समाज मुलांना मोठय़ा समाजात वावरण्यासाठी सज्ज करत असतो. ऑनलाइन शाळा ही जबाबदारी पेलण्यासाठी सक्षम नाहीत. मुलं दीर्घ काळ घरी राहून शिक्षण घेत आहेत, असंच सुरू राहिलं, तर प्रत्यक्षात शाळेत जाण्याची वेळ येईल, तेव्हा मुलांना ते अवघड वाटू शकतं, शिस्तीच्या चौकटीत स्वत:ला पुन्हा बसवताना त्यांची दमछाक होऊ शकते, अशी भीती पालकांना आहे. ऑनलाइन माध्यमात अगदीच वरवरचा अभ्यास झाला आहे, याविषयी शंकाच नाही. एखाद्या विद्यार्थ्यांला संकल्पना समजली आहे की नाही, हे जाणून घेण्याचा कोणताच मार्ग शिक्षकांकडे नाही. ज्यांचे पालक अभ्यास घेऊ शकत नाहीत, त्यांना शिकवणीला पाठवू शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शिवाय प्रदीर्घ काळ संगणकाचा वापर केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दृष्टिदोष, पाठदुखी, मानदुखीसारखे विकार जडले आहेत. खेळ, मित्रांपासून दुरावलेली मुलं चिडचिडी, एकलकोंडी झाली आहेत. ऑनलाइन गेम्स, समाजमाध्यमांचा अतिवापर त्यांना व्यसनाधीनतेकडे घेऊन चालला आहे. त्यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.

आता राज्यातल्या कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. हळूहळू सर्व व्यवहार सुरू होऊ लागले आहेत. गेल्या दीड वर्षांतला अनुभव पाहता लहान मुलांना कोविड संसर्ग होण्याचं प्रमाण मोठय़ांच्या तुलनेत कमी आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोविडचा फटका बसलेल्या अनेक देशांत योग्य काळजी घेऊन शाळा कधीच सुरू करण्यात आल्या आहेत. या परिस्थितीचा विचार करता राज्यातल्या शाळा उघडणे आवश्यक आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी. त्याचप्रमाणे सरकार जे नियम निश्चित करेल त्यांची काटेकोर अंमलबजावणी शाळांनीही करायला हवी. मुलांना पुन्हा एकदा खऱ्याखुऱ्या शाळेत जाण्याची संधी लवकरात लवकर मिळवून देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. पालकांशी संवाद साधला असता, हाच सूर उमटला..

Advertisement

सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न

मुले शाळेपासून दूर जाऊ नयेत यासाठी शिक्षण विभागही प्रयत्नशील आहे. मुलांकडे पुरेशी साधने नाहीत, ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या अडचणींची कल्पना आहे. काही भागांत यापूर्वी शाळा काही प्रमाणात सुरूही झाल्या. शाळा सुरू झाल्या तरीही उपस्थितीची सक्ती असणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले होते. मात्र मुलांचे आरोग्य आणि धोका लक्षात घेऊन टास्क फोर्सने शाळा सुरू न करण्याचा सल्ला दिला आहे. शिक्षण विभागाने शाळांसाठी मार्गदर्शक सूचना (एसओपी) तयार केल्या आहेत. टास्क फोर्सबरोबर येत्या दोन-तीन दिवसांत बैठक घेऊन शिक्षण विभागाकडून करण्यात येणारे प्रयत्न मांडण्यात येतील आणि त्याबाबत टास्क फोर्समधील तज्ज्ञांचे म्हणणेही समजून घेतले जाईल. दोन्हीचा सुवर्णमध्य साधून सद्य:स्थितीवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
– वर्षां गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

शाळा बंद ठेवण्याचे परिणाम गंभीरच!

