पडसाद : ‘मूनलायटिंग’ नकोच‘मूनलायटिंगचा झाकोळ’ हा सारिका चाटुफळे-कुलकर्णी यांचा लेख (१ ऑक्टोबर) वाचला. त्यात नमूद केलेली ‘विप्रो’ कंपनीची कारवाई योग्यच आहे, असे वाटते. ‘मूनलायटिंग’ची शिक्षण क्षेत्रालाही  लागण झाली आहे. एका शिक्षणसंस्थेत पूर्णवेळ काम करून पगार घेणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी स्पर्धक शिक्षणसंस्थांचे प्रवेश करतात आणि त्याचा आर्थिक मोबदला घेतात हे असमर्थनीय आहे. त्यामुळे त्यांच्यावरही संबंधित शिक्षण संस्थांनी निलंबनाची कारवाई करावी.  ‘विप्रो’ ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रगण्य भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. कंपनीचे संस्थापक अझीम प्रेमजी हे दानशूर तसेच नैतिकता आणि व्यावसायिक मूल्ये कंपनीच्या स्थापनेपासून जपत आलेले उद्योगपती समजले जातात. सध्याचे कंपनीचे अध्यक्ष रिषद प्रेमजी यांनी वडिलांचा वारसा पुढे चालवला आहे याचे समाधान वाटते. येथून पुढे कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीसाठी करारबद्ध करताना ‘मूनलायटिंग’ न करण्याबाबत सुस्पष्ट कल्पना द्यावी आणि नेमणूकपत्रात तशी अट घालावी. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांची या सर्व अटी मान्य असल्याबद्दल त्यावर स्वाक्षरी घ्यावी.

Advertisement

    – डॉ. विकास इनामदार

 ‘मूनलायटिंग’मध्ये नवीन काय?

Advertisement

मुळातच स्त्रिया एका वेळी अनेक कामं करत आल्या आहेत, म्हणूनच मूनलायटिंग करणं त्यांना सोपं आहे. आता ‘वर्क फ्रॉम होम’मुळे त्या कार्यालयीन कामासोबतच इतर (घरातलीसुद्धा) कामं करू शकतात. हेही एक प्रकारे ‘मूनलायटिंग’ म्हणावं लागेल. त्यासाठी कंपनीची परवानगी जरुरी नाही असं वाटतं.

-गिरीश जोशी

Advertisement

 बेचैन करणारे वास्तव

‘संधिकालच्या घनगर्द सावल्या’ या डॉ. शुभांगी पारकर यांच्या लेखातून (२४ सप्टेंबर) सद्य:स्थितीचे मन बेचैन करणारे वास्तव समोर आले. आता पूर्वीसारखे वृद्धत्व सुखद, आदरणीय वगैरे राहिले आहे का? अशीच शंका येऊ लागली आहे. काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना चांगली वागणूक मिळते, पण सगळीकडे अशी परिस्थिती नाही. ज्यांनी तरुणपणापासून सर्वाशी व्यवस्थित वागणूक व सद्भाव ठेवला, त्यांना फारशा अडचणी येत नाहीत. पण स्वभावात जर हेकटपणा असेल तर वृद्धपणी मात्र उपेक्षा होण्याची शक्यता जास्त असते. बदलत्या काळानुसार कालसुसंगत आचरण ठेवले तर नवीन पिढीला त्याचा त्रास होत नाही. पण पूर्वीप्रमाणेच वागण्याचा अट्टहास असेल तर वादविवाद होतात. अनेकदा ज्येष्ठ नागरिक एकाकी पडतात. आलिशान घरात एकटे वृद्ध राहात असल्याची उदाहरणे आहेत.

Advertisement

 कुटुंबात राहाताना तडजोडी व सामंजस्य व कमीत कमी अपेक्षा ठेवून जीवनातली शेवटची काही वर्षे सुखद होऊ शकतात. अर्थात हे सांगणे-लिहिणे सोपे असले तरी प्रत्यक्षात समस्या वेगवेगळय़ा असतात व त्यावर जमेल तसा मार्ग काढणे हाच उपाय असतो. आयुष्याचा शेवट किंवा शेवटची वर्षे कशी जातील हे बऱ्याच अंशी कुटुंबीय, मित्रपरिवार, नातेवाईक, हितचिंतकांच्या सहकार्यावर अवलंबून असते. त्यांच्याशी आपले वागणे कसे होते व आहे यावर बरेच काही ठरत असते.

