पसाऱ्याचं शास्त्र!मंगला गोडबोले

Advertisement

‘सुटसुटीत संसार’ ही अंधश्रद्धा आहे आणि आवराआवरी क्षणिक असली तरी पसारा चिरंतन आहे, याचा साक्षात्कार सर्वानाच होतो तो दिवाळी जवळ आली, की साफसफाई करायचं नुसतं ठरवलं तरीही. त्या वेळी आपल्या घरानं किती काय काय पोटात घेतलंय हे कळायला लागतं आणि आपल्या जगण्यात जमलेली ही ‘समृद्ध अडगळ’ कशी दूर करावी हा प्रश्न पडतो, कारण पसारा हा आत्म्यासारखा; उघड दिसत नाही, पण साथ सोडत नाही. हेच पसाऱ्याचं खरं शास्त्र आहे!

‘‘सणावाराची तयारी करताना आधी घर आवरावं लागतं. शास्त्र असतं ते! चकल्या-कडबोळी आता नेहमीचीच झालीयेत. या खेपेला तू दिवाळीसाठी एकवेळ ती केली नाहीस तरी चालेल. घर तेवढं आवरून घे. आई दर दिवाळीपूर्वी घराचा कोपरा न् कोपरा आवरायची. छान वाटायचं.’’ त्यानं फर्मान काढलं, तेव्हा तिची चकल्या-कडबोळय़ांची सगळी फील्डिंग पुरेपूर लावून झाली होती. खरं तर, ती रसद मिळण्याची खात्री पटल्यावरच त्यानं हा प्रस्ताव मांडला होता. सणवार आले की त्याला हमखास आई आठवायची आणि त्यानं आईला स्मरलं, की तीही आईनं कधीकाळी केलेलं काम, जास्तच चांगलं करून दाखवायला पेटून उठायची!

Advertisement

वास्तविक त्याची आई काय, ती काय, दिवाळी म्हटली, की घरच्या बाईला कामं थोडीच चुकणार आहेत? गेल्या आठवडय़ामध्ये तिनं काय कमी मेहनत केली होती? जरा वेळ मिळाला, की नेटवर जायचं आणि कुठून कुठला पदार्थ मागवता येईल याचा रीसर्च करायचा. चकल्या-कडबोळी कुठून घ्यायची? लो-कॅलरी तुपातले अनारसे कोण बनवतं? कमळाचे चिरोटे-खाजाच्या करंज्यांवर कुणाचा हात बसलेला आहे? या प्रत्येक गोष्टीचा छडा लावून नेमक्या ऑर्डरी बुक करण्यात तिचा जीव मेटाकुटीला आला होता. इतके जिवापाड कष्ट केल्यावर दुसरा एखादा नवरा श्रमपरिहाराचे पर्याय सुचवत बसला असता. तर याला घराची आवराआवर सुचलेली. तिनं तातडीनं सुनावलं, ‘‘त्यांना घर आवरणं भागच होतं रे. केवढा वाढवून ठेवला होता त्यांनी पसारा! माळे, पोटमाळे, खण, कप्पे, शेल्फ, कपाटं सगळं भरलेलं. गावजेवणाएवढी भांडीकुंडी, वीस-पंचवीस लोकांना पुरतील एवढय़ा गाद्यागिद्र्या.. सोसच फार ना त्यांना सगळय़ाचा! मी बै पहिल्यापासून सगळं सुटसुटीतच ठेवलंय.’’

