पडसाद : गरज.. र्सवकष समीक्षेची!उत्पल व. बा.

Advertisement

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने ‘लोकरंग’ पुरवणीमध्ये ‘भारतीयत्वाचा शोध’ लेखमालिका प्रसिद्ध करण्यात आली. तीत चित्रकला, रंगभूमी, चित्रपट आणि कादंबरी या क्षेत्रांतील भारतीयतेचा शोध अभ्यासकांकडून घेतला गेला. साहित्य व वैचारिक वर्तुळात ही लेखमाला खूपच चर्चिली गेली. या लेखमालेवरील काही निवडक प्रतिक्रिया..

महेश एलकुंचवार यांचा ‘सामान्यपणाचा अहंकार’ आणि शांता गोखले यांचा ‘श्रेष्ठतम कांदबरीची प्रतीक्षाच’ हे लेख वाचून साहित्यनिर्मिती आणि/ किंवा समीक्षेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या मनात काही हालचाल होणे स्वाभाविक आहे. समाजमाध्यमांवरही या लेखांचे पडसाद उमटलेले दिसले. कलानिर्मिती आणि त्यावरील समीक्षा हा विषय एका विशिष्ट विचारव्यूहात बांधणे शक्य असले, तसे केलेही जात असले तरी अंतिमत: कलानिर्मिती हा एक प्रवाही आविष्कार असल्याने त्याला पूर्णाशाने कवेत घेणे किंवा त्याविषयी निर्णायक भाष्य करणे यादृष्टीने कुठलाही एक विचारव्यूह, एक दृष्टिकोन पुरा पडत नाही. या एका पायाभूत विचारावर भिस्त ठेवून काही म्हणावेसे वाटते. 

Advertisement

‘श्रेष्ठतम कादंबरीची प्रतीक्षाच’ असे शांता गोखले यांच्या लेखाचे शीर्षक असले तरी लेखात त्यांनी तसा थेट उल्लेख केल्याचे दिसत नाही. एलकुंचवारांनी मराठीजनांच्या सुस्त वृत्तीवर बोट ठेवले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात जी लोकोत्तर व्यक्तिमत्त्वे उदयास आली, तशी स्वातंत्र्योत्तर काळात आली नाहीत आणि आपला कलाव्यवहार, सांस्कृतिक व्यवहार खुरटलेला राहिला आहे असे मत त्यांनी मांडले आहे. मराठी साहित्य आणि मराठी समाज यांच्याविषयी काही भाष्य करणाऱ्या या लेखांच्या अनुषंगाने थोडे अधिकचे विवेचन केल्यास ते अप्रस्तुत ठरू नये.

सुरुवातीलाच आपल्याला साहित्य हे इतर उत्पादनांसारखे (घरगुती, औद्योगिक इ.) उत्पादन आहे, की ती एका अबोध जाणिवेचे पाठबळ असणारी निर्मिती आहे, असा एक प्राथमिक प्रश्न विचारता येईल. त्याच्याही पुढे जाऊन साहित्य किंवा कलाविष्कार यांचा अंतर्भाव काही अनिवार्य गोष्टींमध्ये होतो का, असेही विचारता येईल. भौतिक उदाहरण घेऊन हे आणखी स्पष्ट होऊ शकेल. एखादा प्रदेश एखाद्या फळासाठी प्रसिद्ध असतो. ते फळ दुसऱ्या प्रदेशात होत नाही, म्हणून त्या प्रदेशाला आपण कमी लेखत नाही. कदाचित त्या दुसऱ्या प्रदेशात अन्य काही गोष्टी चांगल्या होत असतील. पण जर त्या प्रदेशातील हवा अत्यंत प्रदूषित असेल, पाणी पिण्यालायक नसेल, तर मात्र त्या प्रदेशाला आपण कमी प्रतीचा, मागास ठरवू. (सध्या प्रगत समजल्या जाणाऱ्या शहरांची अशी मागास अवस्था आहे, हा वेगळा विषय!) आता आपण साहित्याला, अभिरुचीला शुद्ध हवा-पाण्यासारखे अनिवार्य समजतो, की साहित्य किंवा अभिरुची हे एखाद्या अलंकारासारखे असून, समाजाच्या मूळच्या सौष्ठवाशी त्यांचा थेट संबंध नाही असे समजतो, यावर आपली पुढील टिप्पणी अवलंबून असेल.