– प्र.मु.काळे, नाशिक

Advertisement

‘स्क्रीन’ व्यसनाविषयी जागृती हवी

१७ सप्टेंबरच्या पुरवणीतील सर्वच लेख छान होते. ‘पालकत्व’ सदरातील तृप्ती जोशी यांचा ‘स्क्रीन’च्या व्यसनाबद्दलचा लेख उत्तम. काळाची गरज म्हणून मोबाइलचा योग्य वापर करावा, हे सांगण्यासाठी त्यांनी मांडलेले मुद्दे पटले. शाळाशाळांतून याविषयी आठवडय़ातून दोन वेळा तरी विद्यार्थ्यांसाठी जागृती तास ठेवायला हवा, जेणेकरून विद्यार्थी ‘स्क्रीन’च्या व्यसनापासून लांब राहातील.

Advertisement

– अनिता जोशी

गृहपाठ पहिलीपासून हवा

Advertisement

रेणू दांडेकर आणि मेघना जोशी यांचे ‘आनंददायी गृहपाठ हवा’ आणि ‘गृहपाठ तर हवाच’ (२४ सप्टेंबर) हे दोन महत्त्वपूर्ण लेख वाचले. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व संवर्धन आणि समाजाचे ऐश्वर्यवर्धन करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील नियामक तत्त्वे असली पाहिजेत. प्रत्येक घर म्हणजे दुसरी शाळा असते आणि आई-वडील हे मुलांचे प्रथम शिक्षक असतात. आज वर्गात काय शिकवले आणि आपल्या पाल्याला ते कितपत उमजले हे पालकांना समजण्यासाठी गृहपाठ असणे आवश्यक आहे. गृहपाठच रद्द केला तर हा दुवाच नाहीसा होईल आणि पालक फक्त शाळेची फी भरण्यापुरतेच बांधील राहातील. शाळेत असताना गृहपाठाची सवय लागली की या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनात पाठय़पुस्तकाबाहेरील प्रेरक जगात आलेल्या अनुभवातून काय घरी आणायचे याचे ज्ञान मिळेल. शिक्षण फक्त पदवी घेण्यासाठी मर्यादित नाही तर शिक्षण संपल्यावर जीवनाच्या प्रत्येक पायरीवर ते मार्गदर्शक ठरावे यासाठी आहे. म्हणून गृहपाठ पहिलीपासून हवा याबद्दल दुमत नसावे.

– सूर्यकांत भोसले, मुलुंड

Advertisement

संवेदनशीलतेत आपण कमी

सुप्रिया सुळे यांचा ‘आपण इतके असंवेदनशील कसे’ हा स्त्री अत्याचारासंबंधीचे मुद्दे मांडणारा लेख (३ सप्टेंबर) वाचला. लोकप्रतिनिधी इतके संवेदनशीलपणे काम करू शकतात याचे ते उदाहरण आहे. सभागृहात त्या यासंबंधीचा विषय उपस्थित करू शकतात. यापूर्वी त्यांनी असे विषय हाताळलेले आहेत. पण विषयाची व्याप्ती लक्षात घेता, त्यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेला साद घातली हे विलक्षण आहे. त्यांनी लेखात उपस्थित केलेल्या मुद्यांशी मी शंभर टक्के सहमत आहे. संवेदनशील राहाण्यात आपण सर्वच जण, सर्व आघाडय़ांवर कमी पडलेलो आहोत. ही संवेदनशीलता कशी वाढवायची याचे चिंतन समाजाच्या सर्व स्तरातून व्हायला हवे. राजकीय व्यासपीठ बाजूला ठेवून त्यांनी उपस्थित केलेल्या या मुद्यांचा विचार सर्वानी करावा असे मला वाटते.

Advertisement

– देवीदास वडगावकरSource link

Advertisement