हे बाकी खरं होतं. त्यांनी पहिल्यापासूनच व्याप-पसारा न वाढवण्याकडे कल ठेवला होता. मूल एकच पुरे. हवाय कोणाला जास्त लिप्ताळा? जुनी भांडी-कुंडी-फडताळं-कोनाडे नकोत. आपण घरात राहाणार आहोत, पुराण- वस्तुसंग्रहालयात नाही! घरात मुळात माळे आणि पोटमाळे नसावेतच. ते दिसले की कचऱ्यात जाण्यायोग्य गोष्टी वर भिरकावल्या जातात. पण या त्यांच्या कल्पना कल्पनेतच राहिल्या. हा नवा फ्लॅट त्यांनी जेव्हा खरेदी केला, तेव्हा त्यात फक्त प्रशस्त, खुल्या भिंती होत्या. पुढे इंटीरियरवाल्यानं घेतल्या पैशाला जागण्यासाठी त्या लाकडानं मढवल्या हा भाग वेगळा. दिसली भिंत की डकव लाकूड, कर जादू, असा खाक्या आरंभला! पायऱ्यांच्या पोटात, पलंगाच्या ढोलीत, विभाजकाच्या आगे-मागे, टेबलाखाली, खिडकीवर ठिकठिकाणी उघड-छुपे कप्पे बनवले. नव्या घरी आलेल्या पाहुण्यांना अनेकदा ‘ओळखा पाहू?’ ‘बुवा..कुक्’ असे खेळ खेळावे लागायचे. घरच्या घरी थेट पर्वतारोहणाची प्रॅक्टिस करण्यासाठी छताला वटवाघळासारखे टांगलेले कप्पे होते. फारच पीडक पाहुणा आला तर त्याला हळूच खांबात चिणता यावं, इतपत सोय पोकळ खांबांमध्येही करून ठेवलेली होती. पण करता करता या सगळय़ा ‘स्टोरेज स्पेसेस’ किंवा अडगळीच्या जागा भरल्या. मग गॅलऱ्यांचे लोखंडी पिंजरे केले. तेही भरले. कुठलंही फळकूट उचलल्यावर, दार उघडल्यावर, खण ओढल्यावर कशाचा वर्षांव अंगावर होईल हे कळेनासं झालं. तेव्हा पसारा आवरायची वेळ झाल्याचा साक्षात्कार झाला. दिवाळीसाठी घर आवरणं हे शास्त्र मदतीला होतंच.

Advertisement

‘‘तू तुझ्या वस्तू आवर, मी माझ्या आवरतो.’’

‘‘मी घरासंबंधीचं सामान बघते, तू बाहेरचं निस्तर.’’

Advertisement

‘‘तू दोन खोल्या घे, मी दोन घेतो.’’ वगैरे वाटणी सुरू झाली.

‘‘तू उंच आहेस, तू कुठेही पोचशील. तू आपलं वरचं, वरचं आवर.’’

Advertisement

या सूचनेवर नकळतपणे ‘‘तसा मी कोणतंही काम वरवरच करतो गं.’’ हे वाक्य त्याच्या तोंडून बाहेर पडलं आणि सगळी खेळीमेळी संपली.

‘‘घरातल्या सगळय़ा पसाऱ्याला मी नव्हे, तूच कारण आहेस,’’ वगैरे फैरी सुरू झाल्या.

Advertisement

‘‘एवढी प्रशस्त गॅलरी होती. सगळी तुझ्या व्यायामाच्या साधनांनी भरलीये. ते बायसेप का ट्रायसेप.. कधी ट्राय केलंयस? काय उपयोग केलास त्यांचा?’’

‘‘छाती फुगवण्याच्या यंत्रावर फ्रीमध्ये मिळालं म्हणून घेतलंय बरं का. म्हटलं जिमची फी वाचवावी..’’

Advertisement

‘‘वाचली का? फक्त स्वत: फुगलास! आता मी ओले कपडे वाळवायला वापर करते त्या सगळय़ा यंत्रांचा!’’

‘‘पण हौसेनं घेतलेला तो व्हॅक्युम क्लीनर कितीदा वापरलास? जिन्याखालची अर्धी

Advertisement

जागा खाल्लीये त्याच्या खोक्यानं. खोक्यावरची

धूळ बोळय़ानं झटकायचं काम फक्त वाढलंय घरातलं.’’