Advertisement

हे थोडेसे ‘विचित्र विच्छेदन’ करण्याचे कारण असे की, समीक्षेची दृष्टी थोडी व्यापक व्हावी आणि त्यात वस्तुनिष्ठ म्हणता येतील अशा निकषांचा आधार घेतला जावा. साहित्य किंवा कलानिर्मितीची समीक्षा करताना ‘जे निर्मिले जाते आहे’ त्याकडे काही ‘पूर्वसिद्ध निकषां’च्या आधारे बघत त्या निर्मितीला प्रतिसाद देणे, पुढील निर्मितीच्या गुणवत्तेत सुधारणा होईल म्हणून टीका-टिप्पणी करणे हे हेतू असतात, आणि ते स्तुत्य आहेत. पण साहित्य, अभिरुची या गोष्टी सार्वकालिक, सर्वत्र एकसारख्याच असल्या पाहिजेत असा आग्रह असेल तर तो तपासून पाहावा लागेल. ‘अलीकडे जे लिहिले जाते त्यात फारसा दम नाही’ असे सरधोपट विधान बऱ्याचदा केले जाते. हे विधान करण्याआधी जे लिहिले जाते आहे ते सर्व वाचले गेलेच असेल असे नाही. दुसरे म्हणजे एखाद्या कालखंडात लिहिले गेलेले आपल्याला अधिक प्रभावित करून गेले असेल आणि आज तसे लिहिले जात नसेल तर त्यामागे काय कारणे असावीत, हाही शोध घेणे सयुक्तिक ठरेल. समीक्षेची बैठक सहसा संख्याशास्त्रीय माहितीवर आधारलेली किंवा वस्तुनिष्ठ अशी नसून, आत्मनिष्ठ असते. त्यामुळे आपण थेट निष्कर्षांवर पोहोचतो; कारणमीमांसेत जात नाही. समीक्षेची बैठक वस्तुनिष्ठतेकडे जाण्यासाठी आपण काही मूलभूत प्रश्नांचा शोध घेऊ शकतो. उदा. महान साहित्यकृती म्हणजे काय?, प्रचंड वैविध्य (संकल्पनात्मकदेखील) असणाऱ्या जगात महानतेची एकच सार्वत्रिक व्याख्या होऊ शकेल का?, ‘अभिजात’, ‘चांगली अभिरुची’ या संज्ञांचा अर्थ काय?, निर्मितीची मानवी आकांक्षा महत्त्वाची की निर्मितीची गुणवत्ता?, असा फरक करावा की करू नये?, नैसर्गिक विज्ञानात- उदा. भौतिकशास्त्र निश्चित विधाने करता येतात, कारण तिथे सहभागी घटकांचे वर्तन नियमबद्ध असते. कला-साहित्य हे क्षेत्रही नियमबद्ध आहे असे आपल्याला वाटते का?.. इत्यादी. 

वस्तुनिष्ठतेचा आग्रह कदाचित अनाठायी किंवा अशक्यप्राय वाटू शकेल. पण आत्मनिष्ठतेचा आधार बऱ्याच जास्त प्रमाणात घेतला जात असल्याने संतुलन साधण्यासाठी वस्तुनिष्ठतेकडे जाणे गरजेचे आहे असे वाटते. डॉ. अरूण टिकेकर यांनी त्यांच्या ‘सारांश’ या ग्रंथातील ‘साहित्याचे समाजशास्त्र’ या लेखात उद्बोधक माहिती दिली आहे. त्यांनी हिपोलिट टेन या फ्रेंच वाङ्मयीन इतिहासकाराची मते उद्धृत केली आहेत. त्याचे एक मत असे-  A literary work is not a mere play of imagination,  the solitary caprice of a heated brain, but a transcript of contemporary manners,  a type of certain kind of mind. यातील ‘सर्टन काइंड ऑफ माइंड’ हा उल्लेख महत्त्वाचा आहे. याच लेखात टिकेकरांनी टेनच्या आधी होऊन गेलेल्या हर्डर या जर्मन तत्त्वचिंतकाचे मतही नोंदवले आहे. ते असे की, प्रत्येक वाङ्मयकृतीचे मूळ विशिष्ट सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीत सापडते. टिकेकर पुढे लिहितात की, प्रसिद्ध जर्मन तत्त्वचिंतक हेगेल याचा दृष्टिकोन असा होता की, प्रत्येक युग अभिव्यक्तीसाठी एखादा कलाप्रकार निवडत असते. याचा अर्थ असा की, वाङ्मयाची पाळेमुळे समकालीन समाजातच रुजतात आणि वाढतात. हेगेलने असेही म्हटले आहे की, नोकरशाही पद्धती आणि प्रत्येकाला काम वाटून देणारी पद्धती या दोहोंमुळे महाकाव्याचा वाङ्मयप्रकार लयाला जाऊन कादंबरी हा ‘समकालीन’ वाटणारा वाङ्मयप्रकार जन्माला आला. याच यादीत टिकेकरांनी अ‍ॅडम स्मिथचे मतही नोंदवले आहे. ते असे की, वाढत्या व्यापारीकरणामुळे आणि औद्योगिकीकरणामुळे कला आणि वाङ्मय यांचे समाजाशी असलेले जैविक नाते नकळत तुटते. हे मत लक्षणीय आहे. मानवी समाजाने त्याच्या दैनंदिन व्यवहारांमधून ‘कला’ नावाची गोष्ट बाजूला काढून, तिला व्यासपीठावर नेऊन, तिला वेगळे स्थान देऊन तिच्या आविष्करणाविषयी टीका-टिप्पणी करायला सुरुवात केली. कलेचा ‘विशिष्ट विस्तार’ झाला. अन्यथा रात्री सांगायच्या गोष्टींमधून, भिंतीवरील चित्रांमधून, समूहनृत्यांतून, कामे करताना गाणी म्हणण्यातून कला ही जगण्याचा भाग बनून राहिली होतीच. तेव्हाही तिच्या आविष्करणाविषयी टिप्पणी होत नसेल असे नाही; पण तिला वेगळे, मंचीय स्वरूप प्राप्त झाले नव्हते. हे अशाकरिता नोंदवले, की माणसाच्या आंतरिक विश्वात असलेला कलेचा मूळ धागा लक्षात घेतला तर त्याच्या आजच्या असंख्य प्रकारे (यात सुमार दर्जाही आला.) होणाऱ्या आविष्कारांविषयी आपण अधिक सहानुभूतीपूर्वक विचार करू शकू.