करोनाकाळात मुलांना शाळेत पाठवण्यामुळे काय परिणाम होतील याविषयी सार्वत्रिक साशंकता असताना शाळा बंद असल्यामुळे मुलांवर झालेल्या आणि सामाजिक परिणामांचाही विचार होणे आवश्यक आहे. सध्या मुलांवर झालेले परिणाम पाहता शाळा तातडीने सुरू करणे गरजेचे आहे. शाळा बंद असल्यामुळे मुलांचे शारीरिक, मानसिक आरोग्य, जडणघडण यांवर गंभीर परिणाम होत असल्याचे दिसते. ऑनलाइन शिक्षणातून काही प्रमाणात अभ्यासक्रम किंवा पुस्तकी शिक्षण पुढे जाऊ शकते. मात्र ऑनलाइन शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होऊ शकत नाही. मुलांनी वर्गात, सर्वासमवेत एखादी गोष्ट शिकणे आणि ऑनलाइन तासिकेदरम्यान शिकणे यातही बराच फरक आहे. शिक्षक आणि मुलांचा संवाद हादेखील शिक्षणाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे. मात्र शाळा प्रत्यक्ष भरत नसल्यामुळे हा संवाद खुंटला आहे. मुलांच्या सवयींमध्येही बदल झाला आहे. शाळेमुळे अंगी बाणणारी शिस्त, शिक्षकांचा आदरयुक्त धाक याचा ऑनलाइन वर्गामध्ये अभाव आहे. अजून काही काळ शाळा बंद राहिल्या तर मुलांची शिक्षणाची सवय सुटेल अशी भीती वाटते. शाळा बंद राहिल्यामुळे निर्माण होणारे अनेक सामाजिक प्रश्न दिसतात. शहरांमध्ये वस्त्यांमध्ये, ग्रामीण भागांमध्ये मुले शिक्षणापासून दुरावली आहेत. आर्थिक स्थैर्य नसलेल्या कुटुंबांमध्ये, रोजंदारी करणाऱ्या पालकांच्या मुलांना काम करावे लागत आहे. मुलांचा

Advertisement

कमावण्यासाठी उपयोग करण्याची सवय कुटुंबाला लागू शकते. मुलांच्या हाती पैसे आल्यानंतर त्यांचे प्राधान्य शिकण्यापेक्षा कमावण्याला असते. त्यामुळे ही मुले शिक्षणाच्या प्रवाहातून कायमची बाहेर पाडण्याचा धोका आहे. बालविवाहांचे प्रमाणही वाढले आहे. शाळा अधिक काळ बंद राहिल्यास सध्या उभे असलेले प्रश्न  अधिक जटिल होतील. शाळा बंद ठेवण्याच्या दूरगामी परिणामांचा विचार होणे आवश्यक आहे.
– मनीषा आणि सुनील चौधरी, मुंबई

मोठे नुकसान टाळण्यासाठी…

पर्यटन सुरू झाले आहे, कार्यालये, हॉटेल, बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. जवळपास सर्वच व्यवहार सुरू आहेत. केवळ शाळेतील शिक्षण थांबलेले आहे. शाळा प्रदीर्घ काळ बंद राहिल्याचा मुलांच्या बौद्धिक विकासावर परिणाम होत आहे. शाळेत केवळ पुस्तकी शिक्षणाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जीवनमूल्ये रुजवली जातात. त्यांच्यावर संस्कार केले जातात. ज्या वयात त्यांची आकलन क्षमता वाढत जाते, त्याच वयात मुले घरात बंदिस्त झाली आहेत. याचा त्यांच्या मन-बुद्धीवरही परिणाम होताना दिसतो. शाळेमुळे त्यांचे एक वेळापत्रक निश्चित झालेले असते. शिक्षकांचा वचक असतो. पण आता त्यांची दिनचर्या पूर्णपणे बिघडलेली आहे. सकाळी उशिरा उठणे, रात्री उशिरा झोपणे, हातात सतत मोबाइल फोन यामुळे शारीरिक वाढ खुंटली आहे आणि डोळ्यांच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शाळा सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. लसीकरण, मुखपट्टी, शारीरिक अंतर राखण्यासह शाळेतील वेळांमध्ये टप्पे पाडून नियोजन केले तर शैक्षणिक सत्र सुरू करून भविष्यातील मोठे नुकसान टाळता येईल.
– आफरिन आणि सय्यद रियाझ अहमद, औरंगाबाद

