पडसाद : आजच्या स्वार्थी राजकारण्यांना गांधीजी कळणे अशक्यच!



‘लोकरंग’मधील (३० जानेवारी) ‘शंभरी.. असहकाराच्या माघारीची’ हा लोकेश शेवडे यांनी लिहिलेला लेख वाचला. महात्मा गांधींना  जेव्हा आपण घेतलेला निर्णय हा न्यायाला धरून आहे असे वाटे तेव्हा स्वत:ला अथवा जवळच्या लोकांना त्यामुळे काय क्षती पोहोचेल याचा विचार न करता तो निर्णय ते अमलात आणत असत. आपल्या पक्षात आलेल्यांचे गुन्हे माफ करणे, आपल्या विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे, आपल्या चुका कुणी दाखविल्या की ‘तुम्हीही हेच केले होते’ असे त्याचे समर्थन करणे- असली राजकीय संस्कृती अनुभवणाऱ्या आजच्या लोकांना स्वत:च्या मुलाच्या चुकांना माफ न करणाऱ्या गांधीजींचे माहात्म्य कसे कळणार? त्यांना गांधीजींचे पाकिस्तानला राष्ट्रीय कोषातून त्यांच्या हक्काचा हिस्सा देणे, देशविभाजनाच्या वेळचे दंगे थांबविण्यासाठी उपास करणे या गोष्टी अनाकलनीय वाटतात. या लेखात नथुराम व त्याच्या सोबत्यांचा उल्लेख ‘खुनी टोळकं’ असा केला आहे. खरं तर ते सारे शिकलेसवरलेले, पण वैचारिक गोंधळ असलेले युवक होते. गांधीजी पाकिस्तान व मुसलमानधार्जिणे आहेत असा त्यांचा ग्रह झाला होता, त्यांचे निर्णय देशाला घातक ठरत आहेत असे त्यांचे मत होते. पण त्यासाठी त्यांनी उचललेले पाऊल मात्र अयोग्यच होते हेही मान्यच करावे लागेल.   – डॉ. विराग गोखले, भांडुप

Advertisement

घरबसल्या चित्रसंग्रहालयदर्शन

‘लोकरंग’मधील ‘अभिजात’ ही अरुंधती देवस्थळे यांची लेखमाला म्हणजे घरबसल्या युरोपमधील चित्रसंग्रहालयांची टूरच आहे. सुंदर अनुभव व बारीक चित्रनिरीक्षण हे या सदराचं वैशिष्टय़ आहे. चित्रकारदेखील इतक्या सूक्ष्मपणे निरीक्षण करत नाहीत. रेम्ब्राँ म्युझियमची माहिती वाचताना माझी नात, मुलगा व सुनेने तेथे जाऊन प्रत्यक्ष पाहिलेलं त्यांना सर्व पुन्हा आठवलं.  – रंजन जोशी

Advertisement

जुन्या आठवणींना उजाळा

‘लोकरंग’मधील (२३ जानेवारी) अरुणा अंतरकर यांचा ‘भावरम्य ‘अमर प्रेम’चा सुवर्णयोग’ हा लेख खूप आवडला. खरोखरच ‘आराधना’ चित्रपटाने सुपरस्टार झालेल्या राजेश खन्नाने त्यानंतरच्या त्याच्या ‘अमर प्रेम’ या चित्रपटाने त्यावेळच्या आम्हा कॉलेजवीरांना अक्षरश: मोहिनी घातली होती. राजेश खन्नासारखे गुरू शर्ट, केसांचा मधोमध भांग, त्याचा थिएटरला चित्रपट लागल्या लागल्या तो बघायला जाण्याची घाई.. काही विचारू नका. त्याच्या उत्कृष्ट अभिनयाचा आविष्कार म्हणजे ‘आनंद’ हा चित्रपट. ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ या एका गाण्यासाठी ‘अंदाज’ बघायला येणारे त्याचे चाहते.. माझी एक खास आठवण म्हणजे राजेश खन्नासारखा हुबेहूब दिसणारा माझा त्यावेळचा एक कॉलेजचा सहकारी आणि जिवलग मित्र मनोहर चोणकर- ज्याची ओळख माझ्या मुली ‘पपांचा राजेश खन्ना’ मित्र म्हणून सांगत.. इतकी क्रेझ आणि त्या रम्य आठवणी आजही वयाच्या  सत्तरीत प्रवेश केल्यावरही आनंद देतात. आजही टीव्हीवर राजेश खन्नाची गाणी लागली की हातातील काम सोडून ती बघण्याचा मोह आवरत नाही. – प्रमोद कुंदाजी कडू, पनवेल 

Advertisement

आनंद बक्षींचा अनुल्लेख खटकला

‘लोकरंग’मधील (२३ जानेवारी) अरुणा अंतरकरांचा ‘अमर प्रेम’ चित्रपटावरील लेख वाचला. पन्नास वर्षांपूर्वीच्या या सुपरहिट् चित्रपटावर विस्तृत लेख वाचून मन गतस्मृतींत रमले. राजेश खन्ना हा त्याकाळी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत होता. त्याच्या प्रचंड लोकप्रियतेसोबतच या चित्रपटातील अनेक बाजू हा चित्रपट चालण्यास कारणीभूत ठरल्या होत्या. त्यांचा उल्लेख या लेखामध्ये केलेला आहेच. मात्र, या चित्रपटाची उत्तम गाणी लिहिणाऱ्या गीतकार आनंद बक्षी यांचा या लेखात कुठेही उल्लेख नाही ही बाब मनाला खटकली. ‘अमर प्रेम’ची सर्व गाणी उत्तम होती आणि त्यांन राहुल देव बर्मन यांनी लावलेल्या चालीही श्रवणीय होत्या. त्यातले ‘चिंगारी कोई भडके..’ हे गीत तर अप्रतिम! त्यातील भावपूर्ण आणि अर्थपूर्ण शब्द, किशोरकुमारचा मस्तपैकी आवाज.. सारेच रसमय! या अजरामर गीताच्या जन्माचा एक किस्सा असा : ‘अमर प्रेम’साठी शक्ती सामंत यांना प्रश्न आणि लगेचच त्याच्यामागोमाग उत्तर असे एक गीत हवे होते. त्यांनी आनंद बक्षी यांच्याकडे तशा गीताची मागणी केली. बरेच दिवस झाले तरीही तसे गीत बक्षी यांना सुचेना. त्यादरम्यान एका पार्टीत आनंद बक्षी गेले होते. बाहेर पाऊस पडत होता. बक्षींच्या हातात पेटती सिगारेट होती. हातात सिगारेट घेऊन ते खिडकीजवळ बाहेरच्या पावसाचे दृश्य बघत असताना पावसाचे थेंब खिडकीतून त्यांच्याजवळील जळत्या सिगारेटवर पडले आणि सिगारेट विझली. हे बघताच त्यांना ‘चिंगारी कोई भडके तो सावन उसे बुझाये, सावन जो आग लगाये उसे कौन बुझाये’ ही ओळ सुचली. कागदावर ही ओळ लिहिताच पुढे अख्खे गाणे त्यांना सुचत गेले आणि तिथल्या तिथे त्यांनी ते पूर्ण केले. पुढे या गीताला लाभलेली लोकप्रियता आज पन्नास वर्षांनंतरही कायम आहे. या लेखात किशोरकुमार यांचाही नामोल्लेख हवा होता.  – वसंत खेडेकर, चंद्रपूर

Advertisement

The post पडसाद : आजच्या स्वार्थी राजकारण्यांना गांधीजी कळणे अशक्यच! appeared first on Loksatta.



Source link

Advertisement