Advertisement

आता त्या व्हॅक्युम क्लीनरचे पार्ट मांडून, एकमेकांशी जुळवून घेण्याच्या वेळात तिचा सगळय़ा घरावर धावता झाडू मारून व्हायचा. कशावरही बोळा फिरवण्यात तर ती एक्स्पर्टच होती, या कर्माला काय करणार होता तो? घरात ठिकठिकाणी अशी नवी यंत्रतंत्रं पडून होती. जी घेताना खूप मोहवायची. पण वापरायला ‘जुनं ते सोनं’ वाटायचं. त्यात त्या ‘ऑफर्स’चा सुळसुळाट कशावर काय मोफत, पाचावर तीन जादा, महागाच्या मालावर एखादा स्वस्त आयटेम गळय़ात मारलेला, ऑर्डरी बुक करण्याची घाई आणि वाढत्या अडगळीबाबत शोक करण्याची सोय, या जीवनशैलीतून कुणाचीच सुटका नव्हती.

पूर्वी तद्दन निरुपयोगी वस्तू खरेदी करायला आम लोकांना निदान पर्यटनाला तरी जावं लागे. अक्रोड फोडण्याचा अडकित्ता आणण्यासाठी माणसं काश्मीपर्यंत जात! आता घरबसल्या तो मागवता येतो.  येऊन पडतो. कायमचा डोक्यावर बसतो. अशा रीतीनं आपल्या जगण्यात जमलेली ‘समृद्ध अडगळ’ बघता बघता दोघं भंजाळले. त्यावरून एकमेकांवर चिडचिड करायला लागले.

Advertisement

‘‘दोन पायांसाठी दोनशे पायताणं का लागतात गं तुला?’’

‘‘दोन डोळय़ांसाठी दोनशे चश्मे तुला लागतात, तशीच! आधी तुझा चष्म्यांचा ड्रॉवर रिकामा कर. मागच्या वेळी एअरपोर्टवर कस्टमवालासुद्धा त्यावरून बोललेला तुला!’’

Advertisement

हे मात्र खरंच होतं. जवळचं बघायचा, लांबचं बघायचा, न बघता बघायचा, बघून न बघितल्यासारखं करायचा, उन्हाचा, सावलीचा, कॉम्प्युटरचा, फुल्ल, सेमी, रिमलेस, खालून वपर्यंत बघायचा, वरून खालपर्यंत बघायचा, असे असंख्य चष्मे तो बाळगे. त्यातलंच काही कोंबलेली बॅग घेऊन परदेशी जाताना एका कस्टम अधिकाऱ्यानं त्याला अडवून विचारलं होतं, ‘‘तिकडे काय चष्म्याचा बिजनेस करायला चाललायत का सर?’’ आपले चष्मे लोकांच्या एवढे डोळय़ावर येताहेत हे तेव्हा पहिल्यांदा जाणवलं होतं त्याला. बायकोची वक्रदृष्टी तर जुनीच होती! तिनं दणादणा सगळे ‘उपनेत्र’ बाहेर काढण्याचा उपद्वय़ाप केला. मग त्यानं तिचा ‘इमिटेशन ज्वेलरी’चा खण रिकामा करून त्यात ते ठेवले. तिनं त्या कानातल्या-गळय़ातल्यांसाठी दुसऱ्या कप्प्याचा घरोबा शोधला. वेळ खूप गेला. त्या मानानं घरातल्या थोडय़ाही वस्तू घराबाहेर गेल्या नाहीत.