Advertisement

शाळा सुरू व्हाव्यात, पण काळजी घेऊन

सध्या शाळा बंद असल्यामुळे मुलांचे नक्कीच खूप नुकसान होत आहे. ऑनलाइन शिक्षण हे मुलांसाठी पुरेसे ठरणारे नाही. लहान मुलांसाठी तर ३०-४० मिनिटे स्क्रीनसमोर बसणेही कठीण आहे. मुलांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होण्याचीच शक्यता अधिक आहे. प्रत्यक्ष शाळेतील शिक्षण, जडणघडण ऑनलाइन वर्गातून भरून निघू शकत नाही. ऑनलाइन वर्गाचाही मुलांवर ताण येत आहे. त्यामुळे शाळा लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक आहे. ही सगळी परिस्थिती असताना करोना प्रादुर्भावाचा धोकाही दुर्लक्ष करता येणारा नाही. विषाणूच्या उत्परिवर्तित स्वरूपाच्या धोका, प्रसाराचा वेग यांबाबत अद्यापही पूर्णपणे अंदाज आल्याचे दिसत नाही. अशा वेळी शाळा सुरू करताना आवश्यक ती सर्व काळजी घेणे गरजेचे आहे. शाळेची स्वच्छता, पुरेशा सुविधा असणे, शिक्षकांचे लसीकरण याबाबत सजगता हवी. पालकांमध्येही जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच मुलांचे लसीकरण सुरू व्हावे यासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढायला हवा.
– चंदा आणि आनंद भंडारे, मुंबई

माध्यमिक वर्ग सुरू करावेत

रुग्णसंख्या आता घटली आहे. डेल्टा प्लसमुळे काही नवे आव्हान उभे ठाकले नाही, तर शाळा सुरू करणे आवश्यक आहे. गेले सुमारे दीड वर्ष शाळा बंद आहेत. याचा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर दुष्परिणाम होत आहे. ऑनलाइन शाळेची तुलना प्रत्यक्ष शाळेतल्या शिक्षणाशी होऊच शकत नाही. ऑनलाइन माध्यमातही शिक्षक मदत करतात, विद्यार्थ्यांना शंका असल्यास निरसनही करतात, मात्र तरीही या माध्यमाला अनेक मर्यादा आहेत. आमच्या शाळेत शारीरिक शिक्षणाचे शिक्षक ऑनलाइन प्रशिक्षण देतात. कवायती करवून घेतात, दोरीउडय़ा मारायला सांगतात. मात्र प्रत्यक्ष मैदानावर जाऊन खुल्या हवेत, सर्वाबरोबर व्यायाम करणे किंवा खेळणे यातला आनंद घराच्या चार भिंतींत मिळणे शक्यच नाही. मैदानी खेळ, विज्ञानाचे प्रयोग, शाळेत राबवले जाणारे अनेक उपक्रम यांना विद्यार्थी मुकले आहेत. त्यामुळे शक्य तेवढय़ा लवकर शाळा सुरू झाल्या पाहिजेत. शाळा सुरू करताना पूर्ण काळजी घेण्यात यावी आणि नियमांचे पालन करण्यात यावे. शिपाई काकांपासून मुख्याध्यापकांपर्यंत सर्वाचे पूर्ण लसीकरण झालेले असणे गरजेचे आहे. एका बाकावर एक विद्यार्थी असल्यास उत्तमच. आता बागा वगैरे उघडल्या आहेतच. त्यामुळे अनेक पालक मुलांना तिथे घेऊन जातील. तिथेही मुले एकत्र येणार आणि खेळणार आहेतच, तर शाळा सुरू करायला काय हरकत आहे? प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक वर्ग सध्या सुरू करणे योग्य नाही, कारण अंतर पाळणे, स्वच्छतेची व्यवधाने बाळगणे हे या वयातल्या विद्यार्थ्यांना शक्य नाही. पण माध्यमिक वर्ग सुरू करण्यास हरकत नाही. दरवर्षी जूनमध्ये शाळा सुरू होण्याचा प्रचंड उत्साह असतो, घाईगडबड असते. यंदा त्यातले काहीच घडले नाही. मुलांना त्याचा थोडासा अनुभव घेता यावा म्हणून आमच्या शाळेने व्हिडीओद्वारे विद्यार्थ्यांना शाळा दाखवली, त्यांचा नवा वर्ग दाखवला. अशा रीतीने शाळा आणि शिक्षक मुलांना प्रत्यक्ष शाळेची अनुभूती देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मात्र तरीही शाळा सुरू करणे गरजेचे आहे.
– श्रुती आणि जयदीप जोगदेव, पुणे