Advertisement

टिकेकरांनी दिलेल्या उद्धृतांमधून जी दृष्टी दिसते ती वस्तुनिष्ठतेच्या जवळ जाणारी आहे. कलात्मक अभिव्यक्तीच्या संदर्भात ‘अमुक इनपुटमुळे तमुक आउटपुट’ असे थेटपणे कधीच म्हणता येत नाही; अगदी वस्तुनिष्ठतेच्या संदर्भातदेखील. पण त्या, त्या अभिव्यक्तीचे विश्लेषण अधिकाधिक नेमकेपणाने करायचे असल्यास हा मार्ग घ्यावा लागेल.

एखाद्या समाजाचे ‘सामूहिक मन’ जसे आहे तसे का आहे याचा शोधदेखील जर वस्तुनिष्ठपणे घेण्याचा प्रयत्न केला तर सामान्यपणाचे उदात्तीकरण का केले जाते, हे लक्षात येईल. यावर सविस्तर लिहिता येईल, पण मूल्यव्यवस्थेतील तफावत, कृषी आणि औद्योगिक समाजाच्या घडणीतील फरक ही काही ढोबळ निरीक्षणे इथे फक्त नोंदवून पुढे जाऊ. आपल्या अत्यंत जटिल रचनेच्या आणि जटिल परिणाम होत राहणाऱ्या समाजाचे रूप अस्वस्थ करणारे आहे, हे खरेच आहे. हे केवळ कलेच्या आस्वादाबाबत नाही, तर ‘एक विवेकी समाज’ या पातळीवरदेखील आहे. अशा विखंडित, विभाजित समाजात ‘अभिरुचीसंपन्नता’ ही मुळात व्याख्या करण्याजोगी संकल्पना म्हणून उरतच नाही. अशा समाजात वर्ग आणि जातिसंघर्ष जसा अटळ आहे, तसा ‘व्याख्यासंघर्ष’ही अटळ आहे!