जी तऱ्हा चष्म्यांची, तीच मोबाइल्सची, लॅपटॉप्सची. प्रचंड ‘ई वेस्ट’ जमलेला. ‘एकदा बघायला पाहिजे त्याच्याकडे’ असं म्हणून गोळा केलेल्या त्या पसाऱ्याकडे ते दोघं बघतच बसले. ही मोठय़ांची खेळणी निस्तरणं अशक्य वाटल्यावर ते मुलाच्या खेळण्यांकडे वळले, तर तो घाट आणखीच दुस्तर होता. त्यांना एकच मूल होतं, पण त्याच्याकडे ‘एकसे एक’ खेळणी होती. हे मूल एकदाच घरात आलं असलं तरी त्याच्या वाढदिवसाला दरवर्षी येण्याची खोड लागलेली होती! प्रत्येक वाढदिवसाला पेठ फुटल्यासारखी खेळणी, पुस्तकं, रंगपेटय़ा, वॉटरबॅगा, यांचा खच पडे. मुलाच्या हातात इलेक्ट्रॉनिक रिमोट वगैरे कंट्रोल असले तरी यांचा मुलावर काडीचाही कंट्रोल नसे! उलट एकुलता एक असल्यानं तोच यांना धाकात ठेवी. या धाकापोटी आणि आणखी वाकावाकी टाळण्यासाठी मुलाचा पसारा आवरण्याची महत्त्वाकांक्षा त्यांनी तूर्तास बाजूला सारली. त्याची खेळणी निदान पायानं कशाकशाच्या खाली ढकलता तरी येत होती.

Advertisement

आपल्या सामानापुढे निरुपाय आहे, हे ओळखून तो हलकेच म्हणाला, ‘‘मला वाटतं, आपण पुढच्या वर्षी दिवाळीच्या तयारीची सुरुवातच आवराआवरीनं करूया.’’

‘‘बघ ना! आपल्या घरानं किती काय पोटात घेतलंय हे आताशी थोडं कळायला लागलंय आपल्याला!’’ तिनं क्षणभर आपलं पोट आत घेत म्हटलं.

Advertisement

एवढय़ा खटाटोपादरम्यान काही गोष्टी मात्र दोघांना मनोमन कळल्या होत्या-

सुटसुटीत संसार ही अंधश्रद्धा आहे. शेवटी संसार आहे तिथे पसारा आहेच. तो फार तर या खणातून त्या खणात जाईल, पण एकदा ‘धरलेलं’ घर तो कधीही सोडणार नाही. सहसा आपण गोळा केलेला ऐवज मौलिक, दुसऱ्याचा मात्र तद्दन फापटपसारा, असं सर्वानाच वाटतं. त्यामुळे ‘मी-तू-पण-सारे विसरून’ कोणताही पसारा कधीच नष्ट होत नाही. उगाच सणावारी त्याच्या नादी लागून सणाची गोडी घालवू नये. ऐन सणात पाठीत उसण भरून घेऊ नये! आवराआवरी क्षणिक असली तरी पसारा चिरंतन आहे. मनावर दगड ठेवून त्यातली एकही वस्तू घालवली, तर पुढच्या दहा मिनिटांमध्ये तिची तीव्र गरज भासू शकते. डोळय़ांवर पट्टी बांधून तीच वस्तू टिकवली, तर तिची अडगळ बांधलेल्या डोळय़ांनाही खुपू शकते. पसारा हा आत्म्यासारखा; उघड दिसत नाही, पण साथ सोडत नाही. कारण तो आत्म्याच्या खालोखाल अमर आहे! हेच पसाऱ्याचं खरं शास्त्र आहे.

Advertisement

सहसा शास्त्र विषयात कच्चे असणारे भिडू कलेकडे वळतात. त्याचप्रमाणे पसारा पेलू न शकणाऱ्यांनी तो दृष्टिआड करण्याची कला जोपासावी. सध्या तेच करून दोघं ‘पुढच्या दिवाळीचा’ वायदा करताहेत. मागच्या दिवाळीत त्यांनी हेच केलं होतं, पुढच्या दिवाळीतही ‘त्या पुढची दिवाळी’ असेलच!

mangalagodbole@gmail.com

AdvertisementSource link

Advertisement