Advertisement

भावनांकात घसरण

करोनामुळे गेले दीड वर्ष मुले घरात अडकून पडली आहेत. या काळात मुलांनी नेमके काय केले, याचे उत्तर सापडणे मुश्कील आहे. मुलांवर याचे विपरीत परिणाम झाले आहेत. सतत घरीच राहिल्याने त्यांच्या शारीरिक  आणि मानसिक वाढीत अडथळे येत आहेत. अभ्यासाच्या नावाखाली लॅपटॉप आणि मोबाइलच्या पडद्याचा अति वापर होत आहे. त्यामुळे लहान वयात डोळ्यांच्या समस्या उद्भवल्या आहेत. शाळा ऑनलाइन असल्यामुळे मुलांमध्ये अबोला वाढला आहे. छोटय़ा-छोटय़ा गोष्टींवरून त्यांची चिडचिड होते. त्यांचे वेगळेच विश्व तयार झाले आहे. अभ्यासाचे नुकसान हा भाग नंतरचा, पण मुले चारचौघांमध्ये मिसळणे विसरली आहेत. मैदानी खेळ विसरली आहेत. तंत्रस्नेही होण्याच्या नादात मुले समाजमाध्यमांच्या गर्दीत हरवत चालली आहेत. ऑनलाइन चॅटिंग करण्यात, कार्टुन्स बघण्यात जास्त वेळ घालवत आहेत. त्यांच्या भावनांकात कमालीची घसरण झाली आहे. संकल्पना समजत नसल्यामुळे अभ्यास मागे पडत आहे. शाळेने दिलेला ‘शेअरिंग अ‍ॅण्ड के अरिंग’ हा मंत्र मुले विसरत चालली आहेत. यामुळे शाळा सुरू होणे आवश्यक आहे. शिक्षण विभागाने काही जबाबदारी स्वीकारावी. पालक म्हणून आम्ही जबाबदारी स्वीकारायला तयार आहोत. मुलांना घरात थांबवून ऑनलाइन शिक्षण हा योग्य पर्याय नाही. मुलांच्या सर्वागीण विकासासाठी शाळा सुरू व्हायला हव्यात.
– सुजाता आणि अविनाश कोपरकर, नाशिक

निम्म्या उपस्थितीचा पर्याय योग्य

ऑनलाइन शिक्षणात मुलांची समाधान पातळी अतिशय कमी आहे. आमच्यासारख्या नोकरदार पालकांना मुलांच्या अभ्यासाकडे लक्षही देता येत नाही. त्यामुळे प्रत्यक्षात शाळा एक दिवसाआड का होईना, सुरू व्हायला हवी. गेल्या दीड वर्षांत मुलांना प्रत्यक्ष वर्गातील शिक्षण आणि ऑनलाइन शिक्षण यातील फरक प्रकर्षांने लक्षात आला. शाळेत सहकार्य, समन्वय, परस्परांना मदत आदी भावना वाढीस लागतात. विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा घडते. ऑनलाइन व्यवस्थेत हे सर्व थांबलेले आहे. आरोग्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती दक्षता घेऊन शाळांबाबत विचार करायला हवा. मुलांसाठी करोना प्रतिबंधक लस उपलब्ध होत आहे. ज्या वयोगटासाठी ती आहे, त्यांना जलद लसीकरणाद्वारे सुरक्षाकवच देता येईल. वर्गात निम्म्या क्षमतेने उपस्थिती ठेवून सुरक्षित अंतराच्या पथ्याचे पालन करता येईल. शाळा, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्यास प्राधान्य द्यावे. जेणेकरून पालकांनाही पाल्याच्या सुरक्षेची हमी मिळेल. माध्यमिक गटात वेगवेगळ्या इयत्तांचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे नियोजन करता येईल.
– डॉ. वर्षां आणि साहेबराव हेम्बाडे, नाशिक