Advertisement

विलास सारंग यांनी ‘मॅनहोलमधला माणूस’ हा समीक्षाग्रंथ लिहून फार मोलाचे काम केले आहे. साहित्यनिर्मितीवर जातवास्तवाचा होणारा परिणाम अभ्यासणे हेदेखील वस्तुनिष्ठ विश्लेषणाचे एक उदाहरण आहे. अर्नेस्ट हेिमग्वेच्या ‘ओल्ड मॅन अँड द सी’ या गाजलेल्या लघुकादंबरीसारखी कादंबरी मराठीत बहुधा शक्य झाली नसती असे नोंदवत सारंग त्याचे कारणही देतात- ‘मूलभूत अडचणी येतात. प्रथम म्हणजे मच्छिमार जीवन हे मराठी वाङ्मयीन विश्वाचा भाग नाही. का नाही? मुख्यत: मराठी समाजवास्तवातील कडक विभाजनामुळे. जातीयंत्रणेमध्ये व्यवसायगमनक्षमतेला प्रतिबंध होत असल्याने या व्यवसायातील माणसांना तिथेच अडकून पडावं लागलं. मच्छिमार हा ‘खालच्या’ जातीचाच नव्हे, तर अशिक्षित, सांस्कृतिक केंद्रापासून दूर अशी परिस्थिती निर्माण झाली. आता हेिमग्वेच्या कादंबरीतील कोळ्याची प्रगल्भ तात्त्विक विचार करण्याची क्षमता मराठी मच्छिमाराला कशी द्यायची?.. या कादंबरीचा पु. ल. देशपांडे यांनी मराठीत अनुवाद केला आहे. केवळ अनुवादच शक्य होता. कारण अमेरिकन लेखकाने क्यूबन मच्छिमाराविषयी लिहिलेली कादंबरी आपण वाचू शकतो व (त्यातील वास्तव सुरक्षित अंतरावर असल्याने) तिचा आस्वाद (गंध?) घेऊ शकतो. पण मराठी लेखकाने मराठी मच्छिमारावर अशी कादंबरी लिहिलीच तर सर्वसाधारण मराठी वाचकाचा भ्रुकुटिभंग होईल. असंस्कृत मच्छिमार इतका स्पष्ट, नितळ व तात्त्विक डूब असलेला विचार कसा करू शकतो? वास्तववादी परिप्रेक्ष्यातून कादंबरी नापास होईल.’

आता सारंगांच्या वरील निरीक्षणाला छेद देईल असेही एखादे उदाहरण आढळण्याची शक्यता आहे. एक थेट नसले तरी थोडे जवळ जाईल असे उदाहरण म्हणजे पु. ल. देशपांडे यांच्या ‘ती फुलराणी’मधील मंजुळेचे वडील. अर्थात ते नाटकातील मध्यवर्ती पात्र नव्हे. मुख्य म्हणजे हे नाटकही रूपांतरण आहे. पण दगडोबा साळुंके हे कष्टकरी समाजातील पात्र निर्माण करताना त्याला तत्त्वज्ञानात्मक डूब दिली गेली आहे आणि ती प्रेक्षकांना भावते. मूळ नाटकातील आल्फ्रेड डूलिटल हे पात्रही याच धर्तीचे असल्याने मराठीतही ते तसे आणले गेले, हाही एक मुद्दा आहेच. फक्त त्याने प्रेक्षकांचा भ्रुकुटिभंग झाल्याचे दिसत नाही. सारंगांचे मूळ प्रतिपादन मान्य होण्यासारखे आहेच. या पुस्तकात मांडलेला विचार, केलेली एकूण मांडणी लक्षवेधी आहे यात शंकाच नाही. मराठी साहित्याच्या स्वरूपावर एक ‘डार्क प्रकाशझोत’ टाकणारे हे पुस्तक वाङ्मयीन अभ्यासकांसाठी महत्त्वाचे आहे. मात्र, इथे लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी की, अशी साक्षेपी समीक्षा किंवा भाष्य हे ऑगस्ट स्ट्रिंडबर्ग हा स्वीडिश लेखक त्याच्या लेखनाबाबत लिहितो त्याप्रमाणे ‘टू कट नीअर द एकिंग नव्‍‌र्ह.. दुखऱ्या नसेच्या जवळ कापण्याचा’ प्रयत्न करत असते. समीक्षेचे आधार वस्तुनिष्ठतेत रुजलेले असले तरी अभिव्यक्तीचे स्वरूप तिच्या पकडीत नेमकेपणाने येईलच असे नाही. त्यामुळे सामाजिक- ऐतिहासिक- भौगोलिक संदर्भाची दखल घेत, निर्मात्याचे म्हणणे/ भूमिका काय आहे यालाही स्थान देत समीक्षा केली गेली तर ती अधिक परिणामकारक होईल. आत्मनिष्ठ-वस्तुनिष्ठ याहीपेक्षा मग ‘र्सवकष’ हा शब्द अधिक समर्पक वाटतो. 

