उमेद देणारा लेख
डॉ. उर्जिता कुलकर्णी यांचा ‘जरा विसावू या वळणावर ’ (१८ डिसेंबर) हा लेख वाचला. अतिशय सुंदर, सकारात्मकतेकडे नेणारा व स्वत:कडे नव्या दृष्टीने पाहायला शिकवणारा हा लेख आहे. गेल्या काही महिन्यांपासून काही गोष्टींमुळे मला खूप मानसिक त्रास होतो आहे. पण आज हा लेख वाचून खूप बरं वाटलं. नवी उमेद मिळाली. खूप खूप धन्यवाद.
– प्राजक्ता जोशी
पर्यटकांचे मनोधैर्य वाढवणारा लेख
उष:प्रभा पागे यांचा ‘पर्वत खुणावताहेत’
(११ डिसेंबर) हा सर्वागसुंदर लेख वाचनात आला. पर्यटकांचे मनोधैर्य वाढवणारा, निसर्गाशी नाते कसे जपावे, कसे वागावे हे सांगणारा हा लेख खूप आनंद देऊन गेला. त्याचबरोबर माझ्या अल्प भटकंतीच्या आठवणी ताज्या केल्याबद्दल धन्यवाद.
– मुकुंद जोशी
‘सांस्कृतिक ठेव्या’चे कार्य कौतुकास्पद
‘सांस्कृतिक ठेवा ‘आवरायला’ हवा!’ हा मंगला गोडबोले यांचा लेख (४ डिसेंबर) एका संवेदनशील विषयावर लिहिलेला होता. घरातील जुन्या जीर्ण पोथ्या, फुटलेल्या तसबिरी यांसारख्या गोष्टी बऱ्याच वेळी झाडाखाली किंवा नदीत पाण्यात सोडून दिल्या जातात. कोणाच्याही भावना न दुखावता त्यांचे संकलन, वर्गीकरण करून योग्य प्रकारे पर्यावरणाचा विचार करून त्यांचे विसर्जन करणे हे कार्य सोपे नाही. संबंधित संस्थांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहेच, तसेच सद्य:स्थितीत वेगवान जगात या संदर्भात काय करावे याबद्दलचे लेखातील विचारही योग्य आहेत.
-प्र.मु.काळे, नाशिक
‘डार्क वेब’पासून जपा!
अपर्णा देशपांडे यांचे ‘जगणं बदलतंय’ हे सदर अतिशय उत्तम आणि वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारे ठरले. ‘खोल आणि गडद काही’ (११ डिसेंबर) या त्यांच्या लेखातील ‘डार्क वेब’ची ओळख लहान मुलांना न झालेलीच बरी. तरुण मुले मात्र त्या जगाची मुशाफिरी करून येतातच. दिवसेंदिवस हा विळखा जास्त गडद होत जाणार. ‘हॅकिं ग’ करणाऱ्या मुलांनी जास्त सावध राहण्याची गरज आहे.
– अनिकेत देशपांडे , चेन्नई
अभिनय व गायनाचा सुंदर मिलाफ!
१८ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘गद्धेपंचविशी’ सदरातील ज्येष्ठ गायिका फैयाज यांचा लेख छान वाटला. त्यांची काही नाटके मी पाहिली आहेत. उत्तम अभिनय आणि गायन या दोघांचा सुंदर मिलाफ झाल्याचे जाणवते.
– प्रमोद तेंडुलकर, कॅलिफोर्निया
The post पडसाद appeared first on Loksatta.