Advertisement

व्यक्तिमत्त्व विकासात अडथळे

शाळेत केवळ शिक्षणच दिले जात नाही, तर मुलांना आपल्याच वयाच्या मुलांबरोबर मैदानी खेळ खेळण्याची संधी मिळते. विज्ञानादी विषयांचा प्रात्यक्षिक अनुभव मिळतो. विविध प्रकारच्या स्पर्धा होतात. त्यातून मुलांमधील उपजत कलागुणांना वाव मिळतो. सध्या हे सारे काही थांबलेले आहे. मुले घर आणि परिसरातच अडकून पडली आहेत. त्यांच्यामध्ये वैचारिक आक्रसलेपण आले आहे. ग्रामीण भागातील मुले पालकांबरोबर बिगारी, रंगारी, शेती अशा कामांवर जुंपली जात आहेत. त्यांचा शिक्षणाविषयीचा दृष्टिकोन बदलला असून मोठे ध्येय बाळगण्याचा, स्वप्ने पाहण्याचा विसरच मुलांना पडला आहे. सामाजिक दृष्टिकोनातून पाहिले तर मुलांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसते. मुले, पालकांसह राष्ट्राचेही नुकसान होत आहे. इतर क्षेत्रे खुली करताना घेतलेली काळजी पाहता शिक्षण क्षेत्रासाठीही उपाययोजना करून शाळा सुरू करणे अत्यावश्यक आहे.
– अपर्णा पाठक देशपांडे आणि राजेंद्र आर. देशपांडे, औरंगाबाद

आरोग्याला प्राधान्य आवश्यक

मॉल, बागा खुल्या होत असताना शाळा बंद का, असे कितीही म्हटले, तरी कोविडरुग्णांची वाढती संख्या आणि डेल्टा प्लसची टांगती तलवार पाहता घाई करणे घातक ठरू शकते. मॉल किंवा बागांमध्ये मुले गेली, तरी तिथे त्यांची संख्या मर्यादित असते आणि मुले पालकांबरोबर असल्यामुळे स्वच्छतेचे, अंतराचे नियम पाळले जाणे शक्य असते. शाळेत तसे होत नाही. निम्म्याच विद्यार्थ्यांना बोलवायचे म्हटले, तरीही मोठय़ा संख्येने मुले एकाच ठिकाणी बराच काळ बसणार असतात. शिक्षकांनी कितीही बारकाईने लक्ष द्यायचे ठरवले, तरी प्रत्येक मुलावर पूर्ण वेळ लक्ष ठेवणे कठीणच आहे. मुले प्राथमिक शाळेतली असोत वा महाविद्यालयांतली, आता एवढय़ा काळानंतर त्यांना मोकळेपणा मिळाल्यानंतर त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार नाही. ती बाहेरच्या जागात वावरायला, बागडायला उत्सुक आहेत आणि मुलांच्या मानसिकतेचा विचार करता हे स्वाभाविकच आहे. अशा स्थितीत संसर्गाचा धोका अधिक वाढू शकतो. १०० टक्के शिक्षकांचे पूर्ण लसीकरण झाल्याशिवाय शाळा सुरू करणे योग्य नाही. मधल्या काळात राज्यातल्या काही भागांत शाळा सुरू झाल्या होत्या. तेव्हा शिक्षकांचे लसीकरण झालेले असूनही मुलांना आणि त्यातून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला संसर्ग होण्याच्या घटना वाढल्या होत्या. काही लहान मुलांमध्येही सहव्याधी असतात. अशा मुलांचाही विचार व्हायला हवा. हे पुढचे घोळ टाळण्यासाठी सरकारने शिक्षकांच्या लसीकरणावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. मुलांसाठी लस उपलब्ध झाली, की त्यांनाही ती लवकरात लवकर दिली पाहिजे. त्यासाठी शाळांची मदत घेता येईल. ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांच्या समस्या फारच गंभीर आहेत. मोबाइल नाही, नेटवर्क नाही, शाळाच बंद असल्यामुळे शिक्षक आपापल्या गावी निघून गेले आहेत. त्यांच्या शिक्षणाची समस्या खऱ्या अर्थाने गंभीर आहे.
– जयश्री देशपांडे, सुनील देशपांडे, पुणे