Advertisement

या सगळ्या चर्चेत एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे. ती ही, की माणूस निर्मिती करत राहणार. साहित्य- मग ते अभिजात किंवा श्रेष्ठ असो वा नसो- निर्माण होत राहील. कारण अखेरीस ‘मला काही सांगायचे आहे’ ही माणसाची आच आहे आणि ती श्रेष्ठत्वाच्या इच्छेहून मोठी आहे. (या सांगण्याच्या आचेचे सकारात्मक-नकारात्मक पैलू आहेतच.) त्यामुळे महाकाव्य, कादंबरी, लघुकादंबरीपासून कथा, निबंध, स्फुटलेखन, आता ब्लॉग, समाजमाध्यमांवरील तुकडेवजा लेखन इथपर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्याकडे सामान्यीकरण (जनरलायझेशन) टाळून पाहावं लागेल. दलित साहित्याने जसे साहित्याचे रूढ मापदंड बाजूला ठेवायला भाग पाडले, तसेच हे नवीन फॉर्मेट्सदेखील नवीन मानदंडांची मागणी करतील. मुख्य म्हणजे कथा, कादंबरी यांसारख्या पारंपरिक वाङ्मयप्रकारांमध्येही आजच्या- एकीकडे डिजिटल, तर दुसरीकडे अस्मितेच्या राजकारणाने प्रभावित झालेल्या काळातील विषय आल्याने त्यांची भाषा आणि स्वरूपही बदलू शकेल (बदलते आहेच!). दृक्श्राव्य माध्यमांचा प्रचंड प्रभाव, बाजाराचे बदलते संकेत आणि दबाव या गोष्टी आहेतच. याच पार्श्वभूमीवर लेखक-समीक्षक-वाचक आणि या तिघांनाही प्रभावित करणारे सामाजिक वास्तव यातील द्वंद्वात्मक नातेही विकसित होत राहील. या एकूण पार्श्वभूमीवर साहित्याच्या गुणवत्तेविषयीची चर्चा सुरू ठेवायला हरकत नाहीच; फक्त ते करत असताना आपण वर्तुळाकार मार्गात अडकून राहत नाही ना, हे तपासणे, आपल्या चिकित्सेच्या पद्धतीची चिकित्सा करत राहणे आवश्यक आहे.     

समग्रता आणि अभ्यासाचा अभाव

Advertisement

 २८ ऑगस्टच्या ‘लोकरंग’मधील शांता गोखले यांचा ‘श्रेष्ठतम कांदबरीची प्रतीक्षाच’ हा कादंबरी लेखनामध्ये भारतीयत्वाचा शोध घेणारा लेख वाचला. या लेखात समग्रतेचा आणि अभ्यासाचा अभाव जाणवला. काही मान्यवरांच्या उद्गारावरून भारतीय पटलावर ठरावीक मराठी कादंबऱ्यांचे स्थान निश्चित करणे योग्य नाही. अनेक महत्त्वाची नावे सुटली आहेत. श्रेष्ठता आणि वाचनीयता या मुद्दय़ांचीही चर्चा होणे गरजेचे होते.

मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे

Advertisement

अभिरुचीहीनतेची चिंता योग्यच

‘सामान्यपणाचा अहंकार!’ या लेखात महेश एलकुंचवार यांनी सद्य:स्थितीत साहित्य, कला व इतर क्षेत्रांतील समाजाच्या अभिरुचीहीनतेकडे होणाऱ्या वाटचालीवर व्यक्त केलेली चिंता योग्यच आहे. याची कारणे अनेक असली तरी सद्य:स्थितीत तंत्रज्ञान प्रगतीने सुमार गोष्टीही चकचकीत होत आहेत. कोणालाही कोणत्याही बाबतीत खोलवर जाऊन चिकित्सा किंवा आस्वाद घेण्याची गरज वाटत नाही. टीव्हीवरील कार्यक्रमात तर कौतुक, टाळ्या यापलीकडे काही होत नाही. सवंग, अभिरुचीहीन प्रवासात सकस गोष्टी नसल्या तरी चालतात. त्यातून आता पाहण्याच्या दृष्टीला भेदभाव, राजकीय विचारधारा असे अनेक चष्मे लागल्यावर तर त्यातून जे दिसते तेवढेच पाहावे लागणार. अभिरुची सर्वसमावेशक असावी याचा विसर पडताना फार थोडय़ा लोकांना याची खंत वाटते. तसेही टीव्ही, मोबाइल, इंटरनेटच्या भूलभुलैयात ठरवून हरवून जाताना तर जे दिसेल ते पाहणे व ऐकणे होत आहे. त्यावर गुळगुळीत कमेंट किंवा लाइक दिला की पुरेसे होते. त्यासाठी अभ्यास, चिकित्सा वगैरेंसाठी वेळ नसावा, किंवा असलाच- तरी जे सुरू आहे तेच ठीक आहे असे सूर ऐकताना या विषयावर विचारमंथन वगैरे होण्याचे प्रमाण कमीच होत आहे. आज सामान्य माणसाचे जीवन पूर्वीप्रमाणे शांत, निवांत राहिलेले नसून अनेक समस्या, महागाई, बेरोजगारी, कमी पगाराच्या नोकऱ्या व पोटासाठी धावपळ या सगळ्यातून या विषयावर बोलण्यास वा चर्चा करण्यास तरी वेळ आहे का?

