सातारा36 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस नेत्या पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रोत चोरट्याने हात सफाई करत तब्बल 15 तोळ्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे भाजपच्या डॉक्टर सेलच्या शहराध्यक्षासह एका पत्रकार आणि एका कार्यकर्त्यांला पंकजा मुंडेंची परिक्रमा यात्रा चांगलीच महागात पडली आहे.
पंकजा मुंडे यांची राज्यात शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू आहे. त्यांची परिक्रमा यात्रा फलटणमध्ये दाखल झाल्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील चौकात भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. पंकजा मुंडे यांचा ताफा थांबताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी गाडीभोवती गर्दी केली. या गर्दीचा फायदा उचलत अज्ञात चोरट्याने भाजपा डॉक्टर सेलचे फलटण शहराध्यक्ष डॉक्टर सुभाष गुळवे यांच्या गळ्यातील चार तोळ्याची चेन, सांगवी (फलटण) येथील महादेव कदम यांची तब्बल साडेदहा तोळ्याची चेन आणि पत्रकार पोपटराव मिंड यांच्या गळ्यातील एक तोळ्याची चेन लंपास केली.
परिक्रमा यात्रा पुढे गेल्यानंतर संबंधितांना दागिन्यांची चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी चोरट्याचा शोध घेतला. मात्र, चोरटा सापडला नाही. कार्यकर्त्यांनी काढलेले फोटो, चित्रीकरण आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्याचा शोध घ्यायला पोलिसांनी सुरूवात केली आहे. दरम्यान, भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यासह एका पत्रकाराला मुंडेंची परिक्रमा यात्रा चांगलीच महागात पडली आहे. राजकीय मेळावे, सभा, निवडणूक मतमोजणी, अशा ठिकाणी गर्दीत घुसून चोरटे दागिने लंपास करतात.