Advertisement

ऑनलाइन शिक्षण आनंददायी नाही

दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. शिक्षण पूर्णपणे ऑनलाइन सुरू आहे. त्यामुळे मुलांचे खूप नुकसान झाले आहे. ऑनलाइन वर्ग सुरू असले तरी यातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक आणि मानसिक विकास होऊ शकत नाही. घरात संगणकासमोर बसून एकटय़ानेच शिकणे हे फारसे आनंददायीही नाही. विद्यार्थी जीवनात त्यांना शाळांमध्ये मिळणारे शिक्षणच महत्त्वाचे आहे. यातून त्यांचा विकास घडू शकतो. त्यात ऑनलाइन वर्गाच्या अनेक समस्या आहेत. शहरांमध्ये इंटरनेट, मोबाइल, लॅपटॉप अशा सुविधा उपलब्ध असतात, मात्र ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना ही साधनेदेखील उपलब्ध नसतात. त्यामुळे या ऑनलाइन शिक्षणाच्या काळात त्यांच्या अभ्यासाचा आधीच जटील असणारा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. विद्यार्थी घरी राहून कंटाळले आहेत. त्यांच्या अभ्यासाचे होणारे नुकसान पाहून पालकांनाही चिंता वाटू लागली आहे. त्यामुळे पाल्य आणि पालकांवरील मानसिक ताण कमी होण्याच्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वागीण वाढीच्या दृष्टीने शाळा सुरू होणे अतिशय गरजेचे आहे.
– स्मिता आणि अजय काजने, नागपूर

सामाजिक जाणीवच संपुष्टात

उद्योगधंद्यांचे नुकसान झाल्याच्या, आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढल्याच्या, लोक घरात अडकून पडल्याच्या मुद्दय़ांवर चर्चा नेहमीच होतात, मात्र गेल्या वर्षभरात सर्वच इयत्तांमधल्या विद्यार्थ्यांचे जे अपरिमित नुकसान झाले आहे, ते भरून निघणे कठीण आहे. या अनिश्चित वातावरणात विद्यार्थी सर्वात जास्त भरडला गेला आहे आणि आजही भरडला जात आहे. करोनामुळे शाळा बंद पडल्यामुळे आमच्या पाल्यांना घरी बसून ऑनलाइन वर्गाशिवाय पर्यायच उरलेला नाही. या वर्गाचा तोटा असा, की मुलांना काही सामाजिक जीवनच उरलेले नाही. अभ्यासापासून मनोरंजनापर्यंत सर्वच गोष्टींसाठी मुले कोणत्या ना कोणत्या स्वरूपाच्या पडद्यासमोर बसलेली दिसतात. मोबाइल फोन, लॅपटॉप, टीव्हीमुळे मुले एकलकोंडी झाली आहेत. चिडचिडी, हट्टी होत आहेत. डोकेदुखी, मानदुखी, पाठदुखी, डोळ्यांवरील वाढता ताण, निद्रानाश, डोळ्यांतील कोरडेपणा आणि दूरदृष्टी दोष वाढत आहे. यावर उपाय म्हणून सरकारने योग्य ती खबरदारी घेऊन शाळा लवकरात लवकर सुरू कराव्यात.
– मंगला आणि पंकज गजभिये, नागपूर

Advertisement

The post पालकच म्हणतायत.. पडद्यावरची शाळा आता पुरे appeared first on Loksatta.Source link

Advertisement