साेलापूर31 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
औज बंधाऱ्यातून सोलापूर शहरासाठी रोज ९० दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा केला जातो, तर दुसरीकडे कर्नाटकातील विविध प्रकल्पांसाठी रोज २०० दशलक्ष लिटर पाण्याची चोरी करण्यात येते.
उजनी धरणातील पाण्याने बंधारा भरून घेतल्यानंतर पाण्याची पातळी अडीच मीटर होईपर्यंत कर्नाटककडून पाणीचोरी सुरूच असते.
कर्नाटककडून दुपटीत पाणी उपसा
उजनीतील पाण्याने शनिवारी औज बंधारा पूर्णपणे भरताच कर्नाटकच्या बाजूने पाण्याचा उपसा सुरू झाला. सोलापूरसाठी रोज उपसा होतो त्याच्या दुपटीने कर्नाटककडून सुरू आहे. बंधाऱ्यातील पाणी पातळी अडीच मीटर होण्यास १८ दिवस लागतात. या १८ दिवसांत ३६०० दशलक्ष लिटर उपसा कर्नाटक करतो, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.
सामंजस्याने सुटू शकेल प्रश्न
पाणीचोरीची बाब यापूर्वी अनेक वेळा महापालिकेच्या सभागृहात मांडलेली आहे. कर्नाटकने पळवलेल्या पाण्याचा पैसाही सोलापूर महापालिकाच भरत आहे. हा प्रश्न सामंजस्याने सुटेल. जेवढे पाणी कर्नाटक औज बंधाऱ्यातून पळवते आहे तेवढेच पाणी आपण आलमट्टी धरणातून कालव्याद्वारे घेऊ शकतो. प्रवीण डोंगरे, माजी उपमहापौर
पावसाळा लांबला तर पाणीप्रश्न होईल गंभीर
सध्या शहरात कुठे चार तर कुठे पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही भागांत जलवाहिनी नसल्यामुळे टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, पाणीचोरीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला सुपूर्द केला आहे. पाणीचोरी प्रकरणी तत्परतेने काही करण्याची मानसिकता कोणत्याच स्तरावर दिसत नाही. पावसाळा लांबल्यास सोलापूरच्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा गंभीर बनण्याची शक्यता आहे.