Advertisement

शांता गोखले यांनी लिहिलेल्या ‘श्रेष्ठतम कादंबरीची प्रतीक्षाच!’ या लेखामुळे अंक संग्रा  झाला. त्यांनी मोठय़ा कालखंडाचा साहित्यिक दृष्टीने घेतलेला अभ्यासपूर्ण आढावा खरोखरच माहितीपूर्ण आहे. त्यांनी वाचनीय व आयुष्यावर काहीएक परिणाम करणाऱ्या कादंबऱ्यांची दिलेली यादी योग्यच आहे. जुन्या पिढीने तर त्याकाळी वाचनाला अनुकूल वातावरण असल्याने या कादंबऱ्या अनेक वेळा वाचलेल्या होत्या. विकत घेऊन किंवा वाचनालयातून प्रतीक्षा करून त्यांचे वाचन केले होते. आजही या कादंबऱ्या ई-बुक्स, किंडलच्या माध्यमातून वाचल्या जातात. पण वेळेच्या अभावामुळे व इतर अनेक पर्याय सहजपणे मोबाइलवर उपलब्ध झाल्याने मुद्रित पुस्तकांच्या वाचनाचे प्रमाण कमी होत आहे. आधुनिक काळात उपलब्ध होणाऱ्या लेखनात आशयघनता कमी होत असून, चकचकीतपणा वाढतो आहे. एकंदरीत अभिरुचीहीनतेकडे वाटचाल होताना साहित्य, चित्रपट व अन्य कलाप्रकारांवरही विपरीत परिणाम होत आहेत. सद्य:स्थितीत मानसिक ताण कमी (?) करणाऱ्या टीव्हीवरील विनोदी मालिका, विनोदी चित्रपट व साहित्याला मोठी मागणी आहे. जगण्याचेच निकष व संदर्भ बदलत असल्याने श्रेष्ठतम कादंबरी प्रतीक्षेतच राहणार की काय? या प्रश्नाचे उत्तर मिळणे कठीणच आहे. नवीन लेखक, कवी, साहित्यिक कुठेही कमी नाहीत. त्यांच्यात पूर्वीच्या लेखकांप्रमाणेच लिखाणाची क्षमता आहे, पण कालमानानुसार त्यांचे विषय बदलले आहेत. वाचकांच्या आवडीनिवडीतही बदल झाले आहेत. वरकरणी अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे, पण आपण काही लिहिले व कोणाच्या भावना दुखावल्या तर काय करायचे, ही धास्तीही आहेच.

प्रफुल्लचंद्र काळे, सातपूर, नाशिक

Advertisement

महाराष्ट्राची अभिरुची दर्शवणारा लेख

‘सामान्यपणाचा अहंकार!’ हा महेश एलकुंचवार यांचा लेख वाचला. हा महाराष्ट्राची अभिरुची दर्शवणारा वास्तवदर्शी लेख आहे. सिंथेटिक, दिखाऊ, सवंग असे बरेच काही आपल्या जीवनात शिरले आहे. जगण्यातील अस्सलता आपण गमावून बसलो आहोत. ‘आम्ही आपले सामान्य!’ असे म्हणणे म्हणजे काहीही सजग होऊन वा गांभीर्याने न पाहणे, न वाचणे, न जाणणे होय. 

Advertisement

अनंत साधू, हिंगोली

ललितकलांविषयीची उदासीनता 

Advertisement

‘सामान्यपणाचा अहंकार!’ हा महेश एलकुंचवार यांचा लेख सर्वच ललितकलांवरील उदासीनता व्यक्त करणारा आहे. कादंबरी, नाटक, चित्रपट आणि चित्रकला या क्षेत्रांमध्ये काही ठरावीक नावांपलीकडे आपली रसिकता, अभिरुची जात नाही हे वास्तव आहे. ‘आम्ही आपले सामान्य’ म्हणवणारेच अवतीभवती आढळतात. ‘वाचू आनंदे’ म्हणणारे भेटणे  दूरचीच बाब. महेश एलकुंचवार यांच्यासारख्या अधिकारी व्यक्तीने या उदासीनतेचे केलेले विश्लेषण मार्मिक आहे.

सदानंद करंदीकर, बारामती

Advertisement

अभिरुचीचे मापदंड बदलले..

‘सामान्यपणाचा अहंकार!’ हा एलकुंचवार  यांचा लेख वाचला. अभिरुचीसंदर्भातील नॉस्टॅल्जिक उदाहरणे वाचून नव्वदच्या दशकाच्या आठवणी जाग्या झाल्या. अभिरुची ही कल्पनेची बहीण आहे. नव्वदोत्तरी काळात कल्पनांच्या सादरीकरणाचा बाज बदलला आणि मोठय़ा प्रमाणात वास्तवरूपात चित्रित, ध्वनिमुद्रित स्वरूपात त्यांची निर्मिती होऊ लागली. कलाप्रकारांच्या निर्मितीचा वेग आणि उपलब्धता एवढी वाढली, की त्यांचे आकलन विचारांती करण्याएवढा वेळच माणसाकडे उरला नाही. ‘वाचू आनंदे’सारखे तुकडय़ा- तुकडय़ांतले साहित्य फेसबुक अकाऊंटवर वाचायला मिळते; पण त्यावरही लाइक्स किंवा कमेंट्स करायला फुरसत नाहीए. एकंदरच एकेकाळी जे अप्रूप होते, ते आज विनासायास उपलब्ध झाले आहे. यासाठी आवश्यक साधने, गॅजेट्स याबाबतची अभिरुची जपली जात आहे. अ‍ॅपल, बोश, सोनी, जेबीएलसारख्या ब्रँड्सची उपकरणे असणे, त्यावर पाहणे, ऐकणे हे उच्च अभिरुचीचे मापदंड झाले आहेत. असेच वर्गीकरण ओटीटी प्लॅटफॉर्म, सोशल नेटवर्किंग साइट्स, मीडिया यांचेही झाले आहे. सामान्यांचे यांत्रिकीकरण झाले आहे आणि सामान्यपणा बहुमताचा असल्याने त्यांच्याकडून विदग्ध साहित्य आणि कलेबद्दल आदराची अपेक्षा ठेवणे अनाठायीच आहे.

Advertisement

बाकी महानता ही कालसापेक्ष असल्याने स्वातंत्र्यपूर्व काळातील उत्तुंग माणसे ही आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीच्या काळात असती तर खुजी ठरली असती असेही होऊ शकते.

नकुल संजय चुरी

Advertisement

विषयापासून फारकत..

‘सामान्यपणाचा अहंकार!’ हा महेश एलकुंचवार यांचा लेख वाचला. यातील अनेक मुद्दय़ांशी सहमत होताना एक बाब जाणवली, ती म्हणजे लेखाचे शीर्षक ‘सामान्यपणाचा अहंकार’ याला अनुरूप असे हे लेखन नाही. लेखाचा विषय आणि मध्यवर्ती कल्पना यापासून या लेखात बऱ्यापैकी फारकत घेतलेली आहे. मुळात अनेक कलाप्रकार हे मराठी माणसांना समजत नाहीत. विशेषत: चित्रकला, शिल्पकला, शास्त्रीय संगीत यांत त्याला फारशी गती नाही, हे गृहीतक योग्य वाटते; पण यात सामान्य माणसाचा अहंकार कोठे येतो? मेंढरासारखे मोठय़ा माणसांनी चांगल्या म्हटलेल्या गोष्टींची री ओढणे हे तो आजवर करत आलेला आहे. मग त्यातले आपल्याला काही कळत असो वा नसो.

Advertisement

लेखाचा शेवटही ओढूनताणून केल्यासारखा वाटतो. ‘आम्ही आपले सामान्य.. आम्हाला नाही कळत बाबा तुमचे ते हे..’ हे लेखकाचे निरीक्षणही अयोग्य वाटते. हे सामान्य माणूस आढय़तेने म्हणतो असे वाटत नाही. मानभावीपणे म्हणतो, हे एक वेळ मान्य होईल. एखाद्याला आपण प्रामाणिक आहोत, मध्यमवर्गीय आहोत याचा दुरभिमान असतो, ही पार्श्वभूमी कदाचित लेखकाच्या मनात असावी; पण सामान्यपणाला ती कुठे जुळणारी वाटत नाही.

गार्गी बनहट्टी, दादर, मुंबई

Advertisement

सामान्यांना अहंकारी ठरवू नये!

४ सप्टेंबरच्या ‘लोकरंग’मधील महेश एलकुंचवार यांचा ‘सामान्यपणाचा अहंकार!’ हा लेख वाचला. एलकुंचवार म्हणतात त्याप्रमाणे अभिरुची हा वेगळाच विषय आहे हे खरे आहे. आपण ज्याला ढोबळमानाने ‘अभिजात’ म्हणू शकतो, अशा कोणत्याही कलाप्रकाराला मिळणारा प्रतिसाद लोकसंख्येच्या टक्केवारीत मोजला तर अतिशय अल्प टक्केवारी अभिजाततेच्या वाटय़ाला येते.

Advertisement

मराठी नाटके मुंबई-पुण्यात साप्ताहिक किंवा दररोज होतात, तर इतर जिल्ह्यंच्या ठिकाणी (अंतरनिरपेक्ष घेतल्यास) तिमाही, सहामाही होतात. येथे टक्केवारी स्पष्ट होते. हा केवळ मराठी किंवा इतर भाषेपुरता प्रश्न नसावा, तर जागतिक असावा. नाटकाच्या हौशी/ प्रायोगिक अवस्थेचा विषय निघाला असता तेंडुलकरांनी ‘घाशीराम..’च्या अमेरिकन प्रयोगाची आठवण सांगितली होती. एक चिनी अमेरिकन महिला निर्माती म्हणून हौसेने हा प्रयोग करीत होती. प्रयोगाच्या तालमीच्या दरम्यान एक नट व्यावसायिक (ब्रॉडवेवरचे) बोलावणे आले म्हणून नाटक सोडून गेला होता.

व्यक्तिगत उल्लेखाचा दोष पत्करून एक आठवण नमूद करू इच्छितो. ऐंशीच्या दशकात संपादक गोिवद तळवलकर तरुणांचे स्मार्ट मित्रच नव्हे, तर विद्वान मित्र होते. त्याकाळी म. टा. मुंबई-पुणे येथे शहर आवृत्ती व इतर ठिकाणी डाक आवृत्तीत मिळत असे. अंतर्गत भागात तर तो दोन- दोन दिवसांचा एकदाच मिळत असे. प्रस्तुत लेखकाने प्रादेशिक आवृत्ती सुरू करण्याकरिता त्यांना पत्रे लिहून भंडावून सोडले होते. शेवटी दोन दिवसांआड एक पत्र असा क्रम सुरू झाल्यावर एके दिवशी गोिवद तळवलकरांचे एक पोस्टकार्ड आले. त्यावर दोन ओळींत लिहिले होते- ‘संख्यात्मता वाढली की गुणात्मकता टिकवता येतेच असे नाही.. बहुतेक वेळा ती राहत नाही. आपण सुचवता त्याप्रमाणे प्रादेशिक आवृत्ती सुरू करणे सध्या तरी शक्य नाही.’ वर्तमानात सगळ्याच माध्यमांनी संख्यात्मकता वाढवून गुणात्मकतेबाबत तळवलकरांचे बोल खरे केले आहेत.

Advertisement

‘अभिरुची’ या विषयावरच्या एका लेखाचा शेवट करताना समीक्षक म. वा. धोंड लिहितात- ‘शेवटी सत्य एकच- जगात उस्ताद थोडे, उल्लू फार! आणि पळसाला पाने तीनच.’

अभिजाततेच्या प्रतिसादाच्या टक्केवारीचा प्रश्न केवळ आजचाच नसावा; तो भवभूतीच्या काळातही असावा. भवभूती आपल्या ‘ये नाम केचित.. विपुलाच पृथ्वी’ या श्लोकात म्हणतो, ‘माझा उपहास, उपेक्षा करणारे (बहुसंख्य) यांच्याकरिता मी लिहीत नाहीच. माझ्या आत्म्याला समजून घेणारा कुणीतरी कधीतरी, एक ना एक दिवस मला भेटेलच. (त्याच्यासाठी मी लिहीत आहे.) कारण पृथ्वी विशाल आहे आणि काल अनंत.’

Advertisement

एलकुंचवार यांच्या विद्वत्तेबद्दल पूर्ण आदर बाळगून असे वाटते की, सामान्यांच्या अभिरुचीबाबतचे हे सत्य जर वैश्विक असेल तर सामान्यांना दोष देऊन त्यांना अहंकारी ठरवण्यात येऊ नये.

मनोज महाजन, मुंबई

Advertisement

नेत्रांजनी लेख

‘सामान्यपणाचा अहंकार!’ हा महेश एलकुंचवार यांचा नेत्रांजनी लेख पुन:पुन्हा वाचला. पुलंच्या ‘एक शून्य मी’ पुस्तकातले  लेख आठवले. १) सध्याची मंडळी अतिवेगाने लिहितात, २) लोकांना हेच हवं असतं हल्ली,  समाज शतखंडित झाला आहे.. अशी काही वाक्ये तर अंतर्मुख करणारी आहेत. साहित्य क्षेत्र तर गटबाजीने पूर्ण नासवले आहे. रसिक अत्यल्प झाले. अनेकांनी गटबाजीने ‘अमृतसुद्धा’ नासवले असे खेदाने म्हणावे लागते. खूप काही व्यक्त होता येईल. या लेखातून लेखक मंडळींनी योग्य तो बोध घेतला तर लेखकाचे श्रम सार्थकी लागतील.

Advertisement

– मधुकर घारपुरे, सावंतवाडी, सिंधुदुर्गSource link